ईयोब 1:1-5
ईयोब 1:1-5 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
ऊस देशात एक पुरूष राहत होता त्याचे नाव ईयोब होते, तो सात्वीक व सरळ होता, तो देवाचा आदर करीत असे व वाईटापासून दूर राही. ईयोबाला सात मुले आणि तीन मुली झाल्या. ईयोबाजवळ सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या, आणि पाचशे गाढवी होती. त्याच्याकडे पुष्कळ चांगले सेवकही होते. पूर्वेमधील सर्व लोकांमध्ये तो अतिशय थोर पुरूष होता. प्रत्येकाने ठरवलेल्या दिवशी त्याची मुले आपापल्या घरी भोजन समारंभ करीत असत आणि त्या सर्वांसोबत खाणे आणि पिणे करावयास त्यांच्या तिन्ही बहिणींनाही बोलवत असत. जेव्हा भोजनसमारंभाचे दिवस पूर्ण झाल्यावर, ईयोब त्यांना बोलवून त्यांची देवासाठी पुन्हा शुद्धी करी. तो मोठ्या पहाटेस लवकर ऊठे आणि त्याच्या प्रत्येक मुलासाठी होमार्पण करीत असे, तो म्हणत असे, “कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि त्यांच्या मनात देवाचा तिरस्कार केला असेल.” ह्याप्रमाणे ईयोब नित्य करीत असे.
ईयोब 1:1-5 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव ईयोब असे होते; तो सात्त्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही. त्याला सात पुत्र व तीन कन्या झाल्या. सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता. त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजनसमारंभ करीत, व त्या वेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावीत. हे भोजनसमारंभ आटोपल्यावर ईयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी; तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलींचे हवन करी; कारण तो म्हणे की, “न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल.” असा ईयोबाचा नित्यक्रम असे.