YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 4:28-37

दानीएल 4:28-37 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

हे सर्व राजा नबुखद्नेस्सरासोबत बारा महिन्यात घडून आले तो बाबेलातील राजवाड्यात फिरत होता. “काय ही महान बाबेल नगरी, जी मी माझ्या राज निवासासाठी आणि माझ्या गौरवासाठी बांधली.” जेव्हा राजा हे बोलत होता. पाहा स्वर्गातून वाणी झाली, “राजा नबुखद्नेस्सरा, हे फर्मान ऐक, तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला लोकातून काढून टाकण्यात येईल तुझी वस्ती वनपशूत होईल तुला बैलांसारखे गवत खावे लागेल आणि मानवी राज्यावर देवाची सत्ता आहे, तो ते पाहिजे त्यांना देतो, हे तुला ज्ञान होईपर्यंत सात वर्षे जातील.” हे फर्मान त्याच घटकेस नबुखद्नेस्सराचा विरोधात अमलात आले. त्यास मानसातून काढण्यात आले, त्याने बैलांसारखे गवत खाल्ले. त्याचे शरीर आकाशातल्या दवांनी भिजले त्याचे केस गरुडाच्या पिसाप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्षाच्या नखांसारखी झाली. या दिवसाच्या शेवटी मी नबुखद्नेस्सराने माझे डोळे आकाशाकडे लावले, माझी बुद्धीमत्ता मला परत मिळाली, मी सर्वोच्च देवाचे आभार मानले, जो सदाजिवी देव त्याचा मी सन्मान केला आणि त्याची थोरवी गाईली, कारण त्याचे प्रभूत्व कायमचे आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. भूतलावरील सर्व रहीवासी त्यास शुन्यवत आहेत. तो स्वर्गातील आपल्या सैन्याचे, भूतलावरील रहीवाश्यांचे पाहिजे ते करतो, कोणीही त्यास थांबवू शकत नाही किंवा विचारू शकत नाही की “तू हे का केले?” त्याच समयी माझी बुध्दीमत्ता परत मिळाली माझे राजवैभव आणि प्रताप मला परत प्राप्त झाले मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मला मोठी थोरवी प्राप्त झाली. आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गीय राजास गौरव देवून त्याची खूप स्तुती करतो, कारण त्याची सर्व कामे सभ्यतेची आणि त्याचे मार्ग न्यायाचे आहेत. जे गर्वाने चालतात त्यास तो नम्र करतो.

सामायिक करा
दानीएल 4 वाचा

दानीएल 4:28-37 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले. बारा महिन्यानंतर राजा बाबेलमधील राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता, मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?” तो हे शब्द उच्चारतो न उच्चारतो, तोच स्वर्गातून वाणी आली, “हे राजा नबुखद्नेस्सर, तुझ्यासाठी हे फर्मान घेण्यात आले आहे: तुझा राजेशाही अधिकार तुझ्यापासून काढून घेण्यात आला आहे. तुला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तू वन्यप्राण्यांसह राहशील; तू बैलाप्रमाणे गवत खाशील. सात कालखंड संपेपर्यंत तू असे स्वीकारशील की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला राज्ये देतात.” नबुखद्नेस्सरबद्दल जे बोलण्यात आले होते ते त्याच घटकेला पूर्ण झाले. त्याला लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर दवाने भिजून ओलेचिंब झाले, त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे लांब वाढले आणि पक्ष्यांच्या नखांसारखी त्याची नखे वाढली. निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची सत्ता शाश्वत आहे. त्यांचे साम्राज्य पिढ्यान् पिढ्या राहणारे आहे. पृथ्वीवरील सर्व लोक कवडीमोलाचे आहेत. स्वर्गातील शक्तींमध्ये आणि पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात. त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही अथवा त्यांना बोलू शकत नाही: “तुम्ही हे काय केले?” माझी बुद्धी मला परत लाभली. त्याचप्रमाणे माझा मान, वैभव आणि राज्य हेदेखील सर्व मला परत मिळाले. माझे मंत्री व अधिकारी माझ्याकडे परत आले, आणि मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मी पूर्वीपेक्षा अधिक महान झालो. आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.

सामायिक करा
दानीएल 4 वाचा

दानीएल 4:28-37 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

हे सगळे नबुखद्नेस्सर राजा ह्याच्यावर गुजरले. बारा महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!” हे शब्द राजाच्या मुखातून निघतात न निघतात तोच आकाशवाणी झाली की, “हे राजा, नबुखद्नेस्सरा, हे तुला विदित होवो की तुझ्या हातची राजसत्ता गेली आहे. तुला मनुष्यांतून घालवून देतील; तुझी वस्ती वनपशूंत होईल; तुला बैलाप्रमाणे गवत खावे लागेल; आणि मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे व तो ते पाहिजे त्याला देतो हे ज्ञान तुला होईपर्यंत तुझ्यावरून सात काळ जातील.” त्याच घटकेस हे नबुखद्नेस्सराच्या प्रत्ययास आले; त्याला मनुष्यांतून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला; त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले; येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांप्रमाणे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली. हे दिवस संपल्यावर मी नबुखद्नेस्सराने आपले डोळे आकाशाकडे लावले; माझी बुद्धी मला परत आली; मी परात्पर देवाचा धन्यवाद केला, त्या सदा जिवंत असणार्‍या देवाचे स्तवन केले व त्याचा महिमा गाइला; कारण त्याचे प्रभुत्व सर्वकाळचे आहे, आणि त्याचे राज्य पिढ्यानपिढ्या राहणारे आहे. पृथ्वीवरील सर्व रहिवासी केवळ क:पदार्थ होत; तो आकाशातील आपल्या सैन्याचे व पृथ्वीवरील रहिवाशांचे इच्छेस येईल ते करतो; “तू असे काय करतोस?” असे त्याचा हात धरून कोणाच्याने त्याला म्हणवत नाही. त्याच वेळी माझी बुद्धी मला परत आली; माझ्या राज्याच्या वैभवास्तव माझा प्रताप व तेज ही मला पुन्हा प्राप्त झाली; माझे मंत्री व माझे सरदार माझ्या भेटीस आले; मी आपल्या राज्यात स्थापित झालो; व मला अत्यंत मोठी थोरवी प्राप्त झाली. आता मी नबुखद्नेस्सर स्वर्गीच्या राजाचे स्तवन करतो, त्याचा जयजयकार करतो व त्याचा महिमा वर्णन करतो; कारण त्याची सर्व कृत्ये सत्य आहेत, त्याचे सर्व मार्ग न्याय्य आहेत; जे अभिमानाने चालतात त्यांना त्याला नीचावस्थेत लोटता येते.

सामायिक करा
दानीएल 4 वाचा