YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 5:22-31

दानीएल 5:22-31 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस. तर स्वर्गीय प्रभूशी तू उद्दामपणा केलास त्याच्या मंदीरातील सुवर्णपात्र त्यांना आणून तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी, आणि तुझ्या उपपत्नी त्यामधून द्राक्षरस प्याला आहात आणि सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड, आणि दगड हयापासून बनलेल्या मूर्ती ज्या पाहत नाहीत ऐकत नाहीत, किंवा समजत नाही त्यांचे तू स्तवन केलेस पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे व जो तुझे सर्व मार्ग जाणतो त्या देवास मान दिला नाहीस. म्हणून देवाने त्याच्या उपस्थितीतून आपला हात लिहीण्यास पाठविला आणि हे लिहीले. हा लिखीत लेख असा: ‘मने, मने, तकेल, ऊफारसीन.’ ह्याचा अर्थ असा आहे, मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काळ मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीने मोजले पण तू उणा भरला आहेस. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी आणि पारसी हयांना दिले आहे.” तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केली आणि त्यांना दानीएलास जांभळी वस्त्रे घालून त्याच्या गळयात सोन्याचा गोफ घातला आणि त्या विषयी राजाने जाहीर घोषणा केली की राज्यातील तिघा प्रशासकांपैकी हा एक आहे. त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याला ठार मारण्यात आले. आणि दारयावेश मेदी हा बासष्ट वर्षाचा असता राजा झाला.

सामायिक करा
दानीएल 5 वाचा

दानीएल 5:22-31 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

“परंतु बेलशस्सर तुम्ही त्याचे पुत्र असून स्वतःला नम्र केले नाही, जेव्हा की आपल्याला हे सर्व माहिती आहे. त्याऐवजी तुम्ही स्वर्गाच्या प्रभूच्या विरोधात उभे राहिले. त्यांच्या मंदिरातील पात्रे तुम्ही आपल्याकडे आणली. आपण स्वतः आणि आपले अधिकारी, राण्या, उपपत्नीसह द्राक्षारस प्याले. चांदी आणि सोने, कास्य, लोखंड, लाकूड आणि दगड या दैवतांची, ज्यांना पाहता येत नाही की ऐकता येत नाही की समजत नाही, त्यांची स्तुती केली. पण ज्यांच्या हातात तुमचे जीवन आणि तुमचे संपूर्ण मार्ग आहे त्या परमेश्वराचा तुम्ही आदर केला नाही. म्हणून त्यांनी हा हात पाठविला आहे, ज्याने हे लिखाण लिहिले आहे. “हा तो शिलालेख आहे जो लिहिण्यात आला: मने, मने तकेल, ऊ फारसीन. “या शब्दांचा अर्थ हा असा: “ मने : परमेश्वराने आपल्या राजवटीचे दिवस मोजले आहेत आणि त्याचा अंत केला आहे. “ तकेल : तराजूत आपणास तोलण्यात आले आहे आणि आपण वजनात कमी भरला आहात. “ फारसीन : आपल्या राज्याचे दोन भाग करण्यात आले आहे आणि मेदिया व पर्शियन यांना देण्यात आले आहेत.” नंतर बेलशस्सरच्या आज्ञेवरून दानीएलला जांभळा पोशाख घालण्यात आला. त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घालण्यात आली व तो राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा अधिपती आहे, असे जाहीर करण्यात आले. त्याच रात्री खाल्डियन लोकांचा राजा बेलशस्सर याचा वध झाला; आणि मेदिया राजा दारयावेश, याने नगरात प्रवेश केला व वयाच्या बासष्टाव्या वर्षी तो राज्य करू लागला.

सामायिक करा
दानीएल 5 वाचा

दानीएल 5:22-31 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे बेलशस्सरा, तू त्याचा पुत्र आहेस. हे सर्व तुला ठाऊक असून तू आपले मन नम्र केले नाहीस; तर स्वर्गीच्या प्रभूबरोबर तू उद्दामपणा केलास; त्याच्या मंदिरातील पात्रे तुझ्यापुढे आणली आहेत; तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी व उपपत्नी ही त्यांतून द्राक्षारस प्याली आहेत आणि रुपे, सोने, पितळ, लोखंड, काष्ठ व पाषाण ह्यांची घडलेली दैवते, ज्यांना दिसत नाही, ऐकता येत नाही व समजत नाही, त्यांचे तू स्तवन केलेस; पण ज्याच्या हाती तुझा प्राण आहे व ज्याच्या स्वाधीन तुझे सर्व व्यवहार आहेत त्या देवाला मान दिला नाहीस; म्हणून त्याने ती हाताची बोटे पाठवली व हा लेख लिहिला. हा लिहिलेला लेख असा : मने, मने, तकेल, ऊफारसीन. ह्याचा अर्थ असा : मने म्हणजे देवाने तुझ्या राज्याचा काल मोजून त्याचा अंत केला आहे. तकेल म्हणजे तुला तागडीत तोलले व तू उणा भरलास. परेस म्हणजे तुझे राज्य विभागून मेदी व पारसी ह्यांना दिले आहे.” तेव्हा बेलशस्सराने आज्ञा केल्यावरून त्यांनी दानिएलास जांभळ्या रंगाचा पोशाख लेववला. त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला व त्याच्यासंबंधाने सर्वत्र द्वाही फिरवली की हा राज्यातील तिघा अधिपतींतला एक आहे. त्याच रात्री खास्द्यांचा राजा बेलशस्सर ह्याचा वध झाला. आणि दारयावेश मेदी हा सुमारे बासष्ट वर्षांचा असता राजपदारूढ झाला.

सामायिक करा
दानीएल 5 वाचा