त्याच्याबरोबर भोजनास बसलेल्यांपैकी कोणा एकाने ह्या गोष्टी ऐकून त्याला म्हटले, “जो कोणी देवाच्या राज्यात भाकर खाईल तो धन्य.”
त्याने त्याला म्हटले, “एका मनुष्याने संध्याकाळी जंगी मेजवानी द्यायचे ठरविले. पुष्कळांना आमंत्रण केले. जेवणाच्या वेळेस, ‘आता या, तयारी झाली आहे’, असे आमंत्रितांना सांगायला त्याने आपल्या एका दासाला पाठवले. ते सगळे निमित्त सांगू लागले. पहिला त्याला म्हणाला, ‘मी शेत विकत घेतले आहे. ते मला जाऊन पाहिले पाहिजे. मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ दुसरा म्हणाला, ‘मी बैलांच्या पाच जोड्या विकत घेतल्या आहेत. त्या मी तपासायला जातो, मी तुला विनंती करतो, मला क्षमा असावी.’ आणखी एक जण म्हणाला, ‘मी लग्न केले आहे म्हणून मला येता येणार नाही.’
त्या दासाने येऊन आपल्या धन्याला हे वृत्त सांगितले. घरधन्याला राग आला व तो रागाने आपल्या दासाला म्हणाला, ‘नगराच्या रस्त्यांवर व गल्ल्यांत जा; तेथील गरीब, व्यंग, आंधळे व लंगडे ह्यांना इकडे घेऊन ये.’ दास म्हणाला, ‘महाराज, आपण आज्ञा केल्याप्रमाणे झाले आहे, तरीदेखील अजून जागा आहे.’ धनी दासाला म्हणाला, ‘माझे घर भरून जावे म्हणून सडकांवर व वाटांवर जाऊन लोकांना आग्रह करून घेऊन ये, म्हणजे माझे घर भरून जाईल. मी तुम्हांला सांगतो, त्या आमंत्रित माणसांपैकी एकालाही माझ्या जेवणातले काही चाखायला मिळणार नाही.’”
एकदा येशूबरोबर पुष्कळ लोक चालले होते, तेव्हा तो त्यांच्याकडे वळून म्हणाला, “जो कोणी माझ्याकडे येतो पण आपले वडील, आई, बायको, मुले, भाऊ व बहिणी ह्यांच्यापेक्षा आणि आपल्या स्वतःपेक्षाही माझ्यावर अधिक प्रीती करीत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही. जो कोणी स्वतःचा क्रूस घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही.
तुमच्यामध्ये असा कोण आहे की, त्याला बुरूज बांधायची इच्छा असता, तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज घेऊन आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही, हे पाहत नाही? अन्यथा पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही, तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, ‘हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु ह्याला तो पुरा करता आला नाही.’
अथवा असा कोण राजा आहे की, तो दुसऱ्या राजाबरोबर लढाईत सामना करण्यास निघाला असता अगोदर बसून विचार करत नाही की, जो वीस हजारांचे सैन्य घेऊन माझ्यावर चाल करून येतो, त्याच्यावर मला दहा हजारांनिशी जाता येईल काय? जर जाता येत नसेल, तर तो दूर आहे तोच तो प्रतिनिधींना पाठवून सलोख्याचे बोलणे करील. त्याचप्रमाणे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करत नाही, त्याला माझा शिष्य होता येणार नाही.
मीठ हा चांगला पदार्थ आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आणता येईल? ते जमिनीकरता किंवा खताकरता उपयोगी नाही. ते बाहेर टाकून देतात. ज्याला ऐकायला कान आहेत त्याने हे ऐकावे.”