YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6:11-32

शास्ते 6:11-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आणखी परमेश्वराचा दूत येऊन अबियेजेरी योवाश याच्या अफ्रा येथील एला झाडाखाली बसला; तेव्हा त्याचा पुत्र गिदोन मिद्यांन्यापासून गहू लपवावा म्हणून द्राक्षकुंडात गव्हाची मळणी करत होता. आणि परमेश्वराचा दूत त्यास दर्शन देऊन त्यास बोलला, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” तेव्हा गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, जर परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्या बाबतीत का घडले? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर आणले आणि त्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमचे पूर्वज आम्हाजवळ सांगत आले, परमेश्वराने आम्हांला मिसरातून वर आणले की नाही? आता तर परमेश्वराने आमचा त्याग करून आम्हांला मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.” मग परमेश्वराने त्याच्याकडे बघितले आणि म्हटले, “तू आपल्या या बळाने जा, आणि इस्राएलांना मिद्यान्यांच्या ताब्यातून सोडव; मी तुला पाठवले आहे की नाही?” गिदोन त्यास बोलला, “हे माझ्या प्रभू, मी इस्राएलला कसा सोडवणार? पाहा, मनश्शेत माझे घराणे कमजोर आहे, आणि मी आपल्या पित्याच्या घरात कमी महत्त्वाचा आहे.” परमेश्वर त्यास बोलला, “खरोखर मी तुझ्याबरोबर राहीन, जसे एका मनुष्यास मारावे तसे तू एकजात सर्व मिद्यान्यांना ठार करशील.” गिदोन त्यास बोलला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर असली तर तूच माझ्याशी बोलत आहेस याविषयी मला काही चिन्ह दाखव. मी तुला विनंती करतो, मी तुझ्याकडे येईपर्यंत तू येथून जाऊ नको; म्हणजे मी आपली भेट आणून तुझ्यापुढे ठेवीन.” तेव्हा तो बोलला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबतो.” गिदोनाने जाऊन एक करडू व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी तयार केल्या; त्याने मांस टोपलीत घातला आणि रस्सा पातेल्यात घातला, मग त्याच्याजवळ एला झाडाखाली नेऊन ते सादर केले. तेव्हा देवाच्या दूताने त्यास सांगितले, “तू मांस व बेखमीर भाकरी या खडकावर आणून ठेव, आणि त्यावर रस्सा ओत.” मग गिदोनाने तसे केले. तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातातल्या काठीच्या टोकाने मांसास व बेखमीर भाकरीला स्पर्श केला; मग खडकातून अग्नी निघाला आणि त्याने ते मांस व बेखमीर भाकरी भस्म केल्या; परमेश्वराचा दूतही निघून गेला आणि यापुढे गिदोन त्यास पाहू शकला नाही. तेव्हा गिदोनाला समजले की तो परमेश्वराचा दूत होता; गिदोन म्हणाला, हाय हाय, “हे प्रभू देवा! कारण मी परमेश्वराचा दूत समोरासमोर, पाहिला आहे!” परमेश्वर त्यास म्हणाला, “तुला शांती असो! भिऊ नको, तू मरणार नाहीस.” तेव्हा गिदोनाने तेथे परमेश्वरासाठी वेदी बांधली, त्याचे नाव परमेश्वर शांती आहे, असे ठेवले; ती आजपर्यंत अबियेजेऱ्यांच्या अफ्रा येथे अजून आहे. आणि असे झाले की, त्याच रात्री परमेश्वराने त्यास सांगितले की, “तू आपल्या पित्याचा गोऱ्हा घे आणि सात वर्षांचा दुसरा गोऱ्हा घे आणि आपल्या बापाची बआल देवासाठीची वेदी ती मोडून टाक आणि तिच्याजवळची अशेरा कापून टाक. मग या खडकाच्या उच्चस्थानी आपला देव परमेश्वर याच्यासाठी वेदी बांध आणि योग्य मार्गाने बांधणी कर. त्या दुसऱ्या गोऱ्ह्याचे होमार्पण, अशेराच्या तोडलेल्या लाकडाचा उपयोग करून कर.” तेव्हा गिदोनाने आपल्या चाकरातील दहा माणसे बरोबर घेऊन जसे परमेश्वराने त्यास सांगितले होते तसे केले; परंतु असे झाले की, दिवस असता ते करायला तो आपल्या वडिलाच्या घराण्याला व त्या नगराच्या मनुष्यांना घाबरला, यास्तव रात्री त्याने केले. मग सकाळी त्या नगराची माणसे उठली तर पाहा, बआलाची वेदी मोडलेली होती तिच्याजवळची अशेराही तोडलेली होते आणि बांधलेल्या वेदीवर दुसऱ्या गोऱ्ह्याचा होम केलेला होता. तेव्हा ते एकमेकांना म्हणाले, “ही गोष्ट कोणी केली? मग त्यांनी विचारपूस व शोध केल्यावर म्हटले, योवाशाचा पुत्र गिदोन, याने ही गोष्ट केली आहे.” नंतर त्या नगराच्या मनुष्यांनी योवाशाला सांगितले, “तू आपल्या पुत्राला बाहेर आण, त्यास तर मारावयाचे आहे, कारण त्याने बआलाची वेदी मोडून टाकली आणखी तिच्याजवळची अशेराची मूर्ती तोडून टाकली आहे.” तेव्हा योवाश आपणावर जे उठले होते त्या सर्वांना म्हणाला, “बआलाचा कैवार तुम्ही घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याचा कैवार घेईल तो आज सकाळ आहे तोच मारला जावो; जर तो देव असला तर, ज्याने त्याची वेदी मोडली त्याच्याविरुध्द त्याने स्वत:चा कैवार घ्यावा.” तेव्हा त्याच दिवशी त्याने त्यास “यरूब्बाल” म्हटले, तो म्हणाला, “गिदोनाने बआलाची वेदी पाडून टाकली म्हणून बआलानेच त्याच्याविरुध्द स्वतःचा बचाव करावा,” कारण त्याची वेदी गिदोनाने मोडून वेगळी केली.

सामायिक करा
शास्ते 6 वाचा

शास्ते 6:11-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला; त्या वेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” गिदोन त्याला म्हणाला, “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हांला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हांला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.” तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, “तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडव; मी तुला पाठवले आहे ना?” तो त्याला म्हणाला, “प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कूळ मनश्शे वंशात सर्वांत दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.” परमेश्वर त्याला म्हणाला, “खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात सार्‍या मिद्यानाला तू मारशील.” तो त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव. मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून तू जाऊ नकोस.” तो म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन.” गिदोनाने आत जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी केल्या; त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव व त्यावर रस्सा ओत.” त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला, आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या; ह्यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, “हाय, हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे.” परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे क्षेम असो; भिऊ नकोस, तू मरायचा नाहीस.” मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हे-शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले; अबियेजर्‍यांच्या अक्रा येथे ती आजपर्यंत आहे. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, “आपल्या बापाचा गोर्‍हा म्हणजे दुसरा गोर्‍हा जो सात वर्षांचा आहे तो घे; तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्‍या गोर्‍ह्याचे हवन कर.” गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोर्‍हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे. ते एकमेकांना विचारू लागले, “हे काम कोणी केले असावे?” विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, “हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे.” मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.” तेव्हा योवाश आपल्यावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल; तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणार्‍याविरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी.” म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल (बआलाने बाजू लढवावी) असे ठेवले. तो म्हणाला, “त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी.”

सामायिक करा
शास्ते 6 वाचा