YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 5

5
भुसारहित विटा
1नंतर मोशे व अहरोन फारोहकडे जाऊन त्याला म्हणाले, “याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘माझ्या लोकांना जाऊ दे, यासाठी की रानात जाऊन त्यांनी माझा उत्सव साजरा करावा.’ ”
2यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”
3तेव्हा ते फारोहला म्हणाले, “इब्री लोकांच्या परमेश्वराने आम्हाला दर्शन दिले. आता आम्ही याहवेह, आमच्या परमेश्वराला यज्ञ करावा म्हणून आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊ दे. नाही तर परमेश्वर आम्हाला पीडांनी किंवा तलवारीने मारून टाकेल.”
4यावर इजिप्तचा राजा म्हणाला, “अहो मोशे व अहरोन, तुम्ही लोकांना त्यांच्या कामापासून का दूर नेत आहात? आपल्या कामास परत जा!” 5मग फारोह म्हणाला, “पाहा, देशाच्या लोकांची संख्या पुष्कळपटीने वाढली आहे आणि तुम्ही त्यांच्या कामात अडथळा आणत आहात.”
6त्याच दिवशी फारोहने इस्राएलावर नेमलेल्या मुकादमांना व अधिकार्‍यांना हुकूम दिला: 7“यापुढे लोकांना विटा तयार करण्यासाठी गवत देऊ नका; आपल्यासाठी गवत त्यांनी स्वतःच गोळा करावे. 8तरीही पूर्वी ते जितक्या विटा तयार करीत होते तितक्या त्यांनी केल्याच पाहिजे; त्यात घट होऊ नये. ते आळशी आहेत; म्हणूनच, ‘आम्हाला रानात जाऊन आमच्या परमेश्वराला यज्ञ करू दे,’ अशी ओरड करीत आहेत. 9त्यांच्यासाठी काम अजून कठीण करा, म्हणजे ते काम करत राहतील व खोट्या गोष्टींकडे ते लक्ष देणार नाहीत.”
10तेव्हा मुकादम व पुढारी यांनी इस्राएली लोकांना सांगितले, “फारोहने असे सांगितले आहे की मी तुम्हाला यापुढे गवत देणार नाही. 11तर जाऊन मिळेल तिथून आपल्यासाठी गवत शोधून आणा, मात्र तुमचे काम मुळीच कमी करण्यात येणार नाही.” 12तेव्हा लोक गवत गोळा करून आणण्यासाठी इजिप्तभर पांगले. 13मुकादम त्यांना जोर देऊन म्हणत होते, “गवत असताना जेवढे काम करीत होते तितकेच नेमून दिलेले काम रोज झाले पाहिजे.” 14फारोहच्या मुकादमांनी इस्राएली गटांवर नेमलेल्या पुढार्‍यांना मार देऊन विचारले, “पूर्वीप्रमाणे, काल व आज तुम्हाला नेमून दिलेले विटा तयार करण्याचे काम तुम्ही का पूर्ण केले नाही?”
15तेव्हा इस्राएलांचे पुढारी फारोहकडे जाऊन त्याला विनवून म्हणाले, “तुम्ही आपल्या सेवकांशी असे निष्ठुरपणे का वागता? 16तुमच्या दासांना गवत नाही, तरीही ‘विटा तयार करा!’ असे सांगितले जाते, तुमच्या सेवकांना मारहाण करण्यात येते, परंतु सगळा दोष तुमच्याच लोकांचा आहे.”
17फारोहने उत्तर दिले, “तुम्ही आळशी लोक आहात—आळशी! म्हणून तुम्ही म्हणता, ‘आम्हाला याहवेहपुढे यज्ञ करावयास जाऊ द्यावे.’ 18आता आपले काम करा. तुम्हाला गवत पुरविले जाणार नाही, तरी नेमल्याप्रमाणेच विटा तयार करून द्याव्या लागतील.”
19“तुम्हाला नेमून दिल्याप्रमाणे रोजचे विटा बनविण्याचे काम कमी केले जाणार नाही,” असे ऐकल्यावर आपण अडचणीत सापडलो आहोत, असे इस्राएली पुढाऱ्यांच्या लक्षात आले. 20फारोहकडून आल्यावर, अहरोन व मोशे आपल्याशी बोलण्यास वाट पाहत आहेत असे त्यांनी पाहिले, 21ते त्यांना म्हणाले, “याहवेह तुम्हाकडे पाहो व तुमचा न्याय करो! तुम्ही दोघांनी फारोह व त्याच्या अधिकार्‍यांसमोर आम्हाला किळसवाणे असे केले आहे आणि आम्हाला मारून टाकण्यासाठी त्यांच्या हाती तलवार दिली आहे.”
परमेश्वर सुटकेचे अभिवचन देतात
22मोशे याहवेहकडे जाऊन म्हणाला, “हे प्रभू, या लोकांवर तुम्ही अरिष्ट का आणले? यासाठीच तुम्ही मला पाठवले आहे का? 23मी तुमच्या नावाने फारोहला बोललो, तेव्हापासून त्याने त्यांच्यावर त्रास आणला आहे आणि तुम्ही आपल्या लोकांना सोडविले नाही.”

सध्या निवडलेले:

निर्गम 5: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन