YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस पत्र 5:3-14

इफिसकरांस पत्र 5:3-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो. जारकर्मी, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी (हा मूर्तिपूजक आहे), असल्या कोणालाही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वारसा नाही हे तुम्ही जाणूनच आहात. पोकळ भाषणाने कोणी तुम्हांला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणार्‍या लोकांवर देवाचा कोप होतो. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका; कारण पूर्वी तुम्ही अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात; प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; (कारण प्रकाशाचे फळ1 सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यांत दिसून येते.) प्रभूला काय संतोषकारक2 आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचा निषेध करा; कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात, कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून तो म्हणतो,1 “हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ. म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.”2

इफिसकरांस पत्र 5:3-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही. तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी. कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तीपुजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे. म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका. कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात. प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या. आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा. कारण ज्या गुप्त गोष्टी त्यांनी केल्या आहेत, त्याविषयीचे वर्णन करणेदेखील लज्जास्पद आहे. सर्वकाही प्रकाशाद्वारे उघड होते. कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”

इफिसकरांस पत्र 5:3-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

तुमच्यामध्ये लैंगिक पापे, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा लोभ यांची अप्रत्यक्ष सूचना देखील असू नये, कारण या गोष्टी परमेश्वराच्या पवित्र लोकांसाठी अयोग्य आहेत. आणि अश्लीलता, मूर्खपणाचे बोलणे, असभ्य विनोद यांचे तुम्हामध्ये स्थान नसावे, ते उचित नाहीत, त्याऐवजी उपकारस्तुती व्हावी. तुम्ही या गोष्टीविषयी खात्री बाळगा: व्यभिचारी, अशुद्ध किंवा लोभी असा व्यक्ती मूर्तिपूजक आहे, त्यास ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही. पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्‍यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो. यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार सुद्धा होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा. (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.) प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या. अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा. अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल. परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते. त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.”

इफिसकरांस पत्र 5:3-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)

पवित्र जनांमध्ये उचित ठरते त्याप्रमाणे लैंगिक अनैतिकता, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचा उल्लेखसुद्धा तुमच्यामधे केला जाऊ नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही तुमच्यामध्ये उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यांपेक्षा तुम्ही देवाचे आभार मानत राहा. लैंगिक अनैतिकतेने वागणारा, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात मुळीच वारसा नाही, ह्याची खातरी बाळगा. पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होईल. म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. पूर्वी तुम्ही अंधकारमय होता पण आता तुम्ही प्रभूवरील निष्ठेमुळे प्रकाशात आला आहात; म्हणून प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; कारण ज्ञानाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नैतिकता व सत्यता ह्यांत दिसून येते. प्रभू कशामूळे संतुष्ट होतो, हे समजून घ्या. अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचे खरे स्वरूप उघड करा. त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उल्लेख करणेदेखील लज्जास्पद आहे. प्रकाशात उघड केलेल्या सर्व गोष्टी दृश्यमान होतील. जे दृश्यमय होते, ते प्रकाशमय असते. कारण असे म्हटले आहे, हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.