YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 19

19
जक्कय
1त्याने यरीहोत प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता.
2तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता.
3येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता.
4तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला; कारण येशूला त्या वाटेने जायचे होते.
5मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कया, त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.”
6तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले.
7हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, “पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे.”
8तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्र्यांस देतो, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर ते चौपट परत करतो.”
9येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही अब्राहामाचा पुत्र आहे.
10कारण मनुष्याचा पुत्र ‘हरवलेले शोधण्यास व तारण्यास आला आहे.”’
मोहरांचा दृष्टान्त
11ते ह्या गोष्टी ऐकत असता त्याने त्यांना एक दाखलाही सांगितला; कारण तो यरुशलेमेजवळ होता, आणि देवाचे राज्य आताच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते.
12तो म्हणाला, “कोणीएक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला.
13त्याने आपल्या दहा दासांना बोलावले व त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, ‘मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा.’
14त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’
15मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या दासांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांना आपणाकडे बोलावण्यास सांगितले.
16मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.’
17त्याने त्याला म्हटले, ‘शाबास, भल्या दासा; तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे.’
18नंतर दुसरा येऊन म्हणाला, ‘महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमवल्या आहेत.’
19त्यालाही त्याने म्हटले, ‘तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे.’
20मग आणखी एक येऊन म्हणाला, ‘महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती.
21कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली; जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता व जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.’
22तो त्याला म्हणाला, ‘अरे दुष्ट दासा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो व जे मी पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय?
23मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असतास तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता.’
24मग त्याने जवळ उभे राहणार्‍यांना सांगितले, ‘ह्याच्यापासून ती मोहर घ्या व ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या.’
25ते त्याला म्हणाले, ‘महाराज, त्याच्याजवळ तर दहा मोहरा आहेत!’
26मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल, आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे तेदेखील त्याच्यापासून घेतले जाईल.
27आता ज्या माझ्या वैर्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.”
येशूचा यरुशलेमेत जयोत्सवाने प्रवेश
28ह्या गोष्टी सांगून तो वर यरुशलेमेकडे जात असताना स्वतः पुढे चालत होता.
29मग असे झाले की, ज्याला जैतुनांचा डोंगर म्हणतात त्याच्या नजीक असलेल्या बेथफगे व बेथानी ह्या गावांजवळ तो येऊन पोहचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले,
30“तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगरू बांधलेले तुम्हांला आढळेल; ते सोडून आणा.
31ते का सोडता असे कोणी तुम्हांला विचारलेच, तर ‘प्रभूला ह्याची गरज आहे,’ असे सांगा.”
32तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तेथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले.
33ते शिंगरू सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, “शिंगरू का सोडता?”
34तेव्हा ते म्हणाले, “प्रभूला ह्याची गरज आहे.”
35मग त्यांनी ते येशूकडे आणले, आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले.
36आणि जसजसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले.
37तो जैतुनांच्या डोंगराच्या उतरणीवर पोहचताच सर्व शिष्यसमुदाय, जी महत्कृत्ये त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले,
38“‘प्रभूच्या नावाने येणारा’ राजा
‘धन्यवादित असो;’
स्वर्गात शांती,
आणि ऊर्ध्वलोकी गौरव.”
39तेव्हा लोकसमुदायातील काही परूश्यांनी त्याला म्हटले, “गुरूजी, आपल्या शिष्यांना दटावा.”
40त्याने म्हटले, “मी तुम्हांला सांगतो, हे गप्प राहिले तर धोंडे ओरडतील.”
यरुशलेमेकडे पाहून येशूने केलेला विलाप
41मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरता रडत रडत म्हणाला,
42“जर तू, निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत.
43कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील,
44तुला व ‘तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील’ आणि तुझ्यामध्ये चिर्‍यावर चिरा राहू देणार नाहीत; कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.”
येशू मंदिराचे शुद्धीकरण करतो
45नंतर तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत [व विकत घेत] होते त्यांना तो बाहेर घालवू लागला;
46आणि त्यांना म्हणाला, “‘माझे घर प्रार्थनेचे घर होईल,’ असा शास्त्रलेख आहे; परंतु त्याची तुम्ही ‘लुटारूंची गुहा’ केली आहे.”
47तो मंदिरात दररोज शिक्षण देत असे; पण मुख्य याजक, शास्त्री व लोकांचे पुढारी त्याचा घात करण्यास पाहत असत.
48तरी काय करावे हे त्यांना सुचेना; कारण सर्व लोक त्याचे मन लावून ऐकत असत.

सध्या निवडलेले:

लूक 19: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन