YouVersion लोगो
सर्च आयकॉन

योहान 11:38-57

योहान 11:38-57 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

येशू पुन्हा अंतःकरणात खवळून कबरेकडे आला. ती एक गुहा होती व तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, “धोंड काढा.” मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, “प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल; कारण त्यास मरून चार दिवस झाले आहेत.” येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” तेव्हा त्यांनी धोंड काढली; आणि येशूने डोळे वर करून म्हणाला, “हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. मला माहीत आहे की, तू माझे नेहमी ऐकतोस, तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की, तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.” असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.” तेव्हा मरियेकडे आलेल्या यहूदी लोकांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यातल्या पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण कित्येकांनी परूश्यांकडे जाऊन येशूने केले ते त्यांना सांगितले. मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे. आपण त्यास असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील; आणि रोमी लोक येऊन आपले स्थान आणि राष्ट्रही हिरावून घेतील.” तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी महायाजक होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्हास काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सर्व राष्ट्राचा नाश होऊ नये तुम्हास फायदेशीर आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही.” आणि हे तर तो आपल्या मनाचे बोलला नाही; तर त्या वर्षी तो मुख्य याजक असल्यामुळे त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्रासाठी मरणार आहे. आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमवून एक करावे. यावरुन त्या दिवसापासून, त्यांनी त्यास जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला. म्हणून त्यानंतर येशू यहूदी लोकात उघडपणे फिरला नाही; तर तेथून रानाजवळच्या प्रांतांतील एफ्राईम नावाच्या नगरास गेला व तेथे आपल्या शिष्यांबरोबर राहिला. तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता; आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर, आपणास शुद्ध करून घ्यावयास बाहेर गावाहून वर यरूशलेम शहरास गेले. आणि ते येशूला शोधित होते व ते परमेश्वराच्या भवनात उभे राहून त्यांनी एकमेकांना म्हणत होते, “तुम्हास काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?” आता मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्यास धरण्याच्या हेतूने अशी आज्ञा केली होती की, तो कोठे आहे असे जर कोणाला समजले तर त्याने कळवावे.

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:38-57 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

येशू पुन्हा व्याकूळ होऊन कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती. येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.” मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.” तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?” यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो. मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.” हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!” लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते. येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.” यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला. परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले. मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली. ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे. जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.” त्यांच्यापैकी कयफा नावाचा मनुष्य त्या वर्षी महायाजक होता, तो म्हणाला, “तुम्हाला काहीच माहीत नाही! तुम्ही हे देखील लक्षात आणत नाही की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होणे यापेक्षा लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे तुमच्या हिताचे आहे.” हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत, हे केवळ इस्राएली राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव. मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला. यामुळे येशू यहूदीया प्रांताच्या लोकांमध्ये उघडपणे फिरले नाहीत. तर त्याऐवजी ते अरण्याच्या जवळ असलेल्या एफ्राईम नावाच्या एका गावी आपल्या शिष्यांसह जाऊन राहिले. जेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला, तेव्हा सण सुरू होण्यापूर्वी शुद्धीकरणाचा विधी पार पाडावा म्हणून देशातील अनेक लोक वर यरुशलेममध्ये आले होते येशूंना ते शोधत होते, मंदिराच्या अंगणात उभे राहून ते एकमेकांना विचारीत होते, “तुम्हाला काय वाटते? तो वल्हांडण सणाला येणारच नाही काय?” इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील.

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:38-57 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

येशू पुन्हा मनात खवळून कबरेकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, “धोंड काढा.” त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.” येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” ह्यावरून [मृताला ठेवले होते तेथून] त्यांनी धोंड काढली; तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे बापा, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरता मी बोललो; ह्यासाठी की, तू मला पाठवले आहेस असा त्यांनी विश्वास धरावा.” असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.” मरीयेकडे आलेल्या यहूद्यांनी येशूने जे केले ते पाहिले, आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण कित्येकांनी परूश्यांकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. ह्यावरून मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करत आहोत? कारण तो मनुष्य तर पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील.” तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही; प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे, हेही तुम्ही लक्षात आणत नाही.” हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरता मरणार आहे. आणि केवळ त्या राष्ट्राकरता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरता. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्‍चय केला. ह्यामुळे येशू तेव्हापासून यहूदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरास गेला; आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. तेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता; आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणांस शुद्ध करून घ्यायला बाहेरगावांहून वर यरुशलेमेस गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? सणास तो मुळीच येणार नाही का?” मुख्य याजकांनी व परूश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, “तो कोठे आहे हे कोणाला कळल्यास त्याने खबर द्यावी.”

सामायिक करा
योहान 11 वाचा

योहान 11:38-57 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

येशू पुन्हा मनात कळवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर शिळा ठेवलेली होती. येशूने म्हटले, “शिळा बाजूला सारा.” मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभो, एव्हाना दुर्गंधी येत असेल कारण त्याला थडग्यात ठेवून चार दिवस झाले आहेत.” येशूने म्हटले, “तू विश्वास ठेवलास तर देवाचे वैभव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का?” हे ऐकून त्यांनी शिळा बाजूला सारली. येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी पण जे लोक सभोवती उभे आहेत त्यांचा तू मला पाठवले आहेस ह्यावर विश्वास बसावा, म्हणून मी हे बोललो.” असे बोलून झाल्यावर त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजर, बाहेर ये!” तेव्हा मृत मनुष्य बाहेर आला. त्याचे हातपाय कापडाने बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने लोकांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.” मरियेकडे आलेल्या यहुदी लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवली. परंतु काही लोकांनी परुश्यांकडे जाऊन येशूने काय केले ते सांगितले. तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवली आणि म्हटले, “आपण काय करणारआहोत? पाहा, तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करीत आहे! आपण त्याला असेच सोडले, तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले पवित्र स्थान व राष्ट्रही बळकावतील.” त्यांच्यापैकी कयफा नावाचा एक मनुष्य जो त्या वर्षी उच्च याजक होता, त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश टळावा, हे तुमच्या हिताचे आहे, हेदेखील तुमच्या लक्षात येत नाही का?” खरे म्हणजे हे तो आपल्या मनातले बोलला नाही, तर त्या वर्षी तो उच्च याजक होता म्हणून त्याने भाकीत केले की, येशू राष्ट्राकरता मरणार होता आणि केवळ त्या राष्ट्रासाठीच नव्हे तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांना जमवून एकत्र करावे ह्याकरता तो मरणार होता. त्या दिवसापासून यहुदी अधिकाऱ्यांनी त्याला ठार मारण्याचा आपसात बेत रचला. म्हणूनच येशू तेव्हापासून यहुदियामध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरात गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. त्या वेळी यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक ओलांडण सणाच्या आधी आपल्याला शुद्ध करून घेण्यासाठी बाहेरगावाहून यरुशलेमला गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे असताना एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? तो सणासाठी येणार नाही का?” मुख्य याजकांनी व परुश्यांनी तर त्याला अटक करण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, तो कुठे आहे, हे कोणाला कळल्यास त्याने त्यांना खबर द्यावी.

सामायिक करा
योहान 11 वाचा