योहान 3:1-16
योहान 3:1-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता, तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहात ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.” येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” निकदेम त्यास म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्यास आपल्या आईच्या उदरात दुसऱ्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहे. तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे, असे मी तुम्हास सांगितले याचे आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, पण तो कोठून येतो आणि कोठे जातो हे तुम्हास कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” निकदेमाने त्यास उत्तर देऊन म्हटले, “या गोष्टी कशा होऊ शकतील?” येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “तू इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हास या गोष्टी समजत नाही काय? मी तुम्हास खरे खरे सांगतो, जे आम्हास ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल? स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे.
योहान 3:1-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आता निकदेम नावाचा एक परूशी, जो यहूदी प्रतिनिधीमंडळाचा सभासद होता, तो रात्री येशूंकडे आला व म्हणाला, “गुरुजी, आपण शिक्षक आहात व परमेश्वराकडून आलेले आहात, हे आम्हास माहीत आहे. कारण ही जी चिन्हे आपण करत आहात, ती परमेश्वर बरोबर असल्याशिवाय करता येणार नाही.” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.” तेव्हा निकदेमाने विचारले, “जे वृद्ध आहेत त्यांचा नव्याने जन्म कसा होऊ शकेल? त्यांना दुसर्या वेळी आपल्या मातेच्या उदरात जाऊन जन्म घेता येणे शक्य नाही!” येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो. ‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कोठून आला व कोठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.” तेव्हा निकदेमाने विचारले, “पण हे कसे होईल?” “येशूंनी म्हटले, तुम्ही इस्राएलचे शिक्षक असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय? मी तुला निश्चित सांगतो की जे आम्हास समजले आहे ते आम्ही बोलतो आणि आम्ही जे काही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो आणि तरीही तुम्ही लोक आमची साक्ष मान्य करीत नाही. मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही; तर मग स्वर्गीय गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा ठेवाल? स्वर्गातून आलेल्या मानवपुत्राशिवाय इतर कोणीही स्वर्गात गेला नाही. जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल, जो कोणी त्याजवर विश्वास ठेवेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.” कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
योहान 3:1-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
परूश्यांपैकी निकदेम नावाचा एक मनुष्य होता; तो यहूद्यांचा एक अधिकारी होता. तो रात्रीचा येशूकडे येऊन त्याला म्हणाला, “गुरूजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात, हे आम्हांला ठाऊक आहे; कारण ही जी चिन्हे आपण करता ती देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करता येत नाहीत.” येशू त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचीत सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.” निकदेम त्याला म्हणाला, “म्हातारा झालेला मनुष्य कसा जन्म घेऊ शकेल? त्याला मातेच्या उदरात दुसर्यांदा जाणे व जन्म घेणे शक्य होईल काय?” येशूने उत्तर दिले की, “मी तुम्हांला खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. ‘तुम्हांला नव्याने जन्मले पाहिजे’ असे मी तुम्हांला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुम्हांला कळत नाही; जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असेच आहे.” निकदेम त्याला म्हणाला, “ह्या गोष्टी कशा होऊ शकतील?” येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलाचे गुरू असूनही तुम्हांला ह्या गोष्टी समजत नाहीत काय? मी तुम्हांला खचीत खचीत सांगतो की, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हांला सांगितल्या असता तुम्ही विश्वास धरत नाही तर स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्यास विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला [व स्वर्गात असलेला] जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे; ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.1 देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.
योहान 3:1-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
निकदेम नावाचा परुशी यहुदी लोकांचा एक अधिकारी होता. तो एकदा रात्रीच्या वेळी येशूकडे येऊन म्हणाला, “गुरुवर्य, आपण देवाकडून आलेले गुरू आहात, हे आम्हांला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करता, ती कोणालाही देव त्याच्या बरोबर असल्याशिवाय करता येणे शक्य नाही.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला खातरीपूर्वक सांगतो, नव्याने जन्मल्यावाचून कोणीही देवाचे राज्य पाहू शकत नाही.” निकदेम त्याला म्हणाला, “वयात आलेला मनुष्य पुन्हा कसा जन्म घेऊ शकेल? त्याला दुसऱ्यांदा मातेच्या उदरात जाणे व जन्म घेणे शक्य आहे काय?” येशूने उत्तर दिले, “मी तुला ठामपणे सांगतो, पाण्याने व आत्म्याने जन्म घेतल्यावाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेला देह आहे आणि आत्म्यापासून जन्मलेला आत्मा आहे. तुला नव्याने जन्मले पाहिजे, असे मी तुला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नकोस. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, तरी तो कुठून येतो व कुठे जातो, हे तुम्हांला कळत नाही, जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे, त्याचे असेच आहे.” निकदेमने त्याला विचारले, “हे कसे शक्य आहे?” येशूने त्याला उत्तर दिले, “तुम्ही इस्राएलचे गुरू असूनही तुम्हांला हे समजत नाही काय? मी तुम्हांला सत्य सांगतो, जे आम्हांला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो, परंतु तुम्ही आमची साक्ष मानत नाही. मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या असताना तुम्ही विश्वास धरीत नाही, मग स्वर्गातल्या गोष्टी तुम्हांला सांगितल्या तर विश्वास कसा धराल? स्वर्गातून उतरलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्याशिवाय कोणीही स्वर्गात चढून गेला नाही. जसा मोशेने अरण्यात सर्प वर उचलला होता, तसा मनुष्याचा पुत्रही वर उचलला गेला पाहिजे. ह्यासाठी की, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला शाश्वत जीवन मिळावे; कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर श्रद्धा ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला शाश्वत जीवन प्राप्त व्हावे.