हबक्कूक 3:13-19
हबक्कूक 3:13-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू तुझ्या लोकांच्या तारणासाठी, तुझ्या अभिषिक्ताच्या तारणासाठी पुढे गेलास! तू दुष्टाच्या घराचा माथा छिन्नविछिन्न केला आहे, व त्याचा पाया मानेपर्यंत उघडा केला आहे, सेला! ते प्रचंड वादळाप्रमाणे आम्हास पांगवण्यास आले असता, तू त्यांचेच भाले त्यांच्या सैनिकांच्या डोक्यात भोसकले, गरीब मनुष्यास एकांतात खाऊन टाकावे, ह्यामध्ये त्यांची तृप्तता होती. पण तू तुझ्या घोड्यांना समुद्रातून कूच करायला लावलेस, त्यामुळे समुद्र घुसळला गेला. मी ऐकले तेव्हा माझे अंग थरथरले, माझे ओठ आवाजाने कापले! माझी हाडे कुजण्यास सुरूवात झाली आहे, आणि मी आपल्या ठिकाणी कापत आहे. म्हणून मी धीराने नाशाच्या दिवसाची, शत्रू आमच्यावर हल्ला करील, त्या दिवसाची वाट पाहत आहे. जरी अंजिराच्या झाडांनी फळ दिले नाही आणि द्राक्षवेलींना काही उपज आले नाही, जैतूनाच्या झाडाच्या उपजाने जरी निराशा झाली आणि शेतांतून अन्न उगवले नाही, कळप वाड्यातून नाहीसे झाले असले, गोठ्यात गाई-गुरे उरली नसली, तरी मी परमेश्वराठायी आनंद करीन, माझ्या तारणाऱ्या देवाजवळ उल्लास करीन. प्रभू परमेश्वर माझे बळ आहे, तो माझे पाय हरणींच्या पायासारखे करतो, आणि तो मला माझ्या उंचस्थानावर चालवील. (मुख्य वाजवणाऱ्यासाठी, माझ्या तंतुवाद्यावरचे गायन.)
हबक्कूक 3:13-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व अभिषिक्तांना वाचविण्यासाठी बाहेर पडलात. तुम्ही दुष्ट भूमीच्या पुढाऱ्यांचा चुराडा केला आणि त्यांना डोक्यापासून पायांपर्यंत विवस्त्र केले. सेला आमची दाणादाण करण्यासाठी त्यांचे योद्धे धावून आले, तेव्हा त्याने स्वतःच्याच भाल्याने आपले मस्तक छेदून घेतले, लपलेल्या दुष्टास जणू तो गिळंकृत करेल अशा हावरटपणाने तो आला. तुमच्या घोड्यांनी समुद्रास असे तुडविले, की महाजलाशय घुसळले. मी हे ऐकले आणि माझ्या हृदयात धडकी भरली, भीतीने माझे ओठ कापू लागले; माझ्या हाडात नाशाने प्रवेश केला, आणि माझे पाय थरथरू लागले. तरी देखील मी आमच्यावर आक्रमण करणाऱ्या देशावर येणाऱ्या संकटाच्या दिवसाची शांतपणे वाट पाहत राहीन. अंजिरांची झाडे ना बहरली आणि द्राक्षलतांवर फळे राहिली नाहीत, जैतुनाचे सर्व पीक बुडाले आणि शेते नापीक झाली, जरी मेंढवाड्यात मेंढरे राहिली नाहीत, गोठ्यात गुरे नाहीत, तरी मी याहवेहच्या ठायी आनंद करेन; मला तारण देणार्या परमेश्वराच्या ठायी मी हर्ष करेन. सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत; मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील.
हबक्कूक 3:13-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तू आपल्या लोकांच्या सुटकेसाठी निघाला आहेस. आपल्या अभिषिक्ताच्या सुटकेसाठी निघाला आहेस; तू दुर्जनांचे घर पायापासून मानेपर्यंत उघडे करतोस, त्याच्या शिराचे आपटून तुकडे करतोस. (सेला) त्याच्या सरदारांचे शीर तू ज्याच्या-त्याच्याच भाल्यांनी विंधतोस; माझा चुराडा करण्यासाठी ते माझ्यावर तुफानासारखे लोटले; गरिबांना गुप्तरूपे गिळावे ह्यातच त्यांना संतोष वाटतो. तू आपले घोडे समुद्रातून, महाजलांच्या राशीवरून चालवतोस. मी हे ऐकले तेव्हा माझे काळीज थरथरले, त्याच्या आवाजाने माझे ओठ कापले; माझी हाडे सडू लागली; माझे पाय लटपटत आहेत; ज्या दिवशी लोकांवर हल्ला करणारा येईल, त्या संकटाच्या दिवसाची मला वाट पाहिली पाहिजे. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणार्या देवाविषयी मी उल्लास करीन. परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो. [मुख्य गवयासाठी, माझ्या तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे]