YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 44

44
हरवलेला प्याला
1मग त्याने आपल्या घरकारभार्‍याला आज्ञा केली की, “ह्या मनुष्यांच्या गोणीत त्यांना नेता येईल तितकी अन्नसामग्री भर आणि प्रत्येकाचा पैसा ज्याच्या-त्याच्या गोणीच्या तोंडाशी ठेव.
2आणि धाकट्याच्या गोणीच्या तोंडाशी धान्याच्या पैशाबरोबर माझा प्याला, माझा चांदीचा प्याला ठेव.” योसेफाच्या सांगण्याप्रमाणे त्याने केले.
3सकाळी उजाडताच त्या माणसांची त्यांच्या गाढवांसह रवानगी झाली.
4ते नगर सोडून थोडे दूर गेले नाहीत तोच योसेफ आपल्या कारभार्‍याला म्हणाला, “चल, त्या माणसांच्या पाठोपाठ जा आणि त्यांना गाठल्यावर म्हण, तुम्ही बर्‍याची फेड वाइटाने का केली? (माझा चांदीचा प्याला तुम्ही का चोरला?) 5ज्याने माझा धनी पितो व ज्याने शकुनही पाहतो तो हाच नव्हे काय? तुम्ही हे केले ते फार वाईट केले.”
6तो त्यांना गाठून ह्याप्रमाणे बोलला.
7ते त्याला म्हणाले, “स्वामींनी असे शब्द का बोलावे? असली गोष्ट करणे आपल्या दासांपासून दूरच असो.
8पाहा, जो पैसा आमच्या गोण्यांच्या तोंडी सापडला तोदेखील कनानाहून परत आणून आपल्याला दिला, तर आपल्या स्वामींच्या घरातले सोनेरुपे आम्ही चोरणार कसे? 9आपल्या दासांपैकी ज्या कोणाजवळ तो सापडेल त्याला मारून टाकावे, आणि आम्हीही त्या आमच्या स्वामीचे गुलाम होऊ.”
10तो त्यांना म्हणाला, “तर आता तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होऊ द्या; ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तो माझा गुलाम होईल व बाकीचे तुम्ही निरपराध ठराल.”
11तेव्हा त्यांनी त्वरा करून आपापली गोणी उतरवून जमिनीवर ठेवली आणि सोडली.
12त्याने थोरल्यापासून आरंभ करून धाकट्यापर्यंत त्यांची झडती घेतली तेव्हा तो प्याला बन्यामिनाच्या गोणीत सापडला.
13ते पाहून त्यांनी आपली वस्त्रे फाडली आणि आपली गाढवे लादून ते सगळे नगरात परत आले.
14जेव्हा यहूदा व त्याचे भाऊ योसेफाच्या घरी गेले, तेव्हा तो तेथेच होता, आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले.
15योसेफ त्यांना म्हणाला, “हे कसले कृत्य तुम्ही केले? माझ्यासारख्या माणसाला शकुन पाहता येतो हे तुम्हांला ठाऊक नाही काय?”
16यहूदा म्हणाला, “आम्ही स्वामींपुढे काय बोलावे? आम्ही काय सांगावे? आमच्यावरचा हा आरोप दूर कसा करावा? आपल्या दासांचा गुन्हा देवाने पकडला आहे; तर आता आम्ही आणि ज्याच्याजवळ प्याला सापडला तो, असे सर्व स्वामींचे दास झालो आहोत.”
17तो म्हणाला, “माझ्या हातून असे न घडो; ज्याच्याजवळ हा प्याला सापडला तोच माझा गुलाम होईल, तुम्ही आपल्या पित्याकडे सुखरूप जा.”
बन्यामिनासाठी यहूदा मध्यस्थी करतो
18मग यहूदा जवळ जाऊन म्हणाला, “स्वामी, कृपा करून आपल्या दासाला आपल्या कानात एक शब्द सांगण्याची परवानगी मिळावी; आपला राग आपल्या दासावर भडकू नये; आपण तर फारोसमान आहात.
19स्वामींनी आपल्या दासांना विचारले होते की, ‘तुम्हांला बाप किंवा भाऊ आहे काय?’
20तेव्हा आम्ही स्वामींना सांगितले की आमचा म्हातारा बाप आहे आणि त्याला म्हातारपणी झालेले एक मूल आहे; त्याचा भाऊ मरून गेला आहे, त्याच्या आईचा तो तेवढाच राहिला आहे, आणि त्याच्या बापाचे त्याच्यावर प्रेम आहे.
21आपण आपल्या दासांना म्हणालात की, “त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे त्याला मी आपल्या डोळ्यांनी पाहीन.”
22आम्ही स्वामींना म्हणालो की, ‘त्या मुलाला आपल्या बापाला सोडून येता येणार नाही, कारण त्याने बापाला सोडले तर बाप नक्की मरेल.’
23आपण आपल्या दासांना म्हणालात, ‘तुमचा धाकटा भाऊ तुमच्याबरोबर आला नाही तर तुम्हांला माझे तोंड पाहता येणार नाही.’
24आपला दास आमचा बाप ह्याच्याकडे जाऊन आम्ही पोहचलो तेव्हा स्वामींनी सांगितले ते आम्ही त्याला कळवले.
25पुढे आमच्या बापाने म्हटले, ‘पुन्हा जाऊन आपल्यासाठी काही अन्नसामग्री विकत घेऊन या.’
26तेव्हा आम्ही म्हटले, ‘आम्हांला पुन्हा जाताच येत नाही. आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असेल तरच आम्ही जाऊ, कारण तो आमच्याबरोबर नसला, तर त्या मनुष्याचे तोंडदेखील आम्हांला पाहायला मिळायचे नाही.’
27आपला दास, आमचा बाप आम्हांला म्हणाला, ‘तुम्हांला ठाऊक आहे की, माझ्या स्त्रीला दोन मुलगे झाले;
28त्यांतल्या एकाला मी अंतरलो, तेव्हा मी म्हणालो की खरोखर त्याला वनपशूने फाडून टाकले असावे, आजवर तो माझ्या दृष्टीस पडला नाही;
29आता तुम्ही ह्यालाही माझ्याजवळून नेले आणि त्याच्यावर काही अरिष्ट आले तर तुम्ही मला दु:खी करून हे माझे पिकलेले केस अधोलोकी उतरवायला कारण व्हाल.’
30तर आपला दास, माझा बाप ह्याच्याकडे मी गेलो आणि मुलगा माझ्याबरोबर नसला, तर ह्या त्याच्या मुलावर त्याचा जीव असल्याकारणाने
31मुलगा नाही हे पाहून तो तत्काळ प्राण सोडील; अशाने आपल्या ह्या दासांमुळे आपला दास, आमचा बाप, ह्याला दु:खी करून त्याचे पिकलेले केस आम्हीच अधोलोकी उतरवले असे होईल.
32माझ्या बापाजवळ ह्या मुलाबद्दल मी जामीन झालो आहे; मी म्हणालो की, मी ह्याला आपणाकडे परत आणले नाही, तर मी आपला निरंतरचा दोषी ठरेन.
33तर आता मी विनंती करतो की, ह्या मुलाऐवजी आपल्या ह्या दासाला स्वामींनी गुलाम म्हणून ठेवावे आणि ह्या मुलाला त्याच्या भावांबरोबर जाऊ द्यावे.
34कारण हा मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी आपल्या बापाकडे कसा जाऊ? माझ्या बापाला दु:ख होईल ते मला पाहवणार नाही.”

सध्या निवडलेले:

उत्पत्ती 44: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन