या गोष्टी घडल्यानंतर, मोशे व अहरोन फारोकडे गेले व त्यास म्हणाले, “इस्राएली लोकांचा देव परमेश्वर म्हणतो, माझ्या लोकांनी माझ्यासाठी रानात उत्सव करावा म्हणून त्यांना जाऊ दे.” फारो म्हणाला, “हा परमेश्वर कोण आहे? मी त्याचा शब्द का ऐकावा आणि इस्राएलाला जाऊ द्यावे? मी त्या परमेश्वरास ओळखत नाही. म्हणून इस्राएलाला मी जाऊ देणार नाही.” मग अहरोन व मोशे म्हणाले, “इब्री लोकांचा देव आम्हांशी बोलला आहे. म्हणून आम्हांला रानात तीन दिवसाच्या वाटेवर जाऊ द्यावे आणि तेथे आमचा देव परमेश्वर याल यज्ञार्पण करू द्यावे अशी आम्ही आपणाला विनंती करतो. आणि आम्ही जर असे केले नाही तर तो मरीने किंवा तलवारीने आमच्यावर तुटून पडेल.” परंतु मिसराचा राजा फारो त्यांना म्हणाला, “हे मोशे, हे अहरोना, तुम्ही लोकांस काम सोडून जायला का लावता? तुम्ही आपल्या कामावर माघारी चालते व्हा. फारो त्यांना असेही म्हणाला, येथे आता आमच्या देशात खूप इब्री आहेत आणि तुम्ही त्यांना काम करण्यापासून थांबवत आहात.” त्याच दिवशी फारोने मुकादमांना व नायकांना आज्ञा दिली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही लोकांस विटा बनवण्याकरिता आजपर्यंत सतत गवत दिलेले आहे. परंतु आता त्यांना लागणारे गवत त्यांना स्वत: शोधून आणायला सांगा. तरी पूर्वी इतक्याच विटा त्यांनी बनवल्या पाहिजेत. त्यामध्ये काही कमी करून स्वीकारू नका. कारण ते आळशी झाले आहेत. म्हणूनच ते ओरड करून म्हणतात, आम्हांला जाण्याची परवानगी दे आणि आमच्या देवाला यज्ञ करू दे. तेव्हा त्यांच्यावर अधिक काम लादून त्यांना सतत कामात ठेवा. म्हणजे मग खोट्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाहीत.” म्हणून लोकांचे मुकादम व नायक लोकांकडे जाऊन म्हणाले, “फारो असे म्हणतो, तुम्हास विटा बनवण्यासाठी लागणारे गवत देणार नाही. तेव्हा तुम्हास लागणारे गवत तुम्ही स्वत:च आणले पाहिजे. तुमचे काम काही कमी होणार नाही.” म्हणून मग लोक गवत शोधण्याकरता सर्व मिसर देशभर पांगले. त्यांच्यावर नेमलेले मुकादम त्यांच्याकडून अधिक काम करवून घेऊन पूर्वी इतक्याच विटा तयार करण्याकरता त्यांच्यामागे सतत तगादा लावत. मिसराच्या मुकादमांनी इस्राएली लोकांवर नायक नेमले होते. त्यांना फारोच्या मुकादमांनी मार देऊन विचारले की, “तुम्ही पूर्वी जेवढ्या विटा बनवत होता तेवढ्या आता का बनवत नाही?”
निर्ग. 5 वाचा
ऐका निर्ग. 5
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्ग. 5:1-14
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ