YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6

6
गिदोनाला पाचारण
1इस्राएल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते केले; तेव्हा परमेश्वराने त्यांना सात वर्षे मिद्यानाच्या हाती दिले.
2मिद्यानाचा हात इस्राएलावर प्रबळ झाला; मिद्यानाच्या भीतीने इस्राएल लोकांनी डोंगराडोंगरातून आपल्यासाठी विवरे, गुहा व दुर्ग तयार केले.
3मग असे होई की, शेते पेरल्यावर मिद्यानी, अमालेकी आणि पूर्वेकडचे रहिवासी त्यांच्यावर चढाई करत आणि ते त्यांच्यावर हल्ला करत;
4आणि त्यांच्यासमोर तळ देऊन गज्जाच्या परिसरापर्यंतच्या पिकाचा नाश करत व इस्राएलात अन्न, शेरडेमेंढरे, गाईबैल, गाढवे वगैरे काहीएक उरू देत नसत.
5कारण ते आपले पशू व डेरे घेऊन चढाई करत आणि टोळधाडीप्रमाणे उतरत. ते व त्यांचे उंट अगणित होते; अशा प्रकारे ते देश उजाड करायला येत असत.
6मिद्यानामुळे इस्राएलाची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला.
7मिद्यानाच्या जाचामुळे इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला,
8तेव्हा परमेश्वराने इस्राएल लोकांकडे एक संदेष्टा पाठवला; तो त्यांना म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो की, मी तुम्हांला मिसर देशातून काढून आणले, दास्यगृहातून तुम्हांला बाहेर आणले;
9मिसर्‍यांच्या आणि जे कोणी तुम्हांला गांजत होते त्या सर्वांच्या हातून तुम्हांला सोडवले आणि त्यांना तुमच्यापुढून घालवून देऊन त्यांचा देश तुम्हांला दिला;
10आणि मी तुम्हांला म्हणालो की, मीच तुमचा देव परमेश्वर आहे; ज्या अमोर्‍यांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या देवांना भिऊ नका; पण तुम्ही माझी वाणी ऐकली नाही.”
11मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला; त्या वेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता.
12त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”
13गिदोन त्याला म्हणाला, “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हांला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हांला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.”
14तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, “तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडव; मी तुला पाठवले आहे ना?”
15तो त्याला म्हणाला, “प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कूळ मनश्शे वंशात सर्वांत दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.”
16परमेश्वर त्याला म्हणाला, “खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात सार्‍या मिद्यानाला तू मारशील.”
17तो त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव.
18मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून तू जाऊ नकोस.” तो म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन.”
19गिदोनाने आत जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी केल्या; त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले.
20तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव व त्यावर रस्सा ओत.” त्याप्रमाणे त्याने केले.
21मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला, आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या; ह्यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला.
22हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, “हाय, हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे.”
23परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे क्षेम असो; भिऊ नकोस, तू मरायचा नाहीस.”
24मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हे-शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले; अबियेजर्‍यांच्या अक्रा येथे ती आजपर्यंत आहे.
25त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, “आपल्या बापाचा गोर्‍हा म्हणजे दुसरा गोर्‍हा जो सात वर्षांचा आहे तो घे; तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक.
26मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्‍या गोर्‍ह्याचे हवन कर.”
27गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले.
28नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोर्‍हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे.
29ते एकमेकांना विचारू लागले, “हे काम कोणी केले असावे?” विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, “हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे.”
30मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.”
31तेव्हा योवाश आपल्यावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल; तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणार्‍याविरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी.”
32म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल (बआलाने बाजू लढवावी) असे ठेवले. तो म्हणाला, “त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी.”
33नंतर सर्व मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे रहिवासी एकत्र जमून यार्देनेपलीकडे गेले व त्यांनी इज्रेलाच्या खोर्‍यात तळ दिला.
34परमेश्वराच्या आत्म्याने गिदोनाच्या ठायी संचार केला, तेव्हा त्याने रणशिंग फुंकले आणि अबियेजेरी त्याला येऊन मिळाले.
35आणि त्याने मनश्शेत सर्वत्र जासूद पाठवले तेव्हा तेही त्याला येऊन मिळाले. त्याप्रमाणेच आशेर, जबुलून व नफताली ह्यांच्याकडे त्याने जासूद पाठवले, आणि तेही त्याला येऊन मिळण्यासाठी निघाले.
36मग गिदोन देवाला म्हणाला, “तू आपल्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते इस्राएलाचा उद्धार करणार असलास,
37तर पाहा, मी ह्या खळ्यात कातरलेली लोकर ठेवतो; रात्री फक्त तिच्यावर दहिवर पडून बाकी सर्व जमीन कोरडी राहिली, तर तुझ्या वचनाप्रमाणे माझ्या हस्ते तू इस्राएलाचा उद्धार करणार आहेस हे मला कळेल.”
38तसाच प्रकार घडून आला. दुसर्‍या दिवशी पहाटे उठून त्याने ती लोकर दाबून तिच्यातले दहिवर पिळून एक वाटीभर पाणी काढले.
39मग गिदोन देवाला म्हणाला, “माझ्यावर रागावू नकोस; मला आणखी एकदाच बोलू दे. कृपया ह्या लोकरीने मला आणखी एकदाच प्रतीती पाहू दे. ह्या खेपेस लोकर तेवढी कोरडी राहू दे आणि सार्‍या जमिनीवर दहिवर पडू दे.”
40त्या रात्री देवाने तसेच केले; म्हणजे ती लोकर मात्र कोरडी राहिली व सगळ्या जमिनीवर दहिवर पडले.

सध्या निवडलेले:

शास्ते 6: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन