YouVersion लोगो
सर्च आयकॉन

गलतीकरांस पत्र 3:1-6

गलतीकरांस पत्र 3:1-6 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

अहो बुद्धीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हास कोणी भुलविले आहे? मला तुम्हापासून इतकेच समजवून घ्यावयाचे आहे की, तुम्हास जो पवित्र आत्मा मिळाला तो नियमशास्त्रातील कृत्यांनी मिळाला की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे मिळाला? तुम्ही इतके बुद्धीहीन आहात काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतके दुःखे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे काय! म्हणून जो तुम्हास देवाचा आत्मा पुरवतो आणि तुमच्यात चमत्कार करतो तो हे जे सर्व करतो ते नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की, सुवार्ता ऐकून विश्वास ठेवल्यामुळे ते तो करतो? ज्याप्रमाणे अब्राहामानेही देवावर विश्वास ठेवला व ते त्यास नीतिमत्त्व असे गणण्यात आले. तसे हे झाले.

गलतीकरांस पत्र 3:1-6 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

अहो मूर्ख गलातीकरांनो! तुम्हाला कोणी मोहात पाडले आहे? तुमच्या डोळ्यांसमोरच येशू ख्रिस्त यांना क्रूसावर खिळण्यात आले असे स्पष्ट चित्रित केले होते. तुमच्याकडून फक्त एकच गोष्ट समजून घेणे मला आवडेल: नियमशास्त्राप्रमाणे कार्य केल्याने तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला किंवा जे काही तुम्ही ऐकले त्यावर विश्वास ठेवल्याने? तुम्ही इतके मूर्ख आहात काय? जे आत्म्याच्याद्वारे सुरू केले ते तुम्ही आता दैहिकरितीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहात काय? इतके अपार दुःख तुम्ही व्यर्थच अनुभवले आहे काय, जर ते खरोखरच व्यर्थ होते? तर मी पुन्हा विचारतो, परमेश्वर त्यांचा आत्मा तुम्हाला देतात आणि चमत्काराचे कार्य तुम्हामध्ये नियमशास्त्राच्या कार्याद्वारे करतात किंवा तुम्ही जे ऐकले आहे त्यावर विश्वास ठेवण्याद्वारे? त्याचप्रमाणे अब्राहामानेसुद्धा, “परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले.”

गलतीकरांस पत्र 3:1-6 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

अहो बुद्धिहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या [तुम्ही सत्याचे पालन करू नये म्हणून] तुम्हांला कोणी भुरळ घातली? तुम्हांला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला, किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याकडून मिळाला, इतकेच मला तुमच्यापासून समजून घ्यायचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन आहात काय? तुम्ही आत्म्याने प्रारंभ केल्यावर आता देहस्वभावाने पूर्णत्व मिळवू पाहत आहात काय? तुम्ही इतकी दु:खे सोसली हे व्यर्थ काय? ह्याला व्यर्थ म्हणावे कसे? जो तुम्हांला आत्मा पुरवतो व तुमच्यामध्ये अद्भुते करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो की विश्वासपूर्वक ऐकण्याकडून? ज्याप्रमाणे अब्राहामाने “देवावर विश्वास ठेवला आणि ते त्याला नीतिमत्त्व असे गणण्यात आले” तसे हे आहे.

गलतीकरांस पत्र 3:1-6 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

अहो गलतीयातील बुध्दिहीन लोकांनो, क्रुसावर चढविलेल्या येशू ख्रिस्ताचे स्पष्ट वर्णन तुमच्यापुढे असता तुम्हांला कोणी भुरळ घातली आहे? तुम्हांला नियमशास्त्रातील कृत्यांनी आत्मा मिळाला किंवा शुभवर्तमान ऐकून त्यावर विश्वास ठेवल्यामुळे मिळाला, इतकेच मला तुमच्याकडून समजून घ्यावयाचे आहे. तुम्ही इतके बुद्धिहीन कसे काय? तुम्ही देवाच्या आत्म्याने सुरुवात केली असता आता स्वतःच्या शक्तीने पूर्ण करणार काय? तुम्ही इतकी दुःखे सहन केली, हे व्यर्थ आहे काय? जो तुम्हाला आत्मा पुरवितो व तुमच्यामध्ये चमत्कार करतो, तो नियमशास्त्रातील कृत्यांनी करतो किंवा विश्वासपूर्वक ऐकण्याने करतो? ज्याप्रमाणे अब्राहामने देवावर विश्वास ठेवला आणि त्याला नीतिमान असे गणण्यात आले, तसे हे आहे.