YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लूक 14:15-35

लूक 14:15-35 MRCV

येशूंच्या बरोबर पंक्तीस बसलेल्या एकाने हे ऐकले, व तो येशूंना म्हणाला, “धन्य आहे तो मनुष्य, जो परमेश्वराच्या राज्यातील मेजवानीत भोजन करील.” येशूंनी उत्तर दिले: “एक मनुष्य मोठी मेजवानी देण्याची तयारी करत होता आणि त्याने अनेक पाहुण्यांना आमंत्रणे दिली. मेजवानीच्या वेळेला त्याने त्याच्या दासांना ज्यांना आमंत्रणे दिली होती त्यांना, ‘चला आता भोजनाची सर्व तयारी झाली आहे’ असे सांगण्यास पाठविले. “परंतु ते प्रत्येकजण सारखेच सबबी सांगू लागले. पहिला म्हणाला, ‘मी नुकतेच शेत विकत घेतले आहे आणि ते मला जाऊन पहिले पाहिजे, म्हणून मला माफ करा.’ “दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत, मी त्यांची तपासणी करावयास जातो, म्हणून क्षमा असावी.’ “तिसरा म्हणाला, ‘मी नुकतेच लग्न केले आहे म्हणून मी येऊ शकत नाही.’ “शेवटी दास आपल्या धन्याकडे परत आला आणि त्याला सर्व सांगितले. त्यावेळी धनी खूप रागावला व त्याने दासाला आदेश दिला, ‘तू शहरातील रस्त्यांवर व गल्ल्याबोळात जा आणि भिकारी, लुळेपांगळे आणि आंधळे सापडतील, त्यांना आण.’  “ ‘स्वामी,’ दास म्हणाले, ‘आपल्या आदेशाप्रमाणे केले आहे, परंतु अजून पुष्कळ जागा रिकामी राहिली आहे.’ “त्यावेळी धनी दासाला म्हणाला, ‘आता गावातल्या रस्त्यावर आणि गल्लीत जा आणि जे तुला भेटतील, त्यांना आग्रहाने घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल. कारण ज्यांना आमंत्रण दिले होते, त्यांना भोजनातले काहीही चाखावयास मिळणार नाही.’ ” लोकांचा मोठा घोळका येशूंच्या मागे चालला होता. तेव्हा ते मागे वळून लोकांना म्हणाले, “जो कोणी माझ्याकडे येतो आणि आपले आईवडील, पत्नी आणि मुले, भाऊ व बहिणी किंबहुना स्वतःच्या जीवाचाही द्वेष करणार नाही तर तो माझा शिष्य होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे जो कोणी आपला क्रूसखांब उचलून घेऊन माझ्यामागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. “समजा कोणा एकास बुरूज बांधावयाचा असेल, तर प्रथम बसून खर्चाचा नीट अंदाज करून व तो पूर्ण करण्यासाठी पुरेसे पैसे आहे की नाही याचा अंदाज घेत नाही का? कारण जर तुम्ही पाया घातला आणि नंतर जर तो पूर्ण करण्यास समर्थ झाला नाही, तर ते पाहून प्रत्येकजण त्याची थट्टा करतील. म्हणतील, ‘या मनुष्याने बांधण्यास सुरुवात केली खरी, पण तो पूर्ण करू शकला नाही.’ “किंवा असा कोण राजा आहे की जो दुसर्‍या राजाच्या विरुद्ध युद्धास जाणार आहे. तो बसून विचार करणार नाही का, की जो वीस हजार सैनिक घेऊन येत आहे त्याच्याविरुद्ध लढण्यासाठी त्याला दहा हजारांना घेऊन जाणे शक्य होईल का? जर त्याला हे शक्य नसेल, तर शत्रू दूर आहे तेव्हाच शांतीच्या प्रस्तावाचे बोलणे करण्यासाठी प्रतिनिधी मंडळ पाठवील. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याजवळ आहे त्या सर्व गोष्टींचा त्याग करीत नाही तर तुम्हाला माझा शिष्य होता येणार नाही. “मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला, तर त्याचा खारटपणा कशाने आणता येईल? ते जमिनीच्या व खताच्याही उपयोगाचे नाही; ते बाहेर टाकून दिले जाईल. “ज्यांना ऐकावयास कान आहेत त्यांनी ऐकावे.”

लूक 14 वाचा