मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले. तेव्हा त्यांनी त्यास ताबडतोब तुरुंगातून बाहेर आणले. योसेफ दाढी करून व कपडे बदलून फारोकडे आला. मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, जेव्हा कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू स्वप्नांचा अर्थ सांगतोस.” योसेफाने फारोला उत्तर देऊन म्हणाला, “तसे सामर्थ्य माझ्यामध्ये नाही. देवच फारोला स्वप्नांचा अर्थ सांगेल.” मग फारो योसेफाला म्हणाला, “माझ्या स्वप्नामध्ये मी नाईल नदीच्या काठी उभा होतो. तेव्हा पाहा नदीतून सात धष्टपुष्ट व सुंदर गाई बाहेर आल्या व गवत खाऊ लागल्या असे मी पाहिले. त्यानंतर पाहा, सात दुबळ्या व कुरुप गाई वर आल्या. मी सबंध मिसर देशात त्यांच्यासारख्या बेढब गाई कधीच पाहिल्या नव्हत्या. त्या दुबळ्या व कुरुप गाईंनी आधीच्या धष्टपुष्ट व सुंदर गाई गिळून टाकल्या. तरीही त्या दुबळ्या व कुरुपच राहिल्या, त्यांच्याकडे पाहिल्यावर त्यांनी त्या सात गाई गिळून टाकल्या असे वाटत नव्हते, त्या पूर्वीप्रमानेच कुरुप व दुबळ्या दिसत होत्या मग मी जागा झालो. त्यानंतर माझ्या दुसऱ्या स्वप्नात एकाच ताटाला सात चांगली भरदार व टपोऱ्या दाण्यांची भरगच्च कणसे आली, मग त्यांच्या मागून त्या ताटाला आणखी दुसरी वाळलेली, बारीक व पूर्वेच्या गरम वाऱ्याच्या झळांमुळे करपलेली सात कणसे आली. बारीक कणसांनी ती चांगली सात कणसे गिळून टाकली. ही माझी स्वप्ने मी माझ्या जादुगारांना सांगितली. परंतु त्यांच्यातील कोणालाही त्यांचा उलगडा करून सांगता आले नाही.” मग योसेफ फारोला म्हणाला, “महाराज, या दोन्हीही स्वप्नांचा अर्थ एकच आहे. देव जे काही करणार आहे ते त्याने आपणांस कळविले आहे. त्या सात चांगल्या गाई आणि ती सात चांगली कणसे म्हणजे सात चांगली वर्षे आहेत. स्वप्ने सारखीच आहेत. त्या दुसऱ्या सात दुबळ्या गाई व ती सात सुकलेली व पूर्वेच्या वऱ्याने करपलेली कणसेही म्हणजे अवघ्या देशावर येणाऱ्या दुष्काळाची सात वर्षे आहेत. जी गोष्ट मी फारोला सांगितली ती हीच आहे. जे काय घडणार आहे हे देवाने आपणास दाखवले आहे. पाहा सर्व मिसर देशात सात वर्षांच्या सुबत्तेच्या काळात चांगले व भरपूर पीक येईल. परंतु सुकाळाच्या सात वर्षांनंतर सर्व देशभर दुष्काळाची अशी सात वर्षे येतील की, त्यामुळे मिसर देशाला सुकाळाचा विसर पडेल आणि हा दुष्काळ देशाचा नाश करील. आणि भरपूर धान्य असतानाचे दिवस देशात कसे होते याचा लोकांस विसर पडेल, कारण तो फार भयंकर काळ असेल. तेव्हा फारो महाराज, एकाच गोष्टीविषयी आपणाला दोनदा स्वप्ने पडली, ती यासाठी की, देव हे सर्व लवकरच व नक्की घडवून आणील हे आपणास दाखवावे.
उत्प. 41 वाचा
ऐका उत्प. 41
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: उत्प. 41:14-32
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ