YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांना 5

5
1तर मग देवाची प्रिय मुले ह्या नात्याने तुम्ही त्याचे अनुकरण करणारे व्हा. 2ख्रिस्ताने तुमच्यावर प्रीती केली आणि देवाला सुवास मिळावा म्हणून स्वतःला आपल्याकरिता अर्पण व यज्ञ म्हणून दिले, त्याप्रमाणे तुम्हीही प्रीतीने चाला.
3पवित्र जनांमध्ये उचित ठरते त्याप्रमाणे लैंगिक अनैतिकता, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचा उल्लेखसुद्धा तुमच्यामधे केला जाऊ नये. 4तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही तुमच्यामध्ये उच्चार न होवो, ती उचित नाहीत, तर त्यांपेक्षा तुम्ही देवाचे आभार मानत राहा. 5लैंगिक अनैतिकतेने वागणारा, अशुद्ध कृती करणारा किंवा लोभी हा मूर्तिपूजक आहे. असल्या कोणासही ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात मुळीच वारसा नाही, ह्याची खातरी बाळगा.
6पोकळ भाषणाने कोणी तुम्हाला फसवू नये; कारण अशा गोष्टींमुळे आज्ञा मोडणाऱ्या लोकांवर देवाचा कोप होईल. 7म्हणून तुम्ही त्यांचे भागीदार होऊ नका. 8पूर्वी तुम्ही अंधकारमय होता पण आता तुम्ही प्रभूवरील निष्ठेमुळे प्रकाशात आला आहात; म्हणून प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; 9कारण ज्ञानाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नैतिकता व सत्यता ह्यांत दिसून येते. 10प्रभू कशामूळे संतुष्ट होतो, हे समजून घ्या. 11अंधाराच्या निष्फळ कर्मांचे भागीदार होऊ नका, तर उलट त्यांचे खरे स्वरूप उघड करा. 12त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात, त्यांचा उल्लेख करणेदेखील लज्जास्पद आहे. 13प्रकाशात उघड केलेल्या सर्व गोष्टी दृश्यमान होतील. जे दृश्यमय होते, ते प्रकाशमय असते. 14कारण असे म्हटले आहे,
हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यांतून ऊठ,
म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल.
15तर मग अज्ञान्यांसारखे नव्हे तर ज्ञान्यांसारखे सभोवार नजर ठेवून जपून चाला. 16प्रत्येक चांगल्या संधीचा सदुपयोग करा, कारण हे वाईट दिवस आहेत. 17तुम्ही मूर्ख होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे, हे समजून घ्या.
18द्राक्षारसाने मस्त होऊ नका. कारण त्यात बेतालपणा आहे. उलट, पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हा. 19स्तोत्रे, भक्तिगीते व अध्यात्मिक गाणी तुमच्यामध्ये गात राहून तुमच्या अंतःकरणामध्ये प्रभूसाठी गायन-वादन करा. 20आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टींबद्दल सर्वदा देवपित्याला धन्यवाद देत जा. 21ख्रिस्ताचा आदर बाळगून एकमेकांच्या अधीन असा.
ख्रिस्ती कुटुंबाचा जीवनक्रम
22पत्नींनो, तुम्ही जशा प्रभूच्या अधीन, तशा तुमच्या पतीच्या अधीन असा. 23जसा ख्रिस्त हा ख्रिस्तमंडळीचे मस्तक आहे, तसा पती हा पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त हाच ख्रिस्तमंडळीचा म्हणजेच त्यांच्या शरीराचा तारणारा आहे. 24म्हणून ख्रिस्तमंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते, तसे पत्नींनीही सर्व गोष्टींत त्यांच्या पतीच्या अधीन असावे.
25पतींनो, जशी ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने ख्रिस्तमंडळीसाठी स्वतःचे समर्पण केले. 26अशासाठी की, त्याने तिला वचनाद्वारे बाप्‍तिस्म्याने स्वच्छ करून पवित्र करावे, 27म्हणजे त्याने तिला सर्व वैभवासह स्वत:ला सादर करावे. म्हणजेच ती शुद्ध व निर्दोष असावी; तिला सुरकुती किंवा इतर काही कलंक नसावा. 28अशा प्रकारे पतीने त्याची पत्नी त्याचेच शरीर आहे, असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो, तो स्वतःवरच प्रीती करतो. 29कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष करत नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो, अगदी ख्रिस्त ख्रिस्तमंडळीचे पालनपोषण करतो तसे; 30कारण आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. 31पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, ‘पुरुष आपल्या आईबापांना सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती उभयता एकदेह होतील.’ 32हे रहस्य महान आहे पण मी ख्रिस्त व ख्रिस्तमंडळी ह्यांच्याविषयी बोलत आहे. 33तथापि तुम्हांलाही ते लागू पडते. प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी आणि पत्नीने आपल्या पतीचा आदर राखावा.

सध्या निवडलेले:

इफिसकरांना 5: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन