YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 44:18-34

उत्पत्ती 44:18-34 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

मग यहूदा योसेफाजवळ जाऊन म्हणाला, “माझे धनी, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला कानात बोलू द्या आणि माझ्यावर राग भडकू देऊ नका. आपण फारो राजासमान आहात. माझ्या धन्याने आपल्या सेवकाला विचारले होते, ‘तुम्हास बाप किंवा भाऊ आहे का?’ आणि आम्ही आपल्या धन्याला म्हणालो, होय, आमचा बाप आहे, तो म्हातारा आहे तसेच वडिलाच्या म्हातारपणी झालेला लहान भाऊ आहे. आणि त्याचा भाऊ मरण पावला आहे. त्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे. आणि त्याचा बाप त्याच्यावर प्रीती करतो. आणि तुम्ही आपल्या सेवकांना म्हणाला, ‘मग त्यास माझ्याकडे घेऊन या. मला त्यास पाहावयाचे आहे.’ आणि आम्ही स्वामीस म्हणालो, तो मुलगा बापाला सोडून येऊ शकणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर आमचा बाप मरून जाईल. परंतु आपण आम्हांला बजावून सांगितले, ‘तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला घेऊन आलेच पाहिजे नाही, तर तुम्ही माझे तोंड पुन्हा पाहू शकणार नाही.’ मग असे झाले की, आम्ही तुमचा सेवक आमचा बाप याच्याकडे परत गेलो व आमचा धनी जे बोलला ते त्यास सांगितले. आणि आमचा बाप म्हणाला, पुन्हा जाऊन आपणासाठी धान्य विकत आणा. आणि आम्ही म्हणालो, आमच्या धाकट्या भावाला बरोबर घेतल्याशिवाय जाणार नाही, कारण तुमच्या धाकट्या भावाला माझ्याकडे आणल्याखेरीज तुम्हास माझे तोंड पुन्हा पाहता येणार नाही, असे त्या अधिकाऱ्याने आम्हास बजावले आहे. मग तुमचा सेवक आमचा बाप म्हणाला, तुम्हास माहीत आहे की, माझ्या पत्नीच्या पोटी मला दोन पुत्र झाले. आणि त्यातला एक माझ्यापासून दूर निघून गेला आहे आणि मी म्हणालो, खरोखर त्यास वन्य पशूने फाडून तुकडे तुकडे केले आणि तेव्हापासून मी त्यास पाहिले नाही. आणि आता माझ्या या मुलाला तुम्ही माझ्यापासून घेऊन गेला आणि त्यास जर काही अपाय झाला तर तुम्ही माझे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला कारण व्हाल. म्हणून आता तुझा सेवक, माझा बाप याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला तर याच्या जिवाशी त्याचा जीव जडलेला असल्यामुळे, असे होईल की, मुलगा नाही हे पाहून तो मरून जाईल. आणि तुमचा चाकर, आमचा बाप याचे पिकलेले केस शोकाने मृतलोकात जायला तुझे सेवक कारण होतील. या मुलाबद्दल मी माझ्या पित्यास हमी दिली आहे. मी म्हटले, ‘जर मी त्यास तुमच्याकडे परत घेऊन आलो नाही तर मग जन्मभर मी तुमचा दोषी राहीन.’ म्हणून आता, मी तुम्हास विनंती करतो, मला, तुमच्या या सेवकाला या मुलाच्याऐवजी माझ्या धन्याचा गुलाम म्हणून ठेवून घ्या. मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्या. माझ्या बापाकडे मी माघारी कसा जाऊ? माझ्या बापाचे वाईट होईल ते मला पाहावे लागेल याची मला भयंकर भीती वाटते.”

सामायिक करा
उत्पत्ती 44 वाचा

उत्पत्ती 44:18-34 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तेव्हा यहूदाह पुढे सरसावून म्हणाला, “महाराज, तुमच्या सेवकाला क्षमा करा, मला एक शब्द बोलू द्या, क्षणभर माझे ऐकून घ्या. कृपया, आपल्या सेवकावर रागावू नका, कारण तुम्ही प्रत्यक्ष फारोहसमान आहात. महाराज, तुमच्या सेवकांना तुम्ही विचारले होते की, तुम्हाला वडील आहेत का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का? आणि आम्ही आमच्या प्रभूला उत्तर दिले की, ‘आम्हाला वृद्ध वडील आहेत आणि अशा वृद्धापकाळातच त्यांना एक पुत्र झाला. त्याचा भाऊ मरण पावला आहे आणि त्याच्या आईला झालेल्या पुत्रांपैकी तो एकटाच उरलेला आहे आणि त्याचे वडील त्याच्यावर खूप प्रीती करतात.’ “तेव्हा तुम्ही तुमच्या सेवकांना म्हणाले, ‘त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी त्याला पाहू शकेन.’ आणि आम्ही आमच्या महाराजास म्हणालो, ‘तो मुलगा आपल्या वडिलांना सोडू शकत नाही; जर त्याने वडिलांना सोडले तर त्याचे वडील मरतील.’ पण तुम्ही आपल्या सेवकांना सांगितले की, ‘जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासोबत आला नाही तर तुम्ही माझे मुख पाहू शकणार नाही.’ जेव्हा आम्ही परत तुमचा सेवक आमच्या पित्याकडे जाऊन पोहोचलो, आम्ही त्यांना महाराज काय म्हणाले ते सांगितले. “आमच्या वडिलांनी म्हटले, ‘परत जा आणि थोडे धान्य विकत घेऊन या.’ परंतु आम्ही म्हणालो, ‘आम्ही खाली जाऊ शकत नाही, जर आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असला तरच आम्ही जाणार. आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असल्याशिवाय आम्ही त्या मनुष्याचे मुख पाहू शकणार नाही.’ “मग तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या पत्नीने माझ्या दोन पुत्रांना जन्म दिला. त्यापैकी एक माझ्यापासून दूर गेला तेव्हा मी म्हणालो, “त्याला एखाद्या श्वापदाने फाडून त्याचे तुकडे केले असावेत,” त्यानंतर मी त्याला पहिले नाही. जर यालाही तुम्ही माझ्यापासून घेऊन जाल आणि त्याच्यावरही संकट आले तर तुम्ही माझ्या पिकलेल्या केसाला दुःखाने कबरेत लोटण्यास कारणीभूत व्हाल.’ “आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो, आणि मुलगा आमच्याबरोबर नाही असे जर त्यांनी पाहिले तर ते प्राण सोडतील आणि त्यांच्या पिकलेल्या केसांना दुःखात व कबरेत लोटण्यास आम्ही कारणीभूत होऊ. तुमच्या सेवकाने आमच्या वडिलांना अभिवचन दिले आहे की, मुलाची मी काळजी घेईन. मी त्यांना सांगितले की, ‘मी जर त्याला परत आणले नाही तर त्याचा दोष माझ्या जीवनात सदैव माझ्या माथ्यावर राहील!’ “म्हणून महाराज, कृपा करा आणि त्या मुलाऐवजी मलाच येथे तुमचा गुलाम म्हणून राहू द्या आणि मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या. कारण मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी माझ्या वडिलांकडे कसे जाऊ शकतो? माझ्या वडिलांना होणारे दुःख मला पाहवणार नाही.”

सामायिक करा
उत्पत्ती 44 वाचा

उत्पत्ती 44:18-34 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग यहूदा जवळ जाऊन म्हणाला, “स्वामी, कृपा करून आपल्या दासाला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची परवानगी मिळावी; आपला राग आपल्या दासावर भडकू नये; आपण तर फारोसमान आहात. स्वामींनी आपल्या दासांना विचारले होते की, ‘तुम्हांला बाप किंवा भाऊ आहे काय?’ तेव्हा आम्ही स्वामींना सांगितले की आमचा म्हातारा बाप आहे आणि त्याला म्हातारपणी झालेले एक मूल आहे; त्याचा भाऊ मरून गेला आहे, त्याच्या आईचा तो तेवढाच राहिला आहे, आणि त्याच्या बापाचे त्याच्यावर प्रेम आहे. आपण आपल्या दासांना म्हणालात की, “त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहीन.” आम्ही स्वामींना म्हणालो की, ‘त्या मुलाला आपल्या बापाला सोडून येता येणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर बाप नक्की मरेल.’ आपण आपल्या दासांना म्हणालात, ‘तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर आला नाही तर तुम्हांला माझे तोंड पाहता येणार नाही.’ आपला दास आमचा बाप ह्याच्याकडे जाऊन आम्ही पोहचलो तेव्हा स्वामींनी सांगितले ते आम्ही त्याला कळवले. पुढे आमच्या बापाने म्हटले, ‘पुन्हा जाऊन आपल्यासाठी काही अन्नसामग्री विकत घेऊन या.’ तेव्हा आम्ही म्हटले, ‘आम्हांला पुन्हा जाताच येत नाही. आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असेल तरच आम्ही जाऊ, कारण तो आमच्याबरोबर नसला, तर त्या मनुष्याचे तोंडदेखील आम्हांला पाहायला मिळायचे नाही.’ आपला दास, आमचा बाप आम्हांला म्हणाला, ‘तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या स्त्रीला दोन मुलगे झाले; त्यांतल्या एकाला मी अंतरलो, तेव्हा मी म्हणालो की खरोखर त्याला वनपशूने फाडून टाकले असावे, आजवर तो माझ्या दृष्टीस पडला नाही; आता तुम्ही ह्यालाही माझ्याजवळून नेले आणि त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दु:खी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरवायला कारण व्हाल.’ तर आपला दास, माझा बाप ह्याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला, तर ह्या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्याकारणाने मुलगा नाही हे पाहून तो तत्काळ प्राण सोडील; अशाने आपल्या ह्या दासांमुळे आपला दास, आमचा बाप, ह्याला दु:खी करून त्याचे पिकलेले केस आम्हीच अधोलोकी उतरवले असे होईल. माझ्या बापाजवळ ह्या मुलाबद्दल मी जामीन झालो आहे; मी म्हणालो की, मी ह्याला आपणाकडे परत आणले नाही, तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन. तर आता मी विनंती करतो की, ह्या मुलाऐवजी आपल्या ह्या दासाला स्वामींनी गुलाम म्हणून ठेवावे आणि ह्या मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्यावे. कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापाला दु:ख होईल ते मला पाहवणार नाही.”

सामायिक करा
उत्पत्ती 44 वाचा