YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 19:12-26

लूक 19:12-26 MRCV

येशू म्हणाले, “प्रतिष्ठित समाजातील एक मनुष्य राजा म्हणून नियुक्त करून घेण्यासाठी दूर देशी गेला आणि परत येणार होता. त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्या प्रत्येकाला एक मोहर दिली व म्हणाला, ‘मी परत येईपर्यंत यावर व्यापार करा.’ “परंतु त्याच्या प्रजेने त्याचा द्वेष केला व त्यांनी त्याच्या पाठोपाठ एक प्रतिनिधी मंडळ हे सांगण्यासाठी पाठविले की, ‘हा मनुष्य आमचा राजा असावा अशी आमची इच्छा नाही.’ “तरीपण त्याचा राज्याभिषेक करण्यात येऊन तो घरी परतला. मग त्याने ज्या दासांना पैसे दिले होते, त्यांनी त्या पैशावर किती नफा मिळविला, हे पाहण्याकरिता बोलावले. “पहिला सेवक म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या एका मोहरेवर आणखी दहा मोहरा मिळविल्या आहेत.’ “राजाने म्हटले, ‘शाबास, माझ्या चांगल्या दासा! तुझ्यावर सोपविलेली थोडी जबाबदारी तू विश्वासूपणाने पार पाडलीस म्हणून तू दहा शहरांची जबाबदारी सांभाळ.’ “नंतर दुसरा दास आला आणि म्हणाला, ‘महाराज, मी तुमच्या मोहरेवर आणखी पाच मोहरा मिळविल्या आहेत.’ “त्याचा धनी त्याला म्हणाला, ‘तू पाच शहरांची जबाबदारी घे.’ “मग तिसरा दास पुढे येऊन म्हणाला, ‘महाराज, ही तुमची मोहर घ्या; मी ती एका कपड्यात गुंडाळून जपून ठेवली होती, तुम्ही एक कठोर गृहृस्थ आहात, म्हणून मला तुमची भीती वाटली. जिथे तुम्ही ठेवले नाही, तिथे घेता आणि जे पेरलेले नाही, ते कापून नेता.’ “यावर त्याचा धनी म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा! मी आता तुझ्या शब्दाप्रमाणेच तुझा न्याय करतो, तुला माहीत होते की मी कठोर स्वभावाचा आहे, जे माझे नाही ते बळकावितो आणि मी स्वतः पेरले नाही ते कापून नेतो, तर माझे रुपये सावकाराकडे गुंतवून ठेवावयास पाहिजे होते, म्हणजे मी परत आल्यावर त्यावर काही व्याज तरी मिळाले असते?’ “नंतर तो त्याच्याजवळ जे उभे होते त्यांना म्हणाला, ‘या माणसाजवळून ती मोहर घ्या आणि ज्याच्याजवळ दहा आहेत त्याला द्या.’ “पण ‘महाराज,’ ते म्हणाले, ‘त्याच्याजवळ अगोदरच भरपूर आहे.’ “यावर त्याने उत्तर दिले, ‘मी तुम्हाला सांगतो, कारण ज्याला आहे त्याला अधिक दिले जाईल व ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.’

लूक 19 वाचा