YouVersion लोगो
सर्च आयकॉन

दानीएल 4:28-37

दानीएल 4:28-37 MRCV

हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले. बारा महिन्यानंतर राजा बाबेलमधील राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता, मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?” तो हे शब्द उच्चारतो न उच्चारतो, तोच स्वर्गातून वाणी आली, “हे राजा नबुखद्नेस्सर, तुझ्यासाठी हे फर्मान घेण्यात आले आहे: तुझा राजेशाही अधिकार तुझ्यापासून काढून घेण्यात आला आहे. तुला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तू वन्यप्राण्यांसह राहशील; तू बैलाप्रमाणे गवत खाशील. सात कालखंड संपेपर्यंत तू असे स्वीकारशील की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला राज्ये देतात.” नबुखद्नेस्सरबद्दल जे बोलण्यात आले होते ते त्याच घटकेला पूर्ण झाले. त्याला लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर दवाने भिजून ओलेचिंब झाले, त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे लांब वाढले आणि पक्ष्यांच्या नखांसारखी त्याची नखे वाढली. निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत, त्यांची सत्ता शाश्वत आहे. त्यांचे साम्राज्य पिढ्यान् पिढ्या राहणारे आहे. पृथ्वीवरील सर्व लोक कवडीमोलाचे आहेत. स्वर्गातील शक्तींमध्ये आणि पृथ्वीवरील रहिवाशांमध्ये त्यांना जे योग्य वाटते तेच ते करतात. त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही अथवा त्यांना बोलू शकत नाही: “तुम्ही हे काय केले?” माझी बुद्धी मला परत लाभली. त्याचप्रमाणे माझा मान, वैभव आणि राज्य हेदेखील सर्व मला परत मिळाले. माझे मंत्री व अधिकारी माझ्याकडे परत आले, आणि मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मी पूर्वीपेक्षा अधिक महान झालो. आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.

दानीएल 4 वाचा