YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उत्पत्ती 44

44
योसेफाचा चांदीचा प्याला
1आता योसेफाने आपल्या घरकारभार्‍यास आदेश दिला: “माणसांच्या पोत्यात त्यांना वाहून नेण्याइतके अन्न भरावे आणि प्रत्येक माणसाच्या पोत्याच्या तोंडाशी त्यांची चांदी ठेवावी. 2याखेरीज धाकट्याच्या पोत्यामध्ये धान्याच्या पैशाबरोबरच माझा चांदीचा प्यालाही ठेवा.” असे सांगितले आणि घरकारभार्‍याने योसेफाच्या आदेशाप्रमाणे केले.
3पहाट होताच त्या माणसांना त्यांच्या गाढवांसोबत मार्गस्थ करण्यात आले. 4पण ते शहराच्या बाहेर पडतात न पडतात तोच योसेफ त्याच्या कारभार्‍यास म्हणाला, “त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना थांबवून विचारा, ‘तुम्ही चांगल्याची फेड वाईटाने का केली? 5हाच तो चांदीचा प्याला नाही का जो माझे स्वामी स्वतः पिण्याकरिता वापरतात आणि ज्याच्यामधून ते शकुनही पाहत असतात? हे तुमचे कृत्य किती वाईट आहे!’ ”
6त्याप्रमाणे त्याने त्यांना गाठले आणि सांगितल्याप्रमाणे तो त्यांना बोलला. 7पण ते त्याला म्हणाले, “महाराज असे का बोलतात? तुमच्या सेवकांपासून असे काही करणे दूरच असो! 8मागीलवेळी आमच्या पोत्यांच्या तोंडाशी असलेला पैसा आम्ही कनानहून परत आणला नाही काय? तर आता तुमच्या धन्याच्या घरून चांदी किंवा सोने चोरण्याची आम्हाला काय गरज होती? 9आमच्यापैकी कोणाच्याही जवळ जर तो प्याला सापडला तर त्याला मृत्यू येवो; आणि आम्ही सर्वजण तुझ्या धन्याचे गुलाम होऊ.”
10त्या मनुष्याने उत्तर दिले, “ठीक आहे, तुम्ही जे म्हणता त्याप्रमाणे होईल; परंतु ज्याच्याजवळ तो प्याला सापडेल तोच माझ्या धन्याचा गुलाम होईल; बाकीचे दोषापासून मुक्त होतील.”
11आपल्या पोती त्यांनी लगबगीने खाली जमिनीवर ठेऊन ती उघडली; 12त्या कारभार्‍याने वडील भावापासून आरंभ करून धाकट्या भावाच्या पोत्यापर्यंत शोध केला; आणि तो प्याला बिन्यामीनच्या पोत्यामध्ये सापडला. 13हताश होऊन त्यांनी आपले कपडे फाडले, आपल्या गाढवांवर पोती लादली आणि ते पुन्हा शहरात परतले.
14यहूदाह आणि त्याचे भाऊ आले, त्यावेळी योसेफ घरीच होता आणि त्यांनी त्याच्यापुढे लोटांगण घातले. 15योसेफाने विचारले, “तुम्ही हे काय केले? माझ्यासारखा मनुष्य शकुन पाहून या गोष्टी जाणून घेऊ शकतो हे तुम्हाला माहिती नव्हते का?”
16यहूदाहने उत्तर दिले, “आमच्या स्वामीपुढे आम्ही काय बोलावे? आमची निर्दोषता आम्ही कशी सिद्ध करावी? परमेश्वराने तुमच्या दासांचे अपराध उघडे केले आहे. महाराज, आम्ही सर्वजण आणि ज्याच्या पोत्यात प्याला सापडला तो देखील तुमचे गुलाम आहोत.”
17योसेफ म्हणाला, “अशी गोष्ट माझ्याकडून कधीही न होवो! ज्या मनुष्याकडे माझा प्याला मिळाला, तोच माझा गुलाम होईल बाकीचे तुम्ही तुमच्या वडिलांकडे शांतीने परत जा.”
18तेव्हा यहूदाह पुढे सरसावून म्हणाला, “महाराज, तुमच्या सेवकाला क्षमा करा, मला एक शब्द बोलू द्या, क्षणभर माझे ऐकून घ्या. कृपया, आपल्या सेवकावर रागावू नका, कारण तुम्ही प्रत्यक्ष फारोहसमान आहात. 19महाराज, तुमच्या सेवकांना तुम्ही विचारले होते की, तुम्हाला वडील आहेत का? तुम्हाला आणखी एखादा भाऊ आहे का? 20आणि आम्ही आमच्या प्रभूला उत्तर दिले की, ‘आम्हाला वृद्ध वडील आहेत आणि अशा वृद्धापकाळातच त्यांना एक पुत्र झाला. त्याचा भाऊ मरण पावला आहे आणि त्याच्या आईला झालेल्या पुत्रांपैकी तो एकटाच उरलेला आहे आणि त्याचे वडील त्याच्यावर खूप प्रीती करतात.’
21“तेव्हा तुम्ही तुमच्या सेवकांना म्हणाले, ‘त्याला माझ्याकडे घेऊन या, म्हणजे मी त्याला पाहू शकेन.’ 22आणि आम्ही आमच्या महाराजास म्हणालो, ‘तो मुलगा आपल्या वडिलांना सोडू शकत नाही; जर त्याने वडिलांना सोडले तर त्याचे वडील मरतील.’ 23पण तुम्ही आपल्या सेवकांना सांगितले की, ‘जर तुमचा धाकटा भाऊ तुमच्यासोबत आला नाही तर तुम्ही माझे मुख पाहू शकणार नाही.’ 24जेव्हा आम्ही परत तुमचा सेवक आमच्या पित्याकडे जाऊन पोहोचलो, आम्ही त्यांना महाराज काय म्हणाले ते सांगितले.
25“आमच्या वडिलांनी म्हटले, ‘परत जा आणि थोडे धान्य विकत घेऊन या.’ 26परंतु आम्ही म्हणालो, ‘आम्ही खाली जाऊ शकत नाही, जर आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असला तरच आम्ही जाणार. आमचा धाकटा भाऊ आमच्याबरोबर असल्याशिवाय आम्ही त्या मनुष्याचे मुख पाहू शकणार नाही.’
27“मग तुमचे सेवक, आमचे वडील आम्हाला म्हणाले, ‘माझ्या पत्नीने माझ्या दोन पुत्रांना जन्म दिला. 28त्यापैकी एक माझ्यापासून दूर गेला तेव्हा मी म्हणालो, “त्याला एखाद्या श्वापदाने फाडून त्याचे तुकडे केले असावेत,” त्यानंतर मी त्याला पहिले नाही. 29जर यालाही तुम्ही माझ्यापासून घेऊन जाल आणि त्याच्यावरही संकट आले तर तुम्ही माझ्या पिकलेल्या केसाला दुःखाने कबरेत लोटण्यास कारणीभूत व्हाल.’
30“आमच्या वडिलांचा जीव मुलाच्या जिवाशी इतका निगडीत आहे की, आता जेव्हा मी तुमचा सेवक, आम्ही या मुलाशिवाय परतलो, 31आणि मुलगा आमच्याबरोबर नाही असे जर त्यांनी पाहिले तर ते प्राण सोडतील आणि त्यांच्या पिकलेल्या केसांना दुःखात व कबरेत लोटण्यास आम्ही कारणीभूत होऊ. 32तुमच्या सेवकाने आमच्या वडिलांना अभिवचन दिले आहे की, मुलाची मी काळजी घेईन. मी त्यांना सांगितले की, ‘मी जर त्याला परत आणले नाही तर त्याचा दोष माझ्या जीवनात सदैव माझ्या माथ्यावर राहील!’
33“म्हणून महाराज, कृपा करा आणि त्या मुलाऐवजी मलाच येथे तुमचा गुलाम म्हणून राहू द्या आणि मुलाला त्याच्या भावांबरोबर परत जाऊ द्या. 34कारण मुलगा माझ्याबरोबर नसला तर मी माझ्या वडिलांकडे कसे जाऊ शकतो? माझ्या वडिलांना होणारे दुःख मला पाहवणार नाही.”

सध्या निवडलेले:

उत्पत्ती 44: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन