YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 1

1
ईयोबाच्या नीतिमत्तेची कसोटी
1ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव ईयोब असे होते; तो सात्त्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही.
2त्याला सात पुत्र व तीन कन्या झाल्या.
3सात हजार मेंढरे, तीन हजार उंट, बैलांच्या पाचशे जोड्या व पाचशे गाढवी एवढे त्याचे धन होते आणि त्याचा परिवार फार मोठा होता; असा तो पूर्व देशांतल्या सर्व लोकांत थोर होता.
4त्याचे पुत्र पाळीपाळीने एकमेकांच्या घरी भोजनसमारंभ करीत, व त्या वेळी आपल्या तिन्ही बहिणींना पंक्तीला बोलावीत.
5हे भोजनसमारंभ आटोपल्यावर ईयोब त्यांना बोलावून आणून त्यांची शुद्धी करी; तो प्रातःकाळी उठून त्या सर्वांच्या संख्येइतक्या बलींचे हवन करी; कारण तो म्हणे की, “न जाणो माझ्या पुत्रांनी पाप केले असेल आणि आपल्या मनाने देवाचा अव्हेर केला असेल.” असा ईयोबाचा नित्यक्रम असे.
6एक दिवस असा आला की त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले, व त्यांच्यामध्ये सैतानही आला.
7परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू आता कोठून आलास?” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडूनफिरून आलो आहे.”
8परमेश्वराने सैतानाला विचारले, “माझा सेवक ईयोब ह्याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा व पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.”
9सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की, “ईयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो?
10तो, त्याचे घर व त्याचे सर्वस्व ह्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना? तू त्याच्या हाताला यश दिले आहेस ना? व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना?
11तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील.”
12परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो; त्याला मात्र हात लावू नकोस.” मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला.
13एके दिवशी असे झाले की, ईयोबाचे पुत्र व कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत असता,
14एका जासुदाने ईयोबाकडे येऊन सांगितले, “बैल नांगरीत होते व त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या.
15तेव्हा शबाई लोक घाला घालून त्यांना घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले; हे तुला सांगायला मी एकटाच निभावून आलो आहे.”
16तो हे सांगत आहे इतक्यात दुसर्‍या एकाने येऊन सांगितले, “दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला; त्याने मेंढरे व गडी जाळून भस्म केले; हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.”
17तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, “खास्द्यांनी तीन टोळ्या करून उंटांवर घाला घातला व ते ते घेऊन गेले; त्यांनी तलवारीच्या धारेने गड्यांना वधले, हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.”
18तो सांगत आहे इतक्यात आणखी एकाने येऊन सांगितले, “तुझे पुत्र व कन्या ही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करीत व द्राक्षारस पीत होती,
19तेव्हा रानातून आलेल्या प्रचंड वार्‍याच्या सोसाट्याने त्या घराचे चार्‍ही कोपरे हादरले; त्यामुळे ते घर त्या तरुण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली; हे तुला सांगायला मी एकटा निभावून आलो आहे.”
20मग ईयोबाने उठून आपला झगा फाडला, आपले डोके मुंडले, व भुईवर पालथे पडून देवाला दंडवत घातले.
21तो म्हणाला, “मी मातेच्या उदरातून नग्न आलो आणि तसाच जेथून नग्न आलो तेथे परत जाणार आहे; परमेश्वराने दिले, आणि परमेश्वराने नेले; धन्य परमेश्वराचे नाम!”
22ह्या सर्व प्रसंगांत ईयोबाच्या हातून पाप झाले नाही; व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.

सध्या निवडलेले:

ईयोब 1: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन