YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 6:13-23

दानीएल 6:13-23 MRCV

नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.” जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. नंतर लोक जमावाने राजाकडे आले आणि त्यांना म्हटले, “महाराज, मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार राजा जे फर्मान काढतो त्याला ते रद्द करता येणार नाही.” तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!” आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्‍यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये. मग राजा आपल्या महालात परतला व काहीही जेवण न करता आणि कोणतीही करमणूक न करता त्याने संपूर्ण रात्र काढली आणि त्याला झोप येत नव्हती. राजा भल्या पहाटे उठला आणि लगबगीने सिंहांच्या गुहेकडे गेला. जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?” तेव्हा दानीएलने उत्तर दिले, “महाराज चिरायू असो! माझ्या परमेश्वराने आपले दूत पाठविले आणि त्याने सिंहांची तोंडे बंद केली. त्यांनी मला उपद्रव केला नाही. कारण मी त्यांच्या दृष्टीत निरपराधी आढळलो आहे. तसेच महाराज, मी तुमच्यासमोरही काही अपराध केलेला नाही.” तेव्हा राजा अतिशय आनंदित झाला आणि दानीएलला गुहेतून बाहेर काढण्याचा त्याने हुकूम सोडला. जेव्हा दानीएलला गुहेतून वर काढण्यात आले, तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती, कारण त्याने आपल्या परमेश्वरावर भरवसा ठेवला होता.

दानीएल 6 वाचा