YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 3:1-16

योहान 3:1-16 MRCV

आता निकदेम नावाचा एक परूशी, जो यहूदी प्रतिनिधीमंडळाचा सभासद होता, तो रात्री येशूंकडे आला व म्हणाला, “गुरुजी, आपण शिक्षक आहात व परमेश्वराकडून आलेले आहात, हे आम्हास माहीत आहे. कारण ही जी चिन्हे आपण करत आहात, ती परमेश्वर बरोबर असल्याशिवाय करता येणार नाही.” त्यावर येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, नवीन जन्म झाल्याशिवाय कोणालाही परमेश्वराचे राज्य पाहता येणार नाही.” तेव्हा निकदेमाने विचारले, “जे वृद्ध आहेत त्यांचा नव्याने जन्म कसा होऊ शकेल? त्यांना दुसर्‍या वेळी आपल्या मातेच्या उदरात जाऊन जन्म घेता येणे शक्य नाही!” येशूंनी उत्तर दिले, “मी तुला निश्चित सांगतो, पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्म झाल्याशिवाय कोणीही परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करू शकणार नाही. शरीर शरीरालाच आणि आत्मा आत्म्याला जन्म देतो. ‘तुझा नवीन जन्म झाला पाहिजे,’ या माझ्या विधानाचे आश्चर्य मानण्याचे कारण नाही. वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, परंतु तो कोठून आला व कोठे जाईल हे तुम्ही सांगू शकत नाही. तसेच जो प्रत्येकजण आत्म्यापासून जन्मतो त्यांच्या बाबतीत असेच आहे.” तेव्हा निकदेमाने विचारले, “पण हे कसे होईल?” “येशूंनी म्हटले, तुम्ही इस्राएलचे शिक्षक असूनही तुम्हाला या गोष्टी समजत नाही काय? मी तुला निश्चित सांगतो की जे आम्हास समजले आहे ते आम्ही बोलतो आणि आम्ही जे काही पाहिले आहे, त्याविषयी साक्ष देतो आणि तरीही तुम्ही लोक आमची साक्ष मान्य करीत नाही. मी पृथ्वीवरील गोष्टी तुम्हाला सांगितल्या तरी तुम्ही विश्वास ठेवीत नाही; तर मग स्वर्गीय गोष्टी तुम्हाला सांगितल्यास विश्वास कसा ठेवाल? स्वर्गातून आलेल्या मानवपुत्राशिवाय इतर कोणीही स्वर्गात गेला नाही. जसा मोशेने जंगलात साप उंच केला, त्याचप्रमाणे मानवपुत्रालाही उंच केले जाईल, जो कोणी त्याजवर विश्वास ठेवेल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल.” कारण परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की, जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो, त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.

योहान 3 वाचा

योहान 3:1-16 साठी चलचित्र