YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 7

7
गिदोनाचे सैन्य मिद्यानी लोकांचा पराभव करते
1मग यरुब्बाल म्हणजे गिदोन आणि त्याच्याबरोबरचे सर्व लोक ह्यांनी पहाटेस उठून एन-हरोद1 येथे तळ दिला; त्यांच्या उत्तरेस मोरे टेकडीजवळील खोर्‍यात मिद्यानाची छावणी होती.
2परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “तुझ्याबरोबर असलेले लोक फारच आहेत; इतक्या लोकांच्या हाती मिद्यान्यांना द्यावे असे मला वाटत नाही. दिले तर मीच माझ्या मनगटाच्या जोरावर विजय मिळवला आहे अशी फुशारकी माझ्यापुढे इस्राएल मारील.
3म्हणून आता लोकांना ऐकू जाईल असे जाहीर कर की, ज्याला भीती वाटत असेल किंवा जो घाबरट असेल त्याने गिलाद डोंगरावरून निघून परत जावे.” तेव्हा त्यांच्यातून बावीस हजार लोक परत गेले आणि दहा हजार राहिले.
4मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; त्यांना पाणवठ्यावर घेऊन चल, म्हणजे तेथे मी तुझ्या वतीने त्यांना पारखीन. मी तुला सांगेन की अमक्याने तुझ्याबरोबर जावे तर त्याने तुझ्याबरोबर जावे, आणि मी तुला सांगेन अमक्याने तुझ्याबरोबर जाऊ नये तर त्याने जाऊ नये.”
5त्याप्रमाणे त्याने लोकांना पाणवठ्यावर नेले. तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “कुत्रा जिभेने पाणी चाटून पितो त्याप्रमाणे जो पाणी पिईल त्याला बाजूला काढ; तसेच गुडघे टेकून जो पिईल त्याला बाजूला काढ.”
6जे तोंडाशी हात नेऊन पाणी चाटून प्याले ते तीनशे भरले; बाकीचे लोक गुडघे टेकून पाणी प्याले.
7तेव्हा परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “चाटून पाणी पिणार्‍या ह्या तीनशे लोकांकरवी मी तुमचा बचाव करीन आणि मिद्यानाला तुझ्या हाती देईन; बाकीच्या लोकांनी आपल्या ठिकाणी जावे.”
8मग त्या लोकांनी अन्नसामग्री व लोकांकडली रणशिंगे हाती घेतली; त्याने बाकीच्या सर्व इस्राएल लोकांना आपापल्या डेर्‍यांकडे पाठवून दिले, पण त्या तीनशे लोकांना मात्र ठेवून घेतले. मिद्यानाची छावणी खाली खोर्‍यात होती.
9त्याच रात्री परमेश्वर त्याला म्हणाला, “ऊठ, खाली उतर, त्या छावणीवर चाल कर, कारण ती मी तुझ्या हाती दिली आहे.
10तुला खाली उतरायला भीती वाटत असली तर आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीकडे जा.
11आणि ते काय बोलत असतील ते ऐक, म्हणजे तुला त्या छावणीवर चाल करायला हिंमत येईल.” मग तो आपला सेवक पुरा ह्याला बरोबर घेऊन छावणीच्या सीमेवर एका टोकाला हत्यारबंद संत्री होते त्यांच्याजवळ गेला.
12त्या खोर्‍यात मिद्यानी, अमालेकी व पूर्वेकडचे लोक टोळधाडीप्रमाणे पसरले होते. त्यांचे उंट समुद्रकिनार्‍यावरील वाळूप्रमाणे अगणित होते.
13गिदोन तेथे गेला तेव्हा एक जण आपल्या सोबत्याला आपले स्वप्न सांगत होता; तो म्हणाला, “ऐक, मी स्वप्नात पाहिले की, सातूची एक भाकर घरंगळत मिद्यानाच्या छावणीत येऊन पडली. तिने डेर्‍याला असा धक्का दिला की तो पडला; तो उलटून पडला व भुईसपाट झाला.”
14त्याच्या सोबत्याने उत्तर दिले, “योवाशाचा मुलगा गिदोन ह्या इस्राएली पुरुषाची ही तलवार होय, दुसरे काही नव्हे; त्याच्या हाती देवाने मिद्यान व त्याचे सर्व सैन्य दिले आहे.”
15ते स्वप्न व त्याचा अर्थ ऐकून गिदोनाने दंडवत घातले; मग तो इस्राएलाच्या छावणीत परत येऊन म्हणाला, “ऊठा, कारण परमेश्वराने मिद्यानाचे सैन्य तुमच्या हाती दिले आहे.”
16त्याने त्या तीनशे लोकांच्या तीन तुकड्या केल्या; त्या सर्वांच्या हातांत त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले; त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या.
17तो त्यांना म्हणाला, “माझ्याकडे पाहा, आणि मी करतो तसे करा; छावणीच्या सीमेवरील टोकावर मी पोहचलो म्हणजे मी करीन तसे करा.
18मी व माझ्याबरोबरचे सर्व जण रणशिंगे फुंकू तेव्हा तुम्हीही छावणीच्या सभोवती रणशिंगे फुंका आणि म्हणा, ‘परमेश्वराचा जय, गिदोनाचा जय!”’
19रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला तेव्हा गिदोन आपल्या शंभर पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला; मग त्यांनी रणशिंगे फुंकून आपल्या हातांतील घडे फोडून टाकले.
20तेव्हा त्या तिन्ही तुकड्यांनी रणशिंगे फुंकून घडे फोडून टाकले आणि आपल्या डाव्या हातात दिवट्या आणि उजव्या हातात फुंकण्यासाठी रणशिंगे घेऊन परमेश्वराची तलवार, गिदोनाची तलवार असा घोष केला.
21तेव्हा छावणीच्या सभोवती प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी उभा राहिला व ती सर्व सेना पळू लागली; तिने ओरडत ओरडत पळ काढला.
22त्यांनी ती तीनशे रणशिंगे फुंकली तेव्हा परमेश्वराने प्रत्येक माणसाची तलवार त्याच्या सोबत्यांवर व सर्व सेनेवर चालवली; तेव्हा ती सेना सरेराजवळच्या बेथ-शिट्टापर्यंत व टब्बाथाजवळच्या आबेल-महोलाच्या सीमेपर्यंत पळून गेली.
23मग नफताली, आशेर व सर्व मनश्शे येथल्या इस्राएल लोकांना बोलावण्यात आले व त्यांनी मिद्यानाचा पाठलाग केला.
24गिदोनाने एफ्राइमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून लोकांना सांगितले की, “मिद्यान्यांना अडवायला या आणि बेथ-बारापर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” त्याप्रमाणे एफ्राइमाच्या सगळ्या लोकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंतचे उतार रोखून धरले.
25त्यांनी मिद्यानाचे ओरेब व जेब ह्या नावांचे दोन सरदार पकडले; त्यांनी ओरेबाला ओरेबाच्या खडकावर जिवे मारले व जेबाला जेबाच्या द्राक्षकुंडाजवळ जिवे मारले आणि मिद्यानांचा पाठलाग केला; त्यांनी ओरेब व जेब ह्यांची मुंडकी यार्देनेपार गिदोनाकडे नेली.

सध्या निवडलेले:

शास्ते 7: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन