यशया 53
53
1आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे?
2कारण तो त्याच्यापुढे रोपासारखा, रुक्ष भूमीतील अंकुरासारखा वाढला; त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, त्याच्याकडे पाहिले तर त्याच्यावर मन बसेल असे त्याच्या ठायी सौंदर्य नव्हते.
3तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंडे फिरवत व त्याला तुच्छ लेखत; आणि त्याला आम्ही मानले नाही.
4खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले; तरी त्याला ताडन केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले.
5खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला; आम्हांला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली; त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हांला आरोग्य प्राप्त झाले.
6आम्ही सर्व मेंढरांप्रमाणे बहकून गेलो होतो; आम्ही प्रत्येकाने आपापला मार्ग धरला होता; अशा आम्हा सर्वांचे पाप परमेश्वराने त्याच्यावर लादले.
7त्याचे हालहाल केले तरी ते त्याने सोसले, आपले तोंडसुद्धा उघडले नाही; वधण्यास नेत असलेल्या कोकराप्रमाणे, लोकर कातरणार्यांपुढे गप्प राहणार्या मेंढराप्रमाणे, तो गप्प राहिला; त्याने आपले तोंड उघडले नाही.
8त्याच्यावर जुलूम करून व खटला चालवून त्याला घेऊन गेले; जिवंतांच्या भूमीतून त्याला काढून टाकले, आणि माझ्या लोकांच्या पातकांमुळे त्याला ताडन करण्यात आले; असा त्या पिढीच्या लोकांपैकी कोणीतरी विचार केला काय?
9त्याची कबर दुर्जनांच्या कबरांमध्ये नेमली होती आणि तो मेल्यावर धनवंताची कबर त्याला प्राप्त झाली; तथापि त्याने काही अधर्म केला नव्हता, त्याच्या मुखात काही कपट नव्हते.
10त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जीस आले. त्याने त्याला पिडले; त्याच्या जिवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहील, तो दीर्घायू होईल, त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल.
11त्याच्या जिवाच्या वेदना सरल्यावर तो त्यांचे फल पाहून समाधान पावेल; तो माझा नीतिमान सेवक आपल्या ज्ञानाने बहुतांना निर्दोष ठरवील;1 त्यांच्या अधर्माचा भार तो आपल्यावर घेईल.
12ह्यामुळे मी त्याला थोरांबरोबर विभाग देईन, तो बलवानांबरोबर लूट वाटून घेईल; कारण आपला प्राण वाहू देऊन तो मृत्यू पावला, त्याने आपणास अपराध्यांत गणू दिले; त्याने बहुतांचे पाप आपल्यावर घेतले व अपराध्यांसाठी मध्यस्थी केली.
सध्या निवडलेले:
यशया 53: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.