YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 6:25-40

योहान 6:25-40 MACLBSI

तो त्यांना सरोवराच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, “गुरुवर्य, येथे कधी आलात?” येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला निक्षून सांगतो, तुम्हांला माझ्या चिन्हांचा अर्थ समजला म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झालात म्हणून तुम्ही माझा शोध घेता. नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर शाश्वत जीवनासाठी, टिकणाऱ्या अन्नासाठी श्रम करा. ते मनुष्याचा पुत्र तुम्हांला देईल; कारण परमेश्वर पित्याने त्याच्यावर मान्यतेचा शिक्का मारला आहे.” ह्यावरून त्यांनी त्याला विचारले, “देवाची कार्ये आमच्या हातून व्हावीत म्हणून आम्ही काय करावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे कार्य हेच आहे की, ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा.” ह्यावरून ते त्याला म्हणाले, “असे कोणते चिन्ह आपण दाखवता की, जे पाहून आम्ही आपल्यावर विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मान्ना खाल्‍ला. असे लिहिले आहे: ‘त्याने त्यांना स्वर्गातून भाकर खायला दिली.’” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खातरीपूर्वक सांगतो, मोशेने तुम्हांला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हांला देतो. कारण जो स्वर्गातून उतरतो व जगाला जीवन देतो तो परमेश्वराची भाकर आहे.” ते त्याला म्हणाले, “प्रभो, ही भाकर आम्हांला नित्य द्या.” येशू त्यांना म्हणाला, “मी जीवनाची भाकर आहे, जो माझ्याकडे येतो, त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो, त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही, असे मी तुम्हांला सांगितले. ज्याला पिता माझ्याकडे सोपवतो, असा प्रत्येक जण माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो, त्याचा मी मुळीच अव्हेर करणार नाही. कारण स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून मी स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले, त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व माझ्या स्वाधीन केले आहेत त्यांतून मी कुणालाही गमावू नये, तर शेवटच्या दिवशी मी त्या सर्वांना उठवावे. जे कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्यांना शाश्वत जीवन प्राप्त व्हावे आणि मी त्यांना शेवटच्या दिवशी उठवावे ही माझ्या पित्याची इच्छा आहे.”