YouVersion लोगो
सर्च आयकॉन

निर्गम 16:1-12

निर्गम 16:1-12 MARVBSI

मग एलीम येथून कूच करून इस्राएल लोकांचा सर्व समुदाय मिसर देशातून निघाल्यावर दुसर्‍या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम आणि सीनाय ह्यांच्यामधल्या सीन रानात येऊन पोहचला. त्या रानात इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीने मोशे व अहरोन ह्यांच्या संबंधाने कुरकुर केली. इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवत होतो तेव्हा आम्हांला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरवले असते; पण ह्या सर्व समुदायाला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हांला ह्या रानात आणले आहे.” तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, “पाहा, मी आकाशातून तुमच्यासाठी अन्नवृष्टी करीन; आणि लोकांनी बाहेर जाऊन एकेका दिवसाला पुरेल इतके जमा करावे, ह्यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही ह्याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. सहाव्या दिवशी ते जे काही जमा करून शिजवतील ते, इतर दिवशी ते जमा करतात त्याच्या दुप्पट असावे.” मोशे आणि अहरोन सर्व इस्राएल लोकांना म्हणाले, “परमेश्वरानेच तुम्हांला मिसर देशातून आणले हे तुम्हांला संध्याकाळी कळून येईल, आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल, कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही असे कोण की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?” मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हांला संध्याकाळी मांस खायला देईल व सकाळी पोटभर भाकर देईल तेव्हा असे होईल; कारण तुम्ही परमेश्वराविरुद्ध जी कुरकुर करीत आहात ती त्याने ऐकली आहे; आम्ही कोण? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुद्ध नाही तर परमेश्वराविरुद्ध आहे.” मोशे अहरोनाला म्हणाला, “इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वरासमोर या, कारण त्याने तुमची कुरकुर ऐकली आहे.” अहरोन इस्राएलांच्या सर्व मंडळीशी बोलत असता त्यांनी रानाकडे नजर फिरवली, तेव्हा ढगात परमेश्वराचे तेज त्यांना दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएल लोकांची कुरकुर मी ऐकली आहे; त्यांना सांग की संध्याकाळी तुम्ही मांस खाल आणि सकाळी पोटभर भाकर खाल, म्हणजे मी तुमचा देव परमेश्वर आहे हे तुम्ही जाणाल.”