लूक 19:12-26
लूक 19:12-26 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे या उद्देशाने दूरदेशी गेला. त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा नाणी देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यावर व्यापार करा.’ त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’ मग असे झाले कि, तो राज्य मिळवून पुन्हा परत आल्यावर ज्यांना त्याने व्यापाराकरिता पैसा दिला होता, त्यावर किती नफा झाला हे समजावे म्हणून दासांना आज्ञा देऊन त्यांना बोलावीले. पहिला पुढे आला आणि म्हणाला, ‘धनी तुम्ही दिलेल्या नाण्यावर मी आणखी दहा नाणी मिळवली आहेत.’ तेव्हा तो त्यास म्हणाला, ‘चांगल्या दासा, छान केलेस, तू थोडक्यांविषयी विश्वासू झालास, म्हणून तू दहा नगरांवर अधिकारी होशील.’ मग दुसरा आला व म्हणाला, ‘धनी, तुमच्या पाच नाण्यांवर मी पाच नाणी आणखी मिळवली.’ आणि तो त्यास म्हणाला, ‘तू पाच नगरांवर अधिकारी असशील.’ मग आणखी एक दास आला आणि म्हणाला, ‘धनी, आपण दिलेले नाणे मी हातरुमालात बांधून ठेवले होते. आपण कठोर आहात, जे आपण ठेवले नाही, ते आपण काढता आणि जे पेरले नाही, ते कापता. म्हणून मला तुमची भीती वाटत होती,’ धनी त्यास म्हणाला, ‘दुष्ट दासा, तुझ्याच शब्दांनी मी तुझा न्याय करतो. तुला ठाऊक होते की मी कडक शिस्तीचा मनुष्य आहे. मी जे दिले नाही ते घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, तर तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? मग जेव्हा मी परत आलो असतो तेव्हा ते मला व्याजासह मिळाले असते.’ त्याच्याजवळ उभे राहणाऱ्यांना तो म्हणाला, ‘त्याच्यापासून ते नाणे घ्या आणि ज्याच्याजवळ दहा नाणी आहेत, त्यास द्या.’ ते त्यास म्हणाले, ‘धनी, त्याच्याजवळ दहा नाणी आहेत.’ धन्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हास सांगतो, ज्याच्याजवळ आहे, त्यास अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही, त्याच्याकडे जे काही असेल तेसुध्दा काढून घेतले जाईल.
लूक 19:12-26 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू म्हणाले, “प्रतिष्ठित समाजातील एक मनुष्य राजा म्हणून नियुक्त करून घेण्यासाठी दूर देशी गेला आणि परत येणार होता. त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्या प्रत्येकाला एक मोहर दिली व म्हणाला, ‘मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.’ “परंतु त्याच्या प्रजेने त्याचा द्वेष केला व त्यांनी त्याच्या पाठोपाठ एक प्रतिनिधी मंडळ हे सांगण्यासाठी पाठविले की, ‘हा मनुष्य आमचा राजा असावा अशी आमची इच्छा नाही.’ “तरीपण त्याचा राज्याभिषेक करण्यात येऊन तो घरी परतला. मग त्याने ज्या दासांना पैसे दिले होते, त्यांनी त्या पैशावर किती नफा मिळविला, हे पाहण्याकरिता बोलावले. “पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मोहरेवर आणखी दहा मोहरा मिळविल्या आहेत.’ “राजाने म्हटले, ‘शाबास, माझ्या चांगल्या दासा! तुझ्यावर सोपविलेली थोडी जबाबदारी तू विश्वासूपणाने पार पाडलीस म्हणून तू दहा शहरांची जबाबदारी सांभाळ.’ “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मोहरेवर आणखी पाच मोहरा मिळविल्या आहेत.’ “त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘तू पाच शहरांची जबाबदारी घे.’ “मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मोहर घ्या; मी ती एका कपड्यात गुंडाळून जपून ठेवली होती, तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’ “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा! मी आता तुझ्या शब्दाप्रमाणेच तुझा न्याय करतो, तुला माहीत होते की मी कठोर स्वभावाचा आहे, जे माझे नाही ते बळकावितो आणि मी स्वतः पेरले नाही ते कापून नेतो, तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास पाहिजे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’ “नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘या माणसाजवळून ती मोहर घ्या आणि ज्याच्याजवळ दहा आहेत त्याला द्या.’ “पण ‘महाराज,’ ते म्हणाले, ‘त्याच्याजवळ अगोदरच भरपूर आहे.’ “यावर त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला सांगतो, कारण ज्याला आहे त्याला अधिक दिले जाईल व ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.’
लूक 19:12-26 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’ त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’ मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावण्यास सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’ मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ मग त्याने जवळ उभे राहणार्यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल.
लूक 19:12-26 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो म्हणाला, “आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने एक उमराव दूर देशी जायला निघाला. जाण्यापूर्वी त्याने त्याच्या दहा दासांना बोलावले व त्यांना प्रत्येकी एकेक सोन्याची मोहर देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत हिच्या साहाय्याने व्यापार करा.’ त्याच्या नगरातले लोक त्याचा द्वेष करीत असत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग प्रतिनिधी पाठवून कळवले, ‘ह्याने आम्हांवर राज्य करावे, अशी आमची इच्छा नाही.’ तो राजा होऊन परत आल्यावर त्याच्या दासांनी व्यापारात काय काय मिळविले, हे पाहावे म्हणून त्याने त्यांना स्वतःकडे बोलावण्यास सांगितले. पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’ त्याने त्याला म्हटले, ‘शाब्बास, भल्या दासा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर मी तुला अधिकार देईन.’ नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, तुमच्या मोहरेवर मी आणखी पाच मोहरांची कमाई केली आहे.’ त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही मी पाच नगरांवर अधिकार देईन.’ त्यानंतर आणखी एक दास येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा तुमची मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण कठोर असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही, ते आपण घेता व जे आपण पेरले नाही, त्याची कापणी करता.’ तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच शब्दांत तुझा न्याय करतो. मी कठोर माणूस आहे, जे मी ठेवले नाही, ते घेतो व जे मी पेरले नाही, त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते ना? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाही? ठेवला असता, तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’ त्याने जवळ उभे राहणाऱ्यांना सांगितले, ‘ह्याच्याकडून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’ ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’ ‘मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे, त्याला अधिक दिले जाईल आणि ज्याच्याजवळ काहीच नाही, त्याचे जे आहे, तेदेखील त्याच्याकडून घेतले जाईल.