निर्गम 5:1-14
निर्गम 5:1-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.” फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.” मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हांशी बोलला आहे. म्हणून आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर याल यज्ञार्पण करू द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.” परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा. फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.” त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा. तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे. तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.” म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हास विटा बनवण्यासाठी लागणारे गवत देणार नाही. तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.” म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले. त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत. मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?”
निर्गम 5:1-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर मोशे व अहरोन फारोहकडे जाऊन त्याला म्हणाले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की रानात जाऊन त्यांनी माझा उत्सव साजरा करावा.’ ” यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.” तेव्हा ते फारोहला म्हणाले, “इब्री लोकांच्या परमेश्वराने आम्हाला दर्शन दिले. आता आम्ही याहवेह, आमच्या परमेश्वराला यज्ञ करावा म्हणून आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊ दे. नाही तर परमेश्वर आम्हाला पीडांनी किंवा तलवारीने मारून टाकेल.” यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!” मग फारोह म्हणाला, “पाहा, देशाच्या लोकांची संख्या पुष्कळपटीने वाढली आहे आणि तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणत आहात.” त्याच दिवशी फारोहने इस्राएलावर नेमलेल्या मुकादमांना व अधिकार्यांना हुकूम दिला: “यापुढे लोकांना विटा तयार करण्यासाठी गवत देऊ नका; आपल्यासाठी गवत त्यांनी स्वतःच गोळा करावे. तरीही पूर्वी ते जितक्या विटा तयार करीत होते तितक्या त्यांनी केल्याच पाहिजे; त्यात घट होऊ नये. ते आळशी आहेत; म्हणूनच, ‘आम्हाला रानात जाऊन आमच्या परमेश्वराला यज्ञ करू दे,’ अशी ओरड करीत आहेत. त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.” तेव्हा मुकादम व पुढारी यांनी इस्राएली लोकांना सांगितले, “फारोहने असे सांगितले आहे की मी तुम्हाला यापुढे गवत देणार नाही. तर जाऊन मिळेल तिथून आपल्यासाठी गवत शोधून आणा, मात्र तुमचे काम मुळीच कमी करण्यात येणार नाही.” तेव्हा लोक गवत गोळा करून आणण्यासाठी इजिप्तभर पांगले. मुकादम त्यांना जोर देऊन म्हणत होते, “गवत असताना जेवढे काम करीत होते तितकेच नेमून दिलेले काम रोज झाले पाहिजे.” फारोहच्या मुकादमांनी इस्राएली गटांवर नेमलेल्या पुढार्यांना मार देऊन विचारले, “पूर्वीप्रमाणे, काल व आज तुम्हाला नेमून दिलेले विटा तयार करण्याचे काम तुम्ही का पूर्ण केले नाही?”
निर्गम 5:1-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर मोशे व अहरोन फारोकडे जाऊन म्हणाले, “इस्राएलाचा देव परमेश्वर सांगत आहे की, माझ्या लोकांनी माझ्याप्रीत्यर्थ रानात उत्सव1 करावा म्हणून त्यांना जाऊ द्यावे.” तेव्हा फारो म्हणाला, “हा कोण परमेश्वर की ज्याचे ऐकून मी इस्राएलास जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वराला जाणत नाही, आणि इस्राएलास काही जाऊ देणार नाही.” ते म्हणाले, “इब्र्यांच्या देवाने आम्हांला भेट दिली; तर आता आम्हांला तीन दिवसांच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे आणि आमचा देव परमेश्वर ह्याला यज्ञ करू द्यावा; असे न केल्यास तो कदाचित पटकीने अथवा तलवारीने आमचा समाचार घेईल.” मिसराचा राजा त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांना काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या बिगारकामावर चालते व्हा.” फारो आणखी म्हणाला, “पाहा, देशातले लोक आता पुष्कळ आहेत, आणि तुम्ही त्यांना बिगारकाम सोडून जायला लावणार.” त्याच दिवशी फारोने त्या लोकांचे मुकादम व त्यांचे नायक ह्यांना आज्ञा केली की, विटा करण्यासाठी तुम्ही ह्या लोकांना आजवर गवत देत आलात तसे ह्यापुढे देऊ नका; त्यांनी स्वत: जाऊन गवत मिळवावे. तरी आजवर जेवढ्या विटा त्यांना कराव्या लागत होत्या तेवढ्या त्यांच्याकडून करवून घ्या, त्यात काही कमी करू नका; ते आळशी आहेत, म्हणून ते ओरड करीत आहेत की आम्हांला जाऊ द्या, आमच्या देवाला यज्ञ करू द्या. त्या लोकांवर अधिक काम लादा, म्हणजे त्यांच्यावर कामाचा बोजा पडून ते ह्या खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.” मग लोकांचे मुकादम व नायक बाहेर जाऊन त्यांना म्हणाले, “फारो म्हणतो, मी तुम्हांला गवत पुरवणार नाही. तुम्हीच जा आणि मिळेल तेथून गवत आणा; तरी तुमचे काम काही कमी होणार नाही.” तेव्हा ते लोक गवताऐवजी धान्याचे सड जमा करण्यासाठी सर्व मिसर देशभर पांगले. त्यांच्यामागे मुकादमांचा असा तगादा असे की, “तुम्हांला गवत पुरवण्यात येत होते तेव्हाच्या इतके तुमचे रोजचे काम पुरे करा.” इस्राएल लोकांवर त्यांच्यापैकी जे नायक नेमले होते त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जितक्या विटा करीत होता, तितक्या काल व आज का केल्या नाहीत?”