येशू पुन्हा मनात कळवळून कबरीकडे आला. ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर शिळा ठेवलेली होती. येशूने म्हटले, “शिळा बाजूला सारा.” मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभो, एव्हाना दुर्गंधी येत असेल कारण त्याला थडग्यात ठेवून चार दिवस झाले आहेत.”
येशूने म्हटले, “तू विश्वास ठेवलास तर देवाचे वैभव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते का?” हे ऐकून त्यांनी शिळा बाजूला सारली. येशूने दृष्टी वर करून म्हटले, “हे पित्या, तू माझे ऐकलेस म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी पण जे लोक सभोवती उभे आहेत त्यांचा तू मला पाठवले आहेस ह्यावर विश्वास बसावा, म्हणून मी हे बोललो.” असे बोलून झाल्यावर त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले, “लाजर, बाहेर ये!” तेव्हा मृत मनुष्य बाहेर आला. त्याचे हातपाय कापडाने बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने लोकांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”
मरियेकडे आलेल्या यहुदी लोकांपैकी पुष्कळ जणांनी येशूने जे केले ते पाहिले आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवली. परंतु काही लोकांनी परुश्यांकडे जाऊन येशूने काय केले ते सांगितले.
तेव्हा मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवली आणि म्हटले, “आपण काय करणारआहोत? पाहा, तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करीत आहे! आपण त्याला असेच सोडले, तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमन लोक येऊन आपले पवित्र स्थान व राष्ट्रही बळकावतील.”
त्यांच्यापैकी कयफा नावाचा एक मनुष्य जो त्या वर्षी उच्च याजक होता, त्यांना म्हणाला, “तुम्हांला काहीच कळत नाही. प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सबंध राष्ट्राचा नाश टळावा, हे तुमच्या हिताचे आहे, हेदेखील तुमच्या लक्षात येत नाही का?” खरे म्हणजे हे तो आपल्या मनातले बोलला नाही, तर त्या वर्षी तो उच्च याजक होता म्हणून त्याने भाकीत केले की, येशू राष्ट्राकरता मरणार होता आणि केवळ त्या राष्ट्रासाठीच नव्हे तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांना जमवून एकत्र करावे ह्याकरता तो मरणार होता.
त्या दिवसापासून यहुदी अधिकाऱ्यांनी त्याला ठार मारण्याचा आपसात बेत रचला. म्हणूनच येशू तेव्हापासून यहुदियामध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगरात गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला.
त्या वेळी यहुदी लोकांचा ओलांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक ओलांडण सणाच्या आधी आपल्याला शुद्ध करून घेण्यासाठी बाहेरगावाहून यरुशलेमला गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे असताना एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? तो सणासाठी येणार नाही का?” मुख्य याजकांनी व परुश्यांनी तर त्याला अटक करण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, तो कुठे आहे, हे कोणाला कळल्यास त्याने त्यांना खबर द्यावी.