येशू पुन्हा व्याकूळ होऊन कबरेजवळ आले. ती एक गुहा होती आणि तिच्या प्रवेशद्वारावर धोंड लोटलेली होती. येशू म्हणाले, “धोंड बाजूला काढा.”
मृत माणसाची बहीण मार्था म्हणाली, “परंतु प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी सुटली असेल, कारण त्याला तिथे ठेऊन चार दिवस झाले आहेत.”
तेव्हा येशू म्हणाले, “मी तुला सांगितले नव्हते काय, की जर तू विश्वास ठेवशील तर परमेश्वराचे गौरव पाहशील?”
यास्तव त्यांनी ती धोंड बाजूला केली. मग येशूंनी दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तुम्ही माझे ऐकले म्हणून मी तुमचे आभार मानतो. मला माहीत आहे की तुम्ही नेहमीच माझे ऐकता, परंतु सर्व लोक जे येथे उभे आहेत, त्यांच्या हिताकरिता मी हे बोललो, यासाठी की तुम्ही मला पाठविले आहे यावर त्यांनी विश्वास ठेवावा.”
हे बोलल्यावर, येशू मोठ्याने हाक मारून म्हणाले, “लाजरा, बाहेर ये!” लाजर बाहेर आला, त्याचे हातपाय पट्ट्यांनी बांधलेले होते व तोंडाभोवती कापड गुंडाळलेले होते.
येशूंनी लोकांस म्हटले, “त्याची प्रेतवस्त्रे काढा आणि त्याला जाऊ द्या.”
यामुळे मरीयेला भेटावयास आलेल्या अनेक यहूद्यांनी येशूंनी जे केले ते पाहिले व त्याजवर विश्वास ठेवला. परंतु काहीजण परूश्यांकडे गेले आणि येशूंनी काय केले ते त्यांना सांगितले. मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी न्यायसभा बोलावली.
ते विचारू लागले, “आपण काय साध्य केले आहे? या ठिकाणी हा मनुष्य अनेक चिन्हे करीत आहे. जर आपण त्याला असेच करत राहू दिले, तर प्रत्येकजण त्याच्यावर विश्वास ठेवेल आणि रोमी येतील व आपले मंदिर व आपले राष्ट्र दोन्ही ताब्यात घेतील.”
त्यांच्यापैकी कयफा नावाचा मनुष्य त्या वर्षी महायाजक होता, तो म्हणाला, “तुम्हाला काहीच माहीत नाही! तुम्ही हे देखील लक्षात आणत नाही की, संपूर्ण राष्ट्राचा नाश होणे यापेक्षा लोकांसाठी एका मनुष्याने मरावे हे तुमच्या हिताचे आहे.”
हे तो आपल्या मनाचे बोलला नाही, त्या वर्षाचा महायाजक म्हणून त्याने भविष्य केले की, येशू यहूदी राष्ट्राकरिता मरणार आहेत, हे केवळ इस्राएली राष्ट्रासाठीच नव्हे, तर परमेश्वराच्या सर्व पांगलेल्या मुलांना एकत्र आणावे आणि एक करावे यास्तव. मग त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा कट केला.
यामुळे येशू यहूदीया प्रांताच्या लोकांमध्ये उघडपणे फिरले नाहीत. तर त्याऐवजी ते अरण्याच्या जवळ असलेल्या एफ्राईम नावाच्या एका गावी आपल्या शिष्यांसह जाऊन राहिले.
जेव्हा यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला, तेव्हा सण सुरू होण्यापूर्वी शुद्धीकरणाचा विधी पार पाडावा म्हणून देशातील अनेक लोक वर यरुशलेममध्ये आले होते येशूंना ते शोधत होते, मंदिराच्या अंगणात उभे राहून ते एकमेकांना विचारीत होते, “तुम्हाला काय वाटते? तो वल्हांडण सणाला येणारच नाही काय?” इकडे मुख्य याजकांनी आणि परूश्यांनी उघडपणे आज्ञा केली की, येशू कोणाला आढळल्यास त्याने ताबडतोब सूचना द्यावी म्हणजे ते त्यांना अटक करतील.