YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 6:25-40

योहान 6:25-40 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरूजी, येथे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिलीत म्हणून नव्हे तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका; तर पिता जो देव ह्याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हांला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल त्यासाठी श्रम करा.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “देवाची कामे आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपणावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.” ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही; तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तोच देवाची भाकर होय.” म्हणून ते त्याला म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे; जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हांला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे; आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.”

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:25-40 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणि तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्यास म्हणाले, “रब्बी, आपण इकडे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. नष्ट होणार्‍या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्‍या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “आम्ही देवाची कामे करावीत म्हणून काय करावे?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” म्हणून ते त्यास म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की ते बघून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.’ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही. कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.”

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:25-40 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

ते त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर, त्यांना म्हणाले, “गुरुजी, आपण येथे कधी आला?” येशूंनी त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, मी जी चिन्हे केली, त्यामुळे नाही तर तुम्ही भाकरी खाल्या व तृप्त झाला म्हणूनच माझा शोध करीत आहात. नाशवंत अन्नासाठी कष्ट करू नका, तर जे अन्न सार्वकालिक जीवनासाठी टिकते व जे मानवपुत्र तुम्हाला देतो, ते मिळविण्यासाठी झटा, कारण परमेश्वरपित्याने आपल्या मान्यतेचा शिक्का त्यांच्यावर दिला आहे.” त्यावर त्यांनी विचारले, “असे कोणते काम करावे की ज्याची अपेक्षा परमेश्वर आम्हाकडून करतात?” येशू म्हणाले, “परमेश्वराचे कार्य हेच आहे: ज्यांना त्यांनी पाठविले त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” त्यावर ते म्हणाले, “आम्ही पाहून विश्वास ठेवावा असे आपणास वाटत असेल, तर आपण आम्हाला आणखी कोणती चिन्हे द्याल? आपण काय कराल? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला व असे लिहिले आहे: ‘त्यांनी त्यांना खाण्यासाठी स्वर्गातून भाकर दिली.’” येशू त्यांना म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो, ज्यांनी तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली तो मोशे नव्हता, परंतु माझा पिता जो स्वर्गातील खरी भाकर तुम्हाला देत आहे. ही परमेश्वराची भाकर आहे, जी स्वर्गातून उतरली आहे आणि जगाला जीवन देते.” ते म्हणाले, “प्रभूजी, हीच भाकर आपण आम्हाला नेहमी द्या.” त्यावर येशू जाहीरपणे म्हणाले, “मीच जीवनाची भाकर आहे. जो मजकडे येतो त्याला पुन्हा कधीही भूक लागणार नाही आणि जो मजवर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, तुम्ही मला प्रत्यक्ष पाहता तरी माझ्यावर विश्वास ठेवत नाही. जे सर्वजण पिता मला देतात, ते माझ्याकडे येतील आणि जे माझ्याकडे येतील त्यांना मी कधीच घालवून देणार नाही. कारण माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्यांनी मला पाठविले आहे, त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्यांनी मला पाठविले त्यांची इच्छा हीच आहे की त्यांनी जे मला दिलेले आहेत, त्यातील एकालाही मी हरवू नये, तर त्यांना शेवटच्या दिवशी मरणातून उठवावे. कारण माझ्या पित्याची इच्छा ही आहे की जे प्रत्येकजण पुत्राकडे पाहतात व त्याजवर विश्वास ठेवतात, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे आणि मी शेवटच्या दिवशी त्यांना उठवेन.”

सामायिक करा
योहान 6 वाचा

योहान 6:25-40 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरुवर्य, येथे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला निक्षून सांगतो, तुम्हांला माझ्या चिन्हांचा अर्थ समजला म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून तुम्ही माझा शोध घेता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर शाश्वत जीवनासाठी, टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. ते मनुष्याचा पुत्र तुम्हांला देईल; कारण परमेश्वर पित्याने त्याच्यावर मान्यतेचा शिक्का मारला आहे.” ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “देवाची कार्ये आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे कार्य हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की, जे पाहून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला. असे लिहिले आहे: ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खायला दिली.’” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तो परमेश्वराची भाकर आहे.” ते त्याला म्हणाले, “प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो, त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही, असे मी तुम्हांला सांगितले. ज्याला पिता माझ्याकडे सोपवतो, असा प्रत्येक जण माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो, त्याचा मी मुळीच अव्हेर करणार नाही. कारण स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले, त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व माझ्या स्वाधीन केले आहेत त्यांतून मी कुणालाही गमावू नये, तर शेवटच्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे. जे कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना शाश्वत जीवन प्राप्त व्हावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवावे ही माझ्या पित्याची इच्छा आहे.”

सामायिक करा
योहान 6 वाचा