उत्पत्ती 41
41
फारोच्या स्वप्नांचा योसेफाने सांगितलेला अर्थ
1पुरी दोन वर्षे लोटल्यावर फारोला स्वप्न पडले की आपण नील नदीच्या काठी उभे असताना 2सात सुंदर व धष्टपुष्ट गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या.
3पुढे पाहतो तर त्यांच्यामागून कुरूप व दुबळ्या अशा आणखी सात गाई नदीतून निघाल्या आणि त्या पहिल्या गाईंजवळ नदीकाठी उभ्या राहिल्या.
4तेव्हा कुरूप व दुबळ्या गाईंनी त्या सुंदर व धष्टपुष्ट गाईंना खाऊन टाकले. त्यानंतर फारो जागा झाला.
5मग तो पुन: झोपी गेला असता त्याला दुसर्यांदा स्वप्न पडले की, एकाच ताटाला सात चांगली भरदार कणसे आली;
6आणि पाहा, त्यांच्यामागून खुरटलेली व पूर्वेच्या वार्याने करपलेली अशी सात कणसे निघाली.
7त्या खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली भरदार कणसे गिळून टाकली. मग फारो जागा झाला आणि पाहतो तर ते स्वप्न होते.
8सकाळी फारोचे चित्त अस्वस्थ झाले, आणि त्याने मिसर देशातील अवघे ज्योतिषी व पंडित ह्यांना बोलावले; फारोने आपली स्वप्ने त्यांना सांगितली, पण फारोला त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नव्हता.
9तेव्हा प्यालेबरदारांचा नायक फारोला म्हणाला, “माझ्या अपराधांची आज मला आठवण होत आहे.
10फारोची आपल्या सेवकांवर इतराजी झाली तेव्हा त्याने मला व आचार्यांच्या नायकाला गारद्यांच्या सरदाराच्या वाड्यात कैदेत ठेवले होते.
11तेव्हा एकाच रात्री आम्हा दोघांना, मला व त्याला लागू पडतील अशा अर्थाची स्वप्ने पडली;
12तेथे त्या गारद्यांच्या सरदाराचा दास कोणी इब्री तरुण पुरुष आमच्याबरोबर होता, त्याला आम्ही आपापली स्वप्ने सांगितली व त्याने त्यांचा अर्थ आम्हांला सांगितला; त्याने प्रत्येकाच्या स्वप्नानुसार अर्थ सांगितला.
13त्याने आम्हांला अर्थ सांगितला तसेच घडून आले; मला आपल्या हुद्द्यावर पूर्ववत रुजू केले आणि त्याला फाशी दिले.”
14मग फारोने योसेफाला बोलावणे पाठवले, तेव्हा त्याला तत्क्षणी बंदिखान्यातून बाहेर आणले; आणि तो आपले मुंडन करून व वस्त्रे बदलून फारोपुढे आला.
15फारो योसेफाला म्हणाला, “मी एक स्वप्न पाहिले, त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की, तू स्वप्न ऐकताच त्याचा अर्थ सांगतोस?”
16योसेफ फारोला म्हणाला, “मी कोण सांगणारा? फारोला शांती देणारे उत्तर देवच देईल.”
17नंतर फारोने योसेफाला सांगितले, “पाहा, मी स्वप्नात नील नदीच्या काठी उभा होतो;
18तेव्हा सात धष्टपुष्ट व सुंदर गाई नदीतून बाहेर निघून लव्हाळ्यात चरू लागल्या.
19आणि त्यांच्यामागून दुबळ्या, अति कुरूप व रोड अशा दुसर्या सात गाई निघाल्या; त्यांच्यासारख्या बेढब गाई सार्या मिसर देशात मी कधी पाहिल्या नाहीत.
20ह्या दुबळ्या व कुरूप गाईंनी त्या पहिल्या सात पुष्ट गाईंना खाऊन टाकले.
21त्यांनी त्यांना खाऊन टाकले तेव्हा त्या त्यांच्या पोटात गेल्या असे मुळीच दिसेना; पूर्वीप्रमाणेच त्या कुरूप राहिल्या. मग मी जागा झालो.
22पुन्हा मी स्वप्नात पाहिले की चांगली भरदार सात कणसे एकाच ताटाला आली;
23आणि त्यांच्यामागून सुकलेली, खुरटलेली व पूर्वेच्या वार्याने करपलेली अशी सात कणसे निघाली;
24आणि त्या सात खुरटलेल्या कणसांनी ती सात चांगली कणसे गिळून टाकली. मी हे जोतिष्यांना सांगितले, पण ते मला उलगडून सांगणारा कोणी नव्हता.”
25योसेफ फारोला म्हणाला, “फारोला पडलेले स्वप्न एकच आहे; आपण काय करणार आहोत हे देवाने फारोला कळवले आहे.
26त्या सात चांगल्या गाई म्हणजे सात वर्षे, आणि सात चांगली कणसे म्हणजेही सात वर्षे; स्वप्न एकच आहे.
27मागाहून वर आलेल्या सात रोड व कुरूप गाई आणि सुकलेली व पूर्वेच्या वार्याने करपलेली सात कणसे ही दुष्काळाची सात वर्षे होत.
28मी फारोला कळवलेच आहे की देवाने आपण काय करणार हे फारोला दाखवले आहे.
29पाहा, अवघ्या मिसर देशात मोठ्या सुकाळाची सात वर्षे येत आहेत;
30आणि त्यानंतर दुष्काळाची सात वर्षे येतील; तेव्हा मिसर देशाला सगळ्या सुकाळाचा विसर पडेल, आणि दुष्काळ देशाला नष्ट करील.
31पुढे जो दुष्काळ पडणार त्यामुळे पूर्वी सुकाळ होता की नव्हता त्याचे स्मरणही राहणार नाही, एवढा भारी तो होणार.
32हे स्वप्न फारोला दोनदा पडले; ह्याचे कारण हेच की हे देवाने ठरवले आहे व देव ते लवकरच घडवून आणणार.
33तर आता फारोने कोणी एखादा चतुर व शहाणा पुरुष पाहून त्याला मिसर देशावर नेमावे;
34आणि फारोने हे करून देशावर अधिकारी नेमावे आणि सुकाळाच्या सात वर्षांत मिसर देशातील उत्पन्नाचा पंचमांश घ्यावा.
35ह्या येणार्या सुकाळाच्या वर्षांत सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करावी आणि नगरोनगरी अन्नाच्या पुरवठ्यासाठी धान्याचा साठा फारोच्या ताब्यात ठेवावा.
36मिसर देशावर दुष्काळाची जी सात वर्षे येणार त्यांसाठी ही अन्नाची बेगमी होईल, म्हणजे दुष्काळाने देशाचा नाश होणार नाही.”
योसेफ मिसर देशाचा मुख्याधिकारी होतो
37हे फारोला व त्याच्या सर्व सेवकांना अगदी पटले.
38तेव्हा फारो आपल्या सेवकांना म्हणाला, “ज्याच्या ठायी देवाचा आत्मा आहे असा ह्या पुरुषासारखा आपल्याला दुसरा कोणी आढळेल काय?”
39मग फारो योसेफाला म्हणाला, “देवाने तुला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान करून दिले आहे त्या अर्थी तुझ्यासारखा चतुर व शहाणा दुसरा कोणी नाही.
40तर तू माझ्या घराचा अधिकारी हो; तुझ्या आज्ञेप्रमाणे माझी सर्व प्रजा चालेल, राजासनापुरताच काय तो मी तुझ्यापेक्षा मोठा.”
41फारो योसेफाला आणखी म्हणाला, “हे पाहा, तुला मी अवघ्या मिसर देशावर नेमतो.”
42मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली;
43मग त्याला आपल्या मागच्या रथात बसवले, आणि ‘मुजरा करा!’ असे ते त्याच्यापुढे ललकारत चालले. ह्या प्रकारे त्याने त्याला अवघ्या मिसर देशावर नेमले.
44फारो योसेफाला म्हणाला, “मी फारो खरा, पण तुझ्या हुकुमाशिवाय अवघ्या मिसर देशात कोणी हात किंवा पाय हलवणार नाही.”
45फारोने योसेफाचे नाव सापनाथ-पानेह असे ठेवले; आणि ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ ही त्याला बायको करून दिली. मग योसेफ मिसर देशात दौरा करू लागला.
46मिसरी राजा फारो ह्याच्यापुढे योसेफ जाऊन उभा राहिला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. मग योसेफ फारोसमोरून निघून सर्व देशात दौरा करू लागला.
47त्या सुकाळाच्या सात वर्षांत जमिनीस भरघोस पीक आले.
48त्याने ह्या सात वर्षांत मिसर देशातील सर्व प्रकारची अन्नसामग्री गोळा करून नगरोनगरी साठवून ठेवली; एकेका नगराच्या आसपासचे पीक त्याने त्या त्या नगरात साठवून ठेवले.
49योसेफाने समुद्राच्या वाळूसारखा धान्याचा महामूर संचय करून ठेवला; त्याने ते मोजायचे सोडले, कारण ते अगणित होते.
50दुष्काळ पडण्यापूर्वी ओन येथील याजक पोटीफरा ह्याची मुलगी आसनथ हिच्यापासून योसेफाला दोन मुलगे झाले.
51योसेफाने आपल्या पहिल्या मुलाचे नाव मनश्शे (विसर पाडणारा) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “देवाने माझ्या सर्व क्लेशांचा व माझ्या पितृगृहाचा मला विसर पाडला आहे.”
52त्याने दुसर्याचे नाव एफ्राईम (फलद्रूप) असे ठेवले; “कारण” तो म्हणाला, “माझ्या विपत्तीच्या देशात देवाने मला फलद्रूप केले आहे.”
53मिसर देशातल्या सुकाळाची सात वर्षे संपली.
54मग योसेफाने सांगितल्याप्रमाणे दुष्काळाची सात वर्षे सुरू झाली, तेव्हा देशोदेशी दुष्काळ पडला, तथापि मिसर देशात सर्वत्र अन्न होते.
55अवघ्या मिसर देशाची उपासमार होऊन लोक फारोकडे अन्नासाठी ओरड करू लागले, तेव्हा फारो सर्व मिसरी लोकांना म्हणाला, “योसेफाकडे जा; तो तुम्हांला सांगेल ते करा.”
56दुष्काळाने सर्व पृथ्वी व्यापली, आणि मिसरात तो भारी कडक झाला. तेव्हा योसेफ सर्व कोठारे उघडून मिसरी लोकांना धान्य विकू लागला.
57तेव्हा देशोदेशीचे लोक धान्य विकत घेण्यासाठी मिसरात योसेफाकडे गेले, कारण सार्या पृथ्वीवर भारी कडक दुष्काळ पडला होता.
सध्या निवडलेले:
उत्पत्ती 41: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.