दानीएल 6:13-23
दानीएल 6:13-23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तेव्हा ते राजास म्हणाले, “तो मनुष्य दानीएल जो यहूद्यांपैकी एक आहे तो आपणास व आपल्या फर्मानास न जुमानता दिवसातून तीन वेळा आपल्या देवाजवळ प्रार्थना करतो.” हे शब्द ऐकून राजा अती खिन्न झाला आणि दानीएलाचा बचाव कसा करावा याचा विचार करू लागला त्यासाठी सुर्यास्तापर्यंत तो खटपट करत राहीला. तेव्हा हा कट करणारे लोक राजासमोर जमले व त्यास म्हणाले, राजा हे लक्षात घे, मेदी व पारसी याच्या कायद्याप्रमाणे राजाचे फर्मान किंवा कायदा बदलता येत नाही. नंतर राजदेशानुसार दानीएलास आणून सिंहाच्या गुहेत टाकले राजा दानीएलास म्हणाला, “ज्या देवाची तू सेवा करतोस तो तुला सोडवो.” त्यांनी एक मोठा दगड आणून गुहेच्या दारावर ठेवला, मग राजाने आपली आणि सरदाराची मुद्रा घेवून त्यावर शिक्का मारला तो यासाठी की दानीएलाच्या बाबतीत काही फेरबदल करता येणार नाही. नंतर राजा त्याच्या महलात गेला. ती रात्र तो न जेवता असाच राहिला, त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत, त्याची झोप उडून गेली. मग मोठ्या पहाटे राजा उठला आणि त्वरीत सिंहाच्या गुहेजवळ गेला. गुहेजवळ येताच तो दु:खीस्वराने दानीएलास हाक मारू लागला तो म्हणाला, दानीएला जिवंत देवाच्या सेवका, तुझा देव ज्याची तू नित्य सेवा करतोस त्यास सिंहापासून तुला सोडवता आले काय? दानीएल राजास म्हणाला, “महाराज चिरायू असा माझ्या देवाने त्याचा दिव्यदूत पाठवून सिंहाची तोंडे बंद केली त्यांनी मला इजा केली नाही. त्याच्यासमोर आणि आपल्यासमोर मी निर्दोष ठरलो व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.” नंतर राजाने आनंदी होऊन आज्ञा केली की, “दानीएलास गुहेतून बाहेर काढा” मग दानीएलास बाहेर काढले त्याच्या शरीरावर इजा नव्हती कारण त्याने आपल्या देवावर विश्वास ठेवला.
दानीएल 6:13-23 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.” जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. नंतर लोक जमावाने राजाकडे आले आणि त्यांना म्हटले, “महाराज, मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार राजा जे फर्मान काढतो त्याला ते रद्द करता येणार नाही.” तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!” आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये. मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती. राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला. जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?” तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो! माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.” तेव्हा राजा अतिशय आनंदित झाला आणि दानीएलला गुहेतून बाहेर काढण्याचा त्याने हुकूम सोडला. जेव्हा दानीएलला गुहेतून वर काढण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, कारण त्याने आपल्या परमेश्वरावर भरवसा ठेवला होता.
दानीएल 6:13-23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तेव्हा ते राजाला म्हणाले, “महाराज, पकडून आणलेल्या यहूद्यांपैकी तो दानीएल आपणाला व आपण सही केलेल्या द्वाहीला जुमानत नाही; तर तो नित्य तीनदा प्रार्थना करतो.” हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला, आणि दानिएलाचा बचाव करण्याचा तो विचार करू लागला; त्याचा बचाव करावा म्हणून त्याने सूर्य मावळेपर्यंत प्रयत्न केला. मग ती सर्व माणसे राजाकडे जमावाने आली व त्याला म्हणाली, “हे राजा हे लक्षात आण : मेदी व पारसी ह्यांचा असा शिरस्ता आहे की राजाने केलेल्या द्वाह्या किंवा नियम पालटता येत नाहीत.” त्यावर राजाज्ञेवरून दानिएलास आणवून सिंहाच्या गुहेत टाकले. राजा दानिएलास म्हणाला, “ज्या देवाची तू नित्य सेवा करतोस तो तुला सोडवील.” त्यांनी एक शिला आणून गुहेच्या दारावर ठेवली; आणि राजाने आपल्या मुद्रेचा व आपल्या सरदारांच्या मुद्रांचा तिच्यावर शिक्का केला; तो अशासाठी की दानिएलाच्या बाबतीत काहीएक फेरबदल होऊ नये. नंतर राजा आपल्या महालात गेला, त्याने ती रात्र उपाशीच काढली; त्याच्यासमोर वाद्ये आणली नाहीत; त्याची झोप उडाली. मग राजा मोठ्या पहाटेस उठून त्वरेने सिंहाच्या गुहेनजीक गेला. तो गुहेजवळ दानिएलाकडे जाऊन शोकस्वराने ओरडून म्हणाला, “हे दानिएला, जिवंत देवाच्या सेवका, ज्या देवाची सेवा तू नित्य करतोस त्याला सिंहापासून तुला सोडवता आले आहे काय?” दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा. माझ्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सिंहांची तोंडे बंद केली आहेत. त्यांनी मला काहीएक उपद्रव केला नाही; कारण त्या देवासमोर मी निरपराधी ठरलो; व महाराज आपलाही मी काही अपराध केला नाही.” तेव्हा राजाने अत्यंत हर्षित होऊन आज्ञा केली की, “दानिएलास गुहेतून बाहेर काढा.” त्याला गुहेतून बाहेर काढले तेव्हा त्याला काही इजा झाल्याचे दिसून आले नाही, कारण त्याचा आपल्या देवावर भरवसा होता.