उत्पत्ती 41:14-32
उत्पत्ती 41:14-32 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदिखान्यातून बाहेर आणले; आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारोपुढे आला. फारो योसेफाला म्हणाला, “मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस?” योसेफ फारोला म्हणाला, “मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल.” नंतर फारोने योसेफाला सांगितले, “पाहा, मी स्वप्नात नील नदीच्या काठी उभा होतो; तेव्हा सात धष्टपुष्ट व सुंदर गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या. आणि त्यांच्यामागून दुबळ्या, अति कुरूप व रोड अशा दुसर्या सात गाई निघाल्या; त्यांच्यासारख्या बेढब गाई सार्या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत. ह्या दुबळ्या व कुरूप गाईंनी त्या पहिल्या सात पुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यांनी त्यांना खाऊन टाकले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना; पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो. पुन्हा मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार सात कणसे एकाच ताटाला आली; आणि त्यांच्यामागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वार्याने करपलेली अशी सात कणसे निघाली; आणि त्या सात खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली कणसे गिळून टाकली. मी हे जोतिष्यांना सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता.” योसेफ फारोला म्हणाला, “फारोला पडलेले स्वप्न एकच आहे; आपण काय करणार आहोत हे देवाने फारोला कळवले आहे. त्या सात चांगल्या गाई म्हणजे सात वर्षे, आणि सात चांगली कणसे म्हणजेही सात वर्षे; स्वप्न एकच आहे. मागाहून वर आलेल्या सात रोड व कुरूप गाई आणि सुकलेली व पूर्वेच्या वार्याने करपलेली सात कणसे ही दुष्काळाची सात वर्षे होत. मी फारोला कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोला दाखवले आहे. पाहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची सात वर्षे येत आहेत; आणि त्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येतील; तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल, आणि दुष्काळ देशाला नष्ट करील. पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार. हे स्वप्न फारोला दोनदा पडले; ह्याचे कारण हेच की हे देवाने ठरवले आहे व देव ते लवकरच घडवून आणणार.
उत्पत्ती 41:14-32 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला. मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतोस.” योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.” मग फारो योसेफाला म्हणाला, “माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो. तेव्हा पाहा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले. त्यानंतर पाहा, सात दुबळ्या व कुरुप गाई वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गाई कधीच पाहिल्या नव्हत्या. त्या दुबळ्या व कुरुप गाईंनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या. तरीही त्या दुबळ्या व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते, त्या पूर्वीप्रमानेच कुरुप व दुबळ्या दिसत होत्या मग मी जागा झालो. त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली, मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी वाळलेली, बारीक व पूर्वेच्या गरम वाऱ्याच्या झळांमुळे करपलेली सात कणसे आली. बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.” मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे. त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत. त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत. जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल. परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.
उत्पत्ती 41:14-32 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तेव्हा फारोहने योसेफाला बोलाविणे पाठविले. योसेफाला लगेच तुरुंगाच्या कोठडीतून बाहेर आणण्यात आले आणि योसेफ मुंडण करून व कपडे बदलून फारोहपुढे दाखल झाला. फारोह योसेफास म्हणाला, “मला एक स्वप्न पडले, पण येथे असलेल्या कोणाही मनुष्याला त्याचा अर्थ काय असेल हे सांगता येत नाही. पण मी असे ऐकले आहे की तू स्वप्न ऐकताच, तुला स्वप्नांचा अर्थ सांगता येतो.” योसेफाने उत्तर दिले, “मला स्वतःच्या बुद्धीने स्वप्नांचा अर्थ सांगता येत नाही, परंतु परमेश्वर फारोहला हितकारक उत्तर देतील.” तेव्हा फारोहने योसेफाला सांगितले, “मी स्वप्नात नाईल नदीच्या काठावर उभा होतो; तेवढ्यात एकाएकी नाईल नदीतून चांगल्या धष्टपुष्ट दिसणार्या सात गाई वर आल्या आणि लव्हाळ्यात चरू लागल्या. नंतर दुसर्या सात गाई वर आल्या; त्या अगदी कुरूप व दुबळ्या होत्या. सर्व इजिप्त देशात अशा अशक्त गाई मी कधीही पाहिल्या नाहीत. या कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या पहिल्या सात धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. असे असूनही त्यांनी त्या सात धष्टपुष्ट गाई कशा खाल्ल्या हे समजू शकले नाही; पण धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकल्यानंतरही त्या अशक्त गाई अशक्तच राहिल्या आणि मग मी जागा झालो. “मग मला परत स्वप्नात, एकाच ताटाला टपोर्या दाण्यांची भरदार सात कणसे दिसली. मग त्याच ताटातून सात वाळलेली आणि पूर्वेच्या वार्याने कोमेजून गेलेली कणसे निघाली. या अशक्त कणसांनी ती भरदार कणसे गिळून टाकली. मी हे सर्व माझ्या ज्योतिष्यांना सांगितले, परंतु त्यातील एकालाही स्वप्नांचा अर्थ सांगता आला नाही.” स्वप्ने ऐकून योसेफ फारोहला म्हणाला, “फारोहला पडलेल्या या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. परमेश्वर काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रगट केले आहे. या दोन्हीचा अर्थ एकच आहे, सात लठ्ठ गाई म्हणजे सात वर्षांचा काळ आणि सात भरदार कणसे यांचाही अर्थ पुढील सात वर्षांचा काळ; जो अतिशय समृद्धीचा असेल. त्या सात अशक्त गाई म्हणजे या सात वर्षानंतर येणारी सात वर्षे आणि पूर्वेच्या वार्याने कोमेजून गेलेली सात सुकलेली कणसे दुष्काळाची सात वर्षे दर्शवितात. “मी फारोहला जे सांगितले आहे ते असे असेल: परमेश्वर लवकरच काय करणार आहेत, हे त्यांनी तुम्हाला प्रकट केले आहे. पुढील सात वर्षांचा काळ संपूर्ण इजिप्त देशासाठी अतिशय समृद्धीचा काळ असेल. पण त्यानंतरच्या सात वर्षांच्या काळात इजिप्त देशामध्ये इतका मोठा दुष्काळ पडेल की, आधीच्या सात वर्षांतील सर्व समृद्धी आणि भरभराट विसरली जाईल. दुष्काळ देशाचा विध्वंस करेल. तो इतका भयानक असेल की, आधीच्या समृद्धीची वर्षे आठवणार देखील नाहीत. आता हे स्वप्न फारोहला दोन स्वरुपात पडले, याचा अर्थ असा की परमेश्वराने दुष्काळाची बाब निश्चित केली आहे आणि परमेश्वर त्याप्रमाणे लवकरच घडवून आणतील.