मग इस्राएली लोकांची मंडळी प्रवास करीत एलीम या ठिकाणाहून निघाली व मिसरमधून निघाल्यानंतर दुसऱ्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी एलीम व सीनाय यांच्या दरम्यान असलेल्या सीन रानात येऊन पोहचले. त्या रानात इस्राएल लोकांच्या मंडळीने मोशे व अहरोन यांच्यासंबंधी कुरकुर केली; इस्राएल लोक त्यांना म्हणू लागले की, “परमेश्वराच्या हातून आम्हांला मिसर देशामध्येच मरण आले असते तर बरे झाले असते, कारण तेथे आम्हांला खावयास लागणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर होते; परंतु तुम्ही आम्हांला येथे रानात उपासाने मारावे म्हणून आणले आहे.” मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुम्हास खाण्याकरता मी आकाशातून अन्नवृष्टी करीन; प्रत्येक दिवशी या लोकांनी आपल्याला त्या दिवसास पुरेल एवढे अन्न बाहेर जाऊन गोळा करावे. यावरुन ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात की नाही हे पाहण्यासाठी मी त्यांची परीक्षा पाहीन. सहाव्या दिवशी मात्र ते इतर दिवशी गोळा करतात त्याच्या दुप्पट असावे. ते जे गोळा करतील ते ते शिजवतील.” म्हणून मोशे व अहरोन सर्व इस्राएल लोकांस म्हणाले, “आज संध्याकाळी तुम्ही परमेश्वराचे सामर्थ्य पाहाल; तेव्हा मिसरमधून तुम्हास वाचविणारा परमेश्वर हाच आहे हे तुम्हास कळेल. उद्या सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल; तुम्ही परमेश्वराविरुध्द कुरकुर केली त्याने ती ऐकली आहे. आम्ही कोण की तुम्ही आम्हाविरुध्द कुरकुर करावी?” आणि मोशे म्हणाला, “परमेश्वर तुम्हास संध्याकाळी मांस खावयास देईल; आणि सकाळी पोटभर भाकरी देईल; कारण तुम्ही परमेश्वराविरूद्ध कुरकुर करीत आहा ती त्याने ऐकली आहे. आम्ही कोण आहो? तुमचे कुरकुरणे आमच्याविरुध्द नाही तर परमेश्वराविरुध्द आहे.” मग मोशे अहरोनाला म्हणाला, “तू इस्राएल लोकांच्या मंडळीला सांग की, तुम्ही परमेश्वराकडे एकत्र या; कारण त्याने तुमच्या तक्रारी ऐकल्या आहेत.” मग अहरोन सर्व इस्राएल मंडळीशी बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना मेघात परमेश्वराचे तेज दिसले. परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी इस्राएल लोकांच्या तक्रारी ऐकल्या आहेत तेव्हा त्यांना सांग, रात्री तुम्ही मांस खाल आणि दररोज सकाळी तुम्हास पाहिजे तितक्या भाकरी खाल; मग परमेश्वर मी तुमचा देव आहे हे तुम्हास समजेल.”
निर्ग. 16 वाचा
ऐका निर्ग. 16
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्ग. 16:1-12
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ