YouVersion लोगो
सर्च आयकॉन

शास्ते 6:11-32

शास्ते 6:11-32 MARVBSI

मग परमेश्वराचा दूत अफ्रा येथे येऊन योवाश अबियेजेरी ह्याच्या एला वृक्षाखाली बसला; त्या वेळी त्याचा मुलगा गिदोन मिद्यान्यांपासून गव्हाचा बचाव करण्यासाठी द्राक्षकुंडात त्याची झोडणी करत होता. त्याला परमेश्वराच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “हे बलवान वीरा, परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” गिदोन त्याला म्हणाला, “महाराज, परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर हे सर्व आमच्यावर का यावे? परमेश्वराने आम्हांला मिसरातून बाहेर नाही का आणले असे म्हणत त्याच्या ज्या अद्भुत कृत्यांविषयी आमचे वाडवडील आम्हांला सांगत ती कोठे आहेत? परमेश्वराने आता आम्हांला टाकून देऊन मिद्यान्यांच्या हाती दिले आहे.” तेव्हा परमेश्वर त्याच्याकडे वळून म्हणाला, “तू आपल्या बळाचा उपयोग कर आणि जाऊन इस्राएलाला मिद्यानाच्या हातून सोडव; मी तुला पाठवले आहे ना?” तो त्याला म्हणाला, “प्रभो, इस्राएलाला मी कसा सोडवणार? माझे कूळ मनश्शे वंशात सर्वांत दरिद्री आहे; तसाच मी आपल्या वडिलांच्या घराण्यात अगदी कनिष्ठ आहे.” परमेश्वर त्याला म्हणाला, “खरोखर मी तुझ्याबरोबर असेन; जसे एका माणसाला मारावे तसे एकजात सार्‍या मिद्यानाला तू मारशील.” तो त्याला म्हणाला, “तुझी माझ्यावर कृपादृष्टी झाली असल्यास तूच माझ्याशी बोलत आहेस ह्याचे मला काही चिन्ह दाखव. मी आपले अर्पण आणून तुझ्यासमोर सादर करीपर्यंत कृपया येथून तू जाऊ नकोस.” तो म्हणाला, “तू परत येईपर्यंत मी येथेच थांबेन.” गिदोनाने आत जाऊन एक करडू सिद्ध केले व एफाभर सपिठाच्या बेखमीर भाकरी केल्या; त्याने मांस टोपलीत घालून आणि रस्सा पातेल्यात घालून ते एला वृक्षाखाली आणून त्याला सादर केले. तेव्हा देवाचा दूत त्याला म्हणाला, “मांस व बेखमीर भाकरी घेऊन ह्या खडकावर ठेव व त्यावर रस्सा ओत.” त्याप्रमाणे त्याने केले. मग परमेश्वराच्या दूताने आपला हात पुढे करून हातातल्या काठीच्या टोकाने त्या मांसाला व बेखमीर भाकरींना स्पर्श केला, तेव्हा खडकातून अग्नी निघाला, आणि त्याने ते मांस व त्या बेखमीर भाकरी भस्म केल्या; ह्यानंतर परमेश्वराचा दूत त्याच्यापुढून अंतर्धान पावला. हा परमेश्वराचा दूत होता हे गिदोनाच्या लक्षात आले तेव्हा तो म्हणाला, “हाय, हाय, हे प्रभू परमेश्वरा! खरोखरच परमेश्वराचा दूत मी प्रत्यक्ष पाहिला आहे.” परमेश्वर त्याला म्हणाला, “तुझे क्षेम असो; भिऊ नकोस, तू मरायचा नाहीस.” मग गिदोनाने तेथे परमेश्वराप्रीत्यर्थ वेदी बांधली व तिचे नाव याव्हे-शालोम (शांतिदाता परमेश्वर) असे ठेवले; अबियेजर्‍यांच्या अक्रा येथे ती आजपर्यंत आहे. त्याच रात्री परमेश्वराने गिदोनाला म्हटले, “आपल्या बापाचा गोर्‍हा म्हणजे दुसरा गोर्‍हा जो सात वर्षांचा आहे तो घे; तुझ्या बापाची बआल देवाची वेदी पाडून टाक व तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाक. मग त्या खडकाच्या उच्चभागी आपला देव परमेश्वर ह्याच्यासाठी विहित केलेल्या पद्धतीप्रमाणे वेदी बांध आणि तू फोडलेल्या अशेरा मूर्तीची लाकडे तिच्यावर ठेवून त्यावर त्या दुसर्‍या गोर्‍ह्याचे हवन कर.” गिदोनाने आपल्याबरोबर आपल्या नोकरांपैकी दहा जणांना घेऊन परमेश्वराने त्याला सांगितल्याप्रमाणे केले, पण आपल्या बापाचे घराणे व नगरचे लोक ह्यांच्या भीतीने ते काम दिवसा न करता त्याने ते रात्री केले. नगरवासी मोठ्या पहाटेस उठून पाहतात तर बआल देवाची वेदी मोडून पडली आहे आणि तिच्याजवळ असलेली अशेरा मूर्ती तोडून टाकलेली आहे आणि तो दुसरा गोर्‍हा नवीन बांधलेल्या वेदीवर अर्पण केला आहे. ते एकमेकांना विचारू लागले, “हे काम कोणी केले असावे?” विचारपूस व बारीक चौकशी केल्यावर ते म्हणाले, “हे काम योवाशाचा मुलगा गिदोन ह्याचेच आहे.” मग नगरवासी योवाशाला म्हणू लागले, “तुझ्या मुलाला बाहेर आण; त्याला मारून टाकायचे आहे, कारण त्याने बआल देवाची वेदी पाडून टाकली आहे आणि तिच्याजवळची अशेरा मूर्ती तोडून टाकली आहे.” तेव्हा योवाश आपल्यावर उठलेल्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बआलाची बाजू घेता काय? तुम्ही त्याचा बचाव करू पाहता काय? जो त्याची बाजू घेईल त्याला पहाटेपर्यंत ठार करण्यात येईल; तो जर देव असला तर त्याची वेदी पाडून टाकणार्‍याविरुद्ध त्याने स्वतःची बाजू लढवावी.” म्हणून त्या दिवशी त्याने गिदोनाचे नाव यरुब्बाल (बआलाने बाजू लढवावी) असे ठेवले. तो म्हणाला, “त्याने बआलाची वेदी पाडून टाकली आहे म्हणून बआलाने स्वतः त्याच्याविरुद्ध आपली बाजू लढवावी.”