YouVersion लोगो
सर्च आयकॉन

यशया 53:1-7

यशया 53:1-7 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे? कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते. तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले. त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्‍यांपुढे गप्प राहणार्‍या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही.

सामायिक करा
यशया 53 वाचा

यशया 53:1-7 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे? कारण तो एखाद्या रोपट्याप्रमाणे परमेश्वरासमोर वाढला आणि शुष्क भूमीवर अंकुराप्रमाणे वाढला; त्याच्यात उल्लेखनीय रुप किंवा सौंदर्य नव्हते. जेव्हा आम्ही त्यास पाहीले, आम्हास आकर्षित करून घेईल अशी सुंदरता त्याच्यात नव्हती. लोकांनी तुच्छ मानलेला आणि नाकारलेला; दुःखी आणि यातनेशी परिचित तो मनुष्य होता. ज्याच्यापासून लोक आपले तोंड लपवत, असा तो तुच्छ होता; आणि आम्ही त्यास किरकोळ मानले. पण खरोखर त्याने आमचे विकार आणि आमचे दुःख आपल्यावर घेऊन वाहिले; तरी आम्ही देवाने त्यास शिक्षा केलेली, देवाने त्यास हाणलेला आणि पीडलेला असा आम्ही विचार केला. पण आमच्या बंडखोर कृत्यांच्या कारणांमुळे तो भोसकला गेला; आमच्या अपराधांमुळे तो चिरडला गेला. आमच्या शांतीसाठी त्याच्यावर शिक्षा आली, त्याच्या जखमांनी आम्हास आरोग्य मिळाले. पण आम्ही मेंढराप्रमाणे बहकून दूर गेलो होतो; आम्ही सर्व आपापल्या मार्गात फिरलो होतो, आणि परमेश्वराने आमचे सर्व अपराध त्याच्यावर ठेवले. त्याच्यावर अत्याचार झाले; तरी जेव्हा त्याने आपल्या स्वतःला नम्र केले तेव्हा त्याने आपले तोंडही उघडले नाही; जसे कोकरू कापणाऱ्यापुढे आणि मेंढी लोकर कातणाऱ्यासमोर शांत राहते, तसे त्याने आपले तोंड उघडले नाही.

सामायिक करा
यशया 53 वाचा

यशया 53:1-7 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

आमच्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आणि याहवेहचा भुज कोणाला प्रकट झाला आहे? त्यांच्यासमोर तो कोवळ्या अंकुरासारखा वाढला, शुष्क भूमीतून उगविलेल्या मुळासारखा होता. आम्हाला आकर्षित करेल असे कोणतेही सौंदर्य वा वैभव त्याच्यामध्ये नव्हते, तो आम्हाला हवासा वाटेल असे त्याच्या स्वरुपात काहीही नव्हते. मनुष्यांनी त्याला तुच्छ लेखले आणि त्याला नाकारले, कारण क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असा तो पुरुष होता. जणू एखाद्याला पाहून लोकांनी आपली तोंडे लपवावी तसा तो तिरस्कृत व खालच्या दर्जात गणलेला होता. तरी देखील त्याने आमचे दुःख स्वतःवर घेतले, आणि आमचे क्लेश वाहिले, आम्हाला मात्र वाटले की परमेश्वरानेच त्याला ही शिक्षा दिली, त्यांनीच दुःखी केले व ही पीडा दिली. परंतु तो आमच्या अपराघांमुळे भोसकला गेला, तो आमच्या पापामुळे चिरडला गेला; आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याच्यावर आली, आणि त्याच्या जखमांद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आम्ही सर्व मेंढराप्रमाणे भटकून गेलो होतो, आम्हा प्रत्येकाने स्वतःचेच मार्ग धरले होते; आणि याहवेहने आम्हा सर्वांचा दोष त्याच्यावर लादला. त्याला छळले व जाचले, तरीही त्याने आपले मुख उघडले नाही; वधावयाला नेणाऱ्या कोकराप्रमाणे त्याला नेण्यात आले, आणि लोकर कातरणार्‍यांसमोर मेंढरू जसे स्तब्ध राहते, तसेच त्याने आपले मुख उघडले नाही.

सामायिक करा
यशया 53 वाचा