निर्गम 16:1-12
निर्गम 16:1-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मग इस्राएली लोकांची मंडळी प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाली व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहचले. त्या रानात इस्राएल लोकांच्या मंडळीने मोशे व अहरोन यांच्यासंबंधी कुरकुर केली; इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “परमेश्वराच्या हातून आम्हांला मिसर देशामध्येच मरण आले असते तर बरे झाले असते, कारण तेथे आम्हांला खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांला येथे रानात उपासाने मारावे म्हणून आणले आहे.” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हास खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टी करीन; प्रत्येक दिवशी या लोकांनी आपल्याला त्या दिवसास पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरुन ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा पाहीन. सहाव्या दिवशी मात्र ते इतर दिवशी गोळा करतात त्याच्या दुप्पट असावे. ते जे गोळा करतील ते ते शिजवतील.” म्हणून मोशे व अहरोन सर्व इस्राएल लोकांस म्हणाले, “आज संध्याकाळी तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हास वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हास कळेल. उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराविरुध्द कुरकुर केली त्याने ती ऐकली आहे. आम्ही कोण की तुम्ही आम्हाविरुध्द कुरकुर करावी?” आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुध्द नाही तर परमेश्वराविरुध्द आहे.” मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांच्या मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या; कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.” मग अहरोन सर्व इस्राएल मंडळीशी बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना मेघात परमेश्वराचे तेज दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हास पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हास समजेल.”
निर्गम 16:1-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
इजिप्त देशातून बाहेर आल्यावर, दुसर्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी इस्राएलचा समुदाय एलीम येथून निघून एलीम व सीनायच्या मध्ये जे सीन रान आहे त्याकडे आला. त्या रानात सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली. इस्राएली लोक त्यांना म्हणाले, “इजिप्तमध्ये असतानाच याहवेहच्या हाताने आम्ही मेलो असतो तर किती बरे असते! तिथे आम्ही मांसाच्या भांड्याभोवती बसून हवे ते अन्न खाल्ले, पण तू हा सर्व समाज मरावा म्हणून आम्हाला या अरण्यात आणले आहे.” मग याहवेहने मोशेला म्हटले, “मी तुमच्यासाठी स्वर्गातून भाकरीची वृष्टी करेन. लोकांनी दररोज बाहेर जाऊन त्या दिवसासाठी पुरेलसे गोळा करावे. म्हणजे ते माझ्या सूचनेप्रमाणे वागतात की नाहीत याची मला परीक्षा करता येईल. सहाव्या दिवशी ते जे काही आत आणतील ते त्यांनी तयार करावे आणि दररोज ते जेवढे गोळा करतात त्यापेक्षा दुप्पट असावे.” मग मोशे व अहरोन यांनी सर्व इस्राएली लोकांना सांगितले, “संध्याकाळच्या वेळी तुम्हाला समजेल की याहवेहनेच तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले. आणि सकाळी तुम्ही याहवेहचे गौरव बघाल, कारण तुम्ही याहवेहविरुद्ध केलेली कुरकुर त्यांनी ऐकली आहे. आम्ही कोण आहोत की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?” मोशे म्हणाला, “संध्याकाळी जेव्हा याहवेह तुम्हाला मांस आणि सकाळी जी भाकर तुम्हाला पाहिजे ती खायला देतील, कारण त्यांनी त्यांच्याविरुद्ध केलेली तुमची कुरकुर ऐकली आहे. आम्ही कोण आहोत? तुम्ही आमच्याविरुद्ध नाही, तर याहवेहच्या विरुद्ध कुरकुर करीत आहात.” मग मोशे अहरोनाला म्हणाला, “संपूर्ण इस्राएली समुदायाला सांग, ‘याहवेहच्या समोर या, कारण त्यांनी तुमची कुरकुर ऐकली आहे.’ ” अहरोन सर्व इस्राएली लोकांशी बोलत असताना, त्यांनी रानाकडे पाहिले आणि त्यांना याहवेहचे गौरव ढगात प्रकट होत असलेले दिसले. याहवेह मोशेला म्हणाले, “मी इस्राएली लोकांची कुरकुर ऐकली आहे. त्यांना सांग, ‘सायंकाळी तुम्ही मांस खाल, व सकाळी तुम्ही भाकरीने तृप्त व्हाल. मग तुम्हाला समजेल की, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”
निर्गम 16:1-12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मग एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसर्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सीनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहचला. त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन ह्यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.” तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करीन; आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. सहाव्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते, इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे.” मोशे आणि अहरोन सर्व इस्राएल लोकांना म्हणाले, “परमेश्वरानेच तुम्हांला मिसर देशातून आणले हे तुम्हांला संध्याकाळी कळून येईल, आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही असे कोण की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?” मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हांला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल तेव्हा असे होईल; कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे.” मोशे अहरोनाला म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.” अहरोन इस्राएलांच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तेव्हा ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”