YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 14:15-35

लूक 14:15-35 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, “जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येकजण धन्य.” मग येशू त्यास म्हणाला, “एक मनुष्य एका मोठ्या मेजवानीची तयारी करीत होता. त्याने पुष्कळ लोकांस आमंत्रण दिले. भोजनाच्या वेळी ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना ‘या कारण सर्व तयार आहे’ असा निरोप सांगण्यासाठी नोकराला पाठवले. ते सर्वजण सबब सांगू लागले. पाहिला त्यास म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे आणि मला जाऊन ते पाहिले पाहिजे. कृपाकरून मला क्षमा कर.’ दुसरा म्हणाला, ‘मी बैलाच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहोत व त्यांची पारख करण्यासाठी मी चाललो आहे, कृपाकरून मला क्षमा कर.’ आणखी तिसरा म्हणाला, ‘मी लग्न केले आहे व त्यामुळे मी येऊ शकणार नाही.’ तो नोकर परत आला व त्याने आपल्या मालकाला या गोष्टी सांगितल्या. मग घराचा मालक रागावला आणि नोकराला म्हणाला, ‘बाहेर रस्त्यावर आणि नगरातल्या गल्ल्यांमध्ये लवकर जा व गरीब, आंधळे, असहाय्य, लंगडे यांना घेऊन इकडे ये!’ नोकर म्हणाला, ‘मालक, आपल्या आज्ञेप्रमाणे केले आहे आणि तरीही आणखी जागा रिकाम्या आहे.’ मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल. कारण मी तुम्हास सांगतो की, त्या आमंत्रित मनुष्यांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.” मोठ्या संख्येने लोक येशूबरोबर चालत होते. तो त्यांच्याकडे वळाला व म्हणाला, “जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. जर तुम्हापैकी कोणाला बुरुज बांधायचा असेल तर तो अगोदर बसून खर्चाचा अंदाज करून तो पूर्ण करावयास त्याच्याजवळ पुरेसे पैसे आहे की नाही हे पाहणार नाही काय? नाही तर कदाचित तो पाया घालील आणि पूर्ण करू शकणार नाही आणि जे पाहणारे आहेत ते त्याची थट्टा करतील आणि म्हणतील, या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली पण पूर्ण करू शकला नाही! किंवा एक राजा दुसऱ्या राजाबरोबर लढाई करण्यास निघाला, तर तो अगोदर बसून याचा विचार करणार नाही का? की, त्याच्या दहा हजार मनुष्यांनिशी त्याच्या शत्रूशी, जो वीस हजार सैन्यानिशी चालून येत आहे, त्यास त्याचा सामना करता येणे शक्य आहे काय? जर तो त्यास तोंड देऊ शकणार नसेल, तर त्याचा शत्रू दूर अंतरावर असतानाच तो मध्यस्थ पाठवून शांततेसाठी सलोख्याचे बोलणे सुरू करील. त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही. मीठ चांगले आहे, पण मिठाची जर चव गेली, तर त्यास खारटपणा कशाने येईल? ते जमिनीच्या किंवा खताच्याही पूर्णपणे निरुपयोगी ठरेल व लोक ते फेकून देतील. ज्याला ऐकायला कान आहेत तो ऐको.”

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:15-35 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशूंच्या बरोबर पंक्तीस बसलेल्या एकाने हे ऐकले, व तो येशूंना म्हणाला, “धन्य आहे तो मनुष्य, जो परमेश्वराच्या राज्यातील मेजवानीत भोजन करील.” येशूंनी उत्तर दिले: “एक मनुष्य मोठी मेजवानी देण्याची तयारी करत होता आणि त्याने अनेक पाहुण्यांना आमंत्रणे दिली. मेजवानीच्या वेळेला त्याने त्याच्या दासांना ज्यांना आमंत्रणे दिली होती त्यांना, ‘चला आता भोजनाची सर्व तयारी झाली आहे’ असे सांगण्यास पाठविले. “परंतु ते प्रत्येकजण सारखेच सबबी सांगू लागले. पहिला म्हणाला, ‘मी नुकतेच शेत विकत घेतले आहे आणि ते मला जाऊन पहिले पाहिजे, म्हणून मला माफ करा.’ “दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करावयास जातो, म्हणून क्षमा असावी.’ “तिसरा म्हणाला, ‘मी नुकतेच लग्न केले आहे म्हणून मी येऊ शकत नाही.’ “शेवटी दास आपल्या धन्याकडे परत आला आणि त्याला सर्व सांगितले. त्यावेळी धनी खूप रागावला व त्याने दासाला आदेश दिला, ‘तू शहरातील रस्त्यांवर व गल्ल्याबोळात जा आणि भिकारी, लुळेपांगळे आणि आंधळे सापडतील, त्यांना आण.’  “ ‘स्वामी,’ दास म्हणाले, ‘आपल्या आदेशाप्रमाणे केले आहे, परंतु अजून पुष्कळ जागा रिकामी राहिली आहे.’ “त्यावेळी धनी दासाला म्हणाला, ‘आता गावातल्या रस्त्यावर आणि गल्लीत जा आणि जे तुला भेटतील, त्यांना आग्रहाने घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल. कारण ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना भोजनातले काहीही चाखावयास मिळणार नाही.’ ” लोकांचा मोठा घोळका येशूंच्या मागे चालला होता. तेव्हा ते मागे वळून लोकांना म्हणाले, “जो कोणी माझ्याकडे येतो आणि आपले आईवडील, पत्नी आणि मुले, भाऊ व बहिणी किंबहुना स्वतःच्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. “समजा कोणा एकास बुरूज बांधावयाचा असेल, तर प्रथम बसून खर्चाचा नीट अंदाज करून व तो पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे आहे की नाही याचा अंदाज घेत नाही का? कारण जर तुम्ही पाया घातला आणि नंतर जर तो पूर्ण करण्यास समर्थ झाला नाही, तर ते पाहून प्रत्येकजण त्याची थट्टा करतील. म्हणतील, ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली खरी, पण तो पूर्ण करू शकला नाही.’ “किंवा असा कोण राजा आहे की जो दुसर्‍या राजाच्या विरुद्ध युद्धास जाणार आहे. तो बसून विचार करणार नाही का, की जो वीस हजार सैनिक घेऊन येत आहे त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी त्याला दहा हजारांना घेऊन जाणे शक्य होईल का? जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधी मंडळ पाठवील. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याजवळ आहे त्या सर्व गोष्टींचा त्याग करीत नाही तर तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही. “मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला, तर त्याचा खारटपणा कशाने आणता येईल? ते जमिनीच्या व खताच्याही उपयोगाचे नाही; ते बाहेर टाकून दिले जाईल. “ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:15-35 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणीएकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य!” त्याने त्याला म्हटले, “कोणाएका मनुष्याने संध्याकाळची मोठी जेवणावळ केली, तेव्हा पुष्कळांना आमंत्रण केले. आणि जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे,’ असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. तेव्हा ते सगळे सारखेच निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे, ते मला जाऊन पाहिले पाहिजे; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, त्या मी तपासायला जातो; मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे, म्हणून माझे येणे होत नाही.’ मग त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वर्तमान सांगितले. तेव्हा घरधन्याला राग आला व तो आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांत व गल्ल्यांत लवकर जा, आणि दरिद्री, अपंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’ दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरी अद्यापि जागा आहे.’ धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व कुंपणांकडे जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये. कारण मी तुम्हांला सांगतो की, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.”’ त्याच्याबरोबर मोठमोठे लोकसमुदाय चालले होते; तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, “जर कोणी माझ्याकडे येईल पण आपला बाप, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांचा आणि आपल्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरूज बांधण्याची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही? नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’ अथवा असा कोण राजा आहे की तो दुसर्‍या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, ‘जो वीस हजार घेऊन माझ्यावर येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय?’ जर जाता येत नसेल तर तो दूर आहे तोच तो वकिलांना पाठवून सलोख्याचे बोलणे सुरू करील. म्हणून त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. मीठ हा चांगला पदार्थ आहे; पण मिठाचा खारटपणाच गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? ते जमिनीला किंवा उकिरड्यालाही उपयोगी नाही; ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको.”

सामायिक करा
लूक 14 वाचा

लूक 14:15-35 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणा एकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य.” त्याने त्याला म्हटले, “एका मनुष्याने संध्याकाळी जंगी मेजवानी द्यायचे ठरविले. पुष्कळांना आमंत्रण केले. जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे’, असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. ते सगळे निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे. ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत. त्या मी तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे म्हणून मला येता येणार नाही.’ त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वृत्त सांगितले. घरधन्याला राग आला व तो रागाने आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांवर व गल्ल्यांत जा; तेथील गरीब, व्यंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’ दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरीदेखील अजून जागा आहे.’ धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व वाटांवर जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल. मी तुम्हांला सांगतो, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.’” एकदा येशूबरोबर पुष्कळ लोक चालले होते, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, “जो कोणी माझ्याकडे येतो पण आपले वडील, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांच्यापेक्षा आणि आपल्या स्वतःपेक्षाही माझ्यावर अधिक प्रीती करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधायची इच्छा असता, तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज घेऊन आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही, हे पाहत नाही? अन्यथा पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’ अथवा असा कोण राजा आहे की, तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजारांचे सैन्य घेऊन माझ्यावर चाल करून येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल, तर तो दूर आहे तोच तो प्रतिनिधींना पाठवून सलोख्याचे बोलणे करील. त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? ते जमिनीकरता किंवा खताकरता उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकायला कान आहेत त्याने हे ऐकावे.”

सामायिक करा
लूक 14 वाचा