YouVersion लोगो
सर्च आयकॉन

इफिसकरांस 5:3-14

इफिसकरांस 5:3-14 MRCV

तुमच्यामध्ये लैंगिक पापे, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा लोभ यांची अप्रत्यक्ष सूचना देखील असू नये, कारण या गोष्टी परमेश्वराच्या पवित्र लोकांसाठी अयोग्य आहेत. आणि अश्लीलता, मूर्खपणाचे बोलणे, असभ्य विनोद यांचे तुम्हामध्ये स्थान नसावे, ते उचित नाहीत, त्याऐवजी उपकारस्तुती व्हावी. तुम्ही या गोष्टीविषयी खात्री बाळगा: व्यभिचारी, अशुद्ध किंवा लोभी असा व्यक्ती मूर्तिपूजक आहे, त्यास ख्रिस्ताच्या आणि परमेश्वराच्या राज्याचे वतन मिळणार नाही. पोकळ शब्दांनी कोणी तुम्हाला फसवू नये, या गोष्टींमुळे आज्ञाभंग करणार्‍यांवर परमेश्वराचा क्रोध भडकतो. यास्तव तुम्ही त्यांचे भागीदार सुद्धा होऊ नका. कारण पूर्वी तुम्ही अंधकार होता, परंतु आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश आहात. प्रकाशाच्या लेकरांसारखे जगा. (प्रकाशाचे फळ सर्वप्रकारचे चांगुलपण, नीतिमत्व व सत्यता यामध्ये आहे.) प्रभू कशाने प्रसन्न होतात याचा शोध घ्या. अंधकाराच्या निष्फळ कर्मांशी तुम्हाला काहीच करावयाचे नाही, त्याऐवजी ते उघडकीस आणा. अवज्ञा करणारे जे गुप्तपणे करतात, त्यांचा उल्लेख करणे देखील लज्जास्पद होईल. परंतु प्रकाशाद्वारे सर्वकाही उघड होते, ते दृष्टीस पडते आणि जे सर्वकाही प्रकाशित केलेले आहे ते प्रकाश असे होते. त्यामुळेच असे म्हटले आहे: “अरे निद्रास्ता, जागा हो, मेलेल्यामधून ऊठ म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशतील.”