दानीएल 2:1-9
दानीएल 2:1-9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
नबुखद्नेस्सर राजाच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्यास स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही. तेव्हा राजाने फर्मान काढला की, जादूगार आणि ज्योतिषी जाणणारे तसेच मांत्रिक आणि ज्ञानी लोक ह्यांनी यावे आणि राजाला ते स्वप्न सांगावे, म्हणून ते राजासमोर हजर झाले. राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकूळ झाले आहे.” तेव्हा ज्ञानी लोक राजाशी आरामी भाषेत बोलले “महाराज चिरायू असा! तुमच्या सेवकांना तुमचे स्वप्न सांगा आणि आम्ही त्याचा अर्थ तुम्हास प्रगट करू!” राजाने खास्दी लोकांस उत्तर दिले, “हा ठराव होऊन चुकला आहे जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणार नाही तर तुमच्या शरीराचे तुकडे केले जातील आणि तुमच्या घरांचे उकिरडे केले जातील. पण जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगाल तर तुम्हास माझ्याकडून भेट, पारितोषिक आणि मोठा मान मिळेल. यास्तव तुम्ही मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.” ते पुन्हा त्यास म्हणाले, “महाराजांनी आपल्या सेवकांस स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” राजाने उत्तर दिले, “मला ठाऊक आहे तुम्ही वेळ काढत आहात; पाहिजे कारण तुम्हास ठाऊक आहे की, माझा ठराव झालेला आहे. पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे. म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्या आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही त्याचा उलगडा करु शकता.”
दानीएल 2:1-9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आपल्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला स्वप्न पडले; त्याचे मन व्याकूळ झाले आणि त्याला झोप येत नव्हती. म्हणून राजाने आदेश दिला की जादूगार, मांत्रिक, तांत्रिक आणि ज्योतिषी यांना बोलवावे आणि त्याला जे स्वप्न पडले ते सांगावे, जेव्हा ते आत आले आणि राजासमोर उभे राहिले, तो राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे, ज्यामुळे मी व्याकूळ झालो आणि त्याचा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे.” त्या ज्योतिषांनी राजाला उत्तर दिले, “महाराज, चिरायू असा! आपले स्वप्न काय होते ते आपल्या सेवकांना सांगावे, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” त्यावर राजाने ज्योतिषांना उत्तर दिले, “मी हा दृढ निश्चय केले आहे: जर मला ते स्वप्न कोणते आणि त्याचा अर्थ काय हे तुम्ही सांगितले नाहीतर मी तुमचे तुकडे करेन आणि तुमच्या घरादारांचे उकिरडे केले जातील. पण माझे स्वप्न काय होते, त्याचा अर्थ काय आहे, हे तुम्ही मला सांगितले, तर तुम्ही माझ्याकडून भेट व इनामे आणि मोठा सन्मान प्राप्त कराल. म्हणून मला माझे स्वप्न सांगा आणि त्या स्वप्नांचा अर्थ सांगा.” त्यांनी पुन्हा उत्तर दिले, “महाराजांनी, स्वप्न आपल्या सेवकांना सांगावे आणि आम्ही त्याचा अर्थ सांगू.” तेव्हा राजाने उत्तर दिले, मला आता खात्री झाली आहे की तुम्ही वेळ काढण्याचा प्रयत्न करीत आहात, कारण मी हा दृढ निश्चय केला आहे, हे तुम्हाला कळले आहे: जर तुम्ही मला माझे स्वप्न सांगणार नाही, तर तुम्हासाठी फक्त एकच शिक्षा आहे. परिस्थिती बदलेल या आशेने तुम्ही मला भ्रामक आणि दुष्ट गोष्टी सांगण्याचा कट रचला आहे. म्हणून तुम्ही मला स्वप्न सांगा आणि मला कळेल की तुम्ही मला त्याचा परिणाम सांगू शकता.
दानीएल 2:1-9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. तेव्हा राजाने हुकूम केला की, ‘माझी स्वप्ने काय आहेत ते सांगायला ज्योतिषी, मांत्रिक, जादूगार व खास्दी ह्यांना बोलावून आणा.’ मग ते सर्व राजासमोर हजर झाले. राजा त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न समजण्या-विषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे.” ते खास्दी लोक राजाला अरामी भाषेत म्हणाले, “महाराज, चिरायू असा; आपले स्वप्न ह्या दासांना सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” राजाने खास्द्यांना म्हटले की, “माझा ठराव होऊन चुकला आहे की माझे स्वप्न व त्याचा अर्थ मला तुम्ही कळवला नाही, तर तुमचे तुकडे-तुकडे करून तुमची घरे उकिरडे करावेत. पण तुम्ही स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगाल तर तुम्हांला माझ्याकडून देणग्या, इनामे व मोठा मान मिळेल; ह्यास्तव स्वप्न व त्याचा अर्थ मला सांगा.” ते पुन्हा त्याला म्हणाले, “महाराजांनी आपले स्वप्न आपल्या ह्या दासांना सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” तेव्हा राजाने म्हटले, “मला खातरीने वाटते की तुम्ही वेळ काढत आहात, कारण तुम्हांला ठाऊक आहे की, माझा ठराव होऊन चुकला आहे; परंतु तुम्ही मला स्वप्न सांगणार नाही, तर तुमच्यासंबंधाने एकच हुकूम आहे. हा प्रसंग टाळावा म्हणून तुम्ही खोट्यानाट्या गोष्टी सांगायचा बेत केला आहे. माझे स्वप्न मला सांगा म्हणजे त्याचा अर्थ तुम्हांला सांगता येईल किंवा नाही हे मला कळेल.”