YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहा. 6:25-40

योहा. 6:25-40 IRVMAR

आणि तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटला तेव्हा ते त्यास म्हणाले, “रब्बी, आपण इकडे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही चिन्हे बघितलीत म्हणून नाही, पण भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून माझा शोध करता. नष्ट होणार्‍या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्‍या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “आम्ही देवाची कामे करावीत म्हणून काय करावे?” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “देवाचे काम हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले आहे त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” म्हणून ते त्यास म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की ते बघून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्ला; पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘त्याने त्यास स्वर्गातून भाकर खाण्यास दिली.’ तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, मोशेने तुम्हास स्वर्गातील भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हास देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय.” तेव्हा ते त्यास म्हणाले, “प्रभूजी, ही भाकर आम्हास नित्य द्या.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहीले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हास सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही. कारण मी स्वर्गातून आलो तो स्वतःच्या इच्छेप्रमाणे करायला नाही, पण ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला आलो आहे. आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.”