दानि. 2
2
दानीएल नबुखद्नेस्सराच्या स्वप्नांचा अर्थ सांगतो
1नबुखद्नेस्सर राजाच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्यास स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही. 2तेव्हा राजाने फर्मान काढला की, जादूगार आणि ज्योतिषी जाणणारे तसेच मांत्रिक आणि ज्ञानी लोक ह्यांनी यावे आणि राजाला ते स्वप्न सांगावे, म्हणून ते राजासमोर हजर झाले.
3राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकूळ झाले आहे.” 4तेव्हा ज्ञानी लोक राजाशी आरामी भाषेत बोलले “महाराज चिरायू असा! तुमच्या सेवकांना तुमचे स्वप्न सांगा आणि आम्ही त्याचा अर्थ तुम्हास प्रगट करू!”
5राजाने खास्दी लोकांस उत्तर दिले, “हा ठराव होऊन चुकला आहे जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगणार नाही तर तुमच्या शरीराचे तुकडे केले जातील आणि तुमच्या घरांचे उकिरडे केले जातील. 6पण जर तुम्ही मला स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगाल तर तुम्हास माझ्याकडून भेट, पारितोषिक आणि मोठा मान मिळेल. यास्तव तुम्ही मला स्वप्न व त्याचा अर्थ सांगा.”
7ते पुन्हा त्यास म्हणाले, “महाराजांनी आपल्या सेवकांस स्वप्न सांगावे म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.” 8राजाने उत्तर दिले, “मला ठाऊक आहे तुम्ही वेळ काढत आहात; पाहिजे कारण तुम्हास ठाऊक आहे की, माझा ठराव झालेला आहे. 9पण जर तुम्ही मला स्वप्न सांगितले नाही तर तुमच्यासाठी एकच शिक्षा आहे. म्हणून माझे मन बदलत नाही तोपर्यंत तुम्ही खोट्या आणि फसव्या गोष्टी सहमत करून मला सांगाव्या असे तुमचे ठरले आहे. म्हणून मला स्वप्न सांगा म्हणजे मला समजेल तुम्ही त्याचा उलगडा करु शकता.”
10खास्दी लोकांनी राजास उत्तर केले, “या जगात असा कोणताच मनुष्य नाही जो राजाची ही मागणी पूर्ण करेल असा कोणताच महान आणि प्रतापी राजा नाही ज्याने असे मागणे ज्योतिषी, भुतविद्या जाणणारे आणि ज्ञानी लोकांस केली असेल. 11महाराज जी गोष्ट मागतात ती कठीण आहे आणि देवाशिवाय कोणीही नाही जो हे सांगेल कारण देव मानवात राहत नाही.”
12हे ऐकून राजा रागाने संतापला आणि त्याने आज्ञा केली की, बाबेलमध्ये जे ज्ञानाविषयी ओळखले जातात त्यांचा नाश करण्यात यावा. 13हे फर्मान निघाले म्हणून जे त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जात होते त्यास मरणास सामोरे जावे लागणार होते, आणि लोक दानीएल आणि त्यांच्या मित्रांना शोधू लागले यासाठी की, त्यांचा घात करावा.
14तेव्हा दानीएलाने अंगरक्षकांचा प्रधान अर्योक जो, बाबेलातील ज्ञानांचा घात करायला निघाला होता, त्यास दुरदर्शीपणाने आणि विचारपूर्वक म्हणाला. 15दानीएल राजाच्या सेनापतीला म्हणाला, “राजाकडून हा असा तातडीचा हुकूम का निघाला?” तेव्हा अर्योकने दानीएलास काय घडले ते सांगितले. 16मग दानीएलाने आत जाऊन राजास विनंती केली की, “त्याला समय द्यावा म्हणजे त्यास महाराजाला त्याच्या स्वप्नाचा उलगडा सांगता येईल.”
17तेव्हा दानीएललाने आपल्या घरात जाऊन आपले सोबती हनन्या, मीशाएल व अजऱ्या यांना ती गोष्ट कळवली, 18त्याने त्यांना विनंती केली की, या रहस्याविषयी स्वर्गीय देवाने दया करावी असे त्यांनी देवाजवळ मागावे म्हणजे बाबेलाच्या इतर ज्ञान्यांसोबत त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा घात होऊ नये.
19त्या रात्री दानीएलास दृष्टांताद्वारे, या रहस्याचा उलगडा झाला. त्यानंतर त्याने स्वर्गीय देवाचे स्तवन केले. 20आणि तो म्हणाला,
“देवाच्या नामाचे सदासर्वदा स्तवन होवो,
कारण ज्ञान आणि सामर्थ्य त्याचे आहे.”
21तो समय आणि ऋतु बदलतो,
तो राजास काढतो आणि दुसऱ्यास सिंहासनावर बसवून राजे करतो;
तो ज्ञान्यास आणि विवेकवंतास शहाणपण देतो.
22तो गुढ आणि गहन गोष्टी प्रगट करतो,
कारण अंधारात काय आहे हे तो जाणतो,
आणि प्रकाश त्यामध्ये वसतो.
23माझ्या पूर्वजाच्या देवा, मी तुझे आभार मानतो आणि तुझे स्तवन करतो,
कारण तू मला ज्ञान आणि सामर्थ्य दिले;
आणि जे आम्ही तुझ्याजवळ मागितले ते सर्व तू आता मला कळवले आहे म्हणून मी तुझे उपकार मानतो व तुझी स्तुती करतो,
कारण तू राजाची गोष्ट आम्हास कळविली आहे.
24हे सगळे झाल्यानंतर दानीएल ज्याची नेमणूक राजाने बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा वध करण्यास ज्याची नेमणूक केली होती त्या अर्योकाकडे जाऊन म्हणाला, “बाबेलाच्या ज्ञानी लोकांस ठार करु नको, तर मला राजासमोर घेऊन जा म्हणजे मी त्यास स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगेन.”
25नंतर अर्योकाने दानीएलास लवकर राजासमोर नेऊन म्हटले, “यहूदाच्या बंदीवानात मला एक मनुष्य सापडला आहे जो राज्याच्या स्वप्नाचा अर्थ सांगेल.” 26राजाने बेल्टशस्सर नाव दिलेल्या दानीएलास म्हटले, “माझे स्वप्न आणि त्याचा अर्थ सांगण्यास तू कुशल आहेस काय?”
27दानीएलाने राजास उत्तर दिले, “राजाचे गुढ प्रकट करण्याची कुशलता, ज्ञानी, व भुतविद्या जाणणारे, जादूगार किंवा ज्योतिषी त्यांच्याकडे नाही. 28तथापी, एक देव आहे जो स्वर्गात राहतो तो रहस्य प्रगट करतो आणि त्याने भविष्यात होणारी घटना राजा नबुखद्नेस्सर आपणास कळविली आहे. तुम्ही आपल्या बिछान्यात पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टांत तो असा.
29आपण जसे बिछान्यात पडून विचार करत होता तेव्हा आपल्या मनात हे रहस्य प्रगट करणाऱ्याने आपणास पुढे होणारी घटना कळविली. 30आता माझी गोष्ट, ती अशी की; हे रहस्य मला उलगडते ते यामुळे नाही की मी इतर मनुष्यांपेक्षा अधिक ज्ञानी आहे, तर हे रहस्य यासाठी उलगडले की, राजा आपण याचा अर्थ समजावा व जो आपल्या मनातील गहन विचार समजावे.
31राजा आपण, आपल्या डोळ्यापुढे एक मोठा पुतळा पाहिला हा पुतळा शक्तीशाली आणि तेजोमय असा तुमच्यासमोर उभा राहिला, त्याचे तेज भयावह होते. 32त्या पुतळ्याचे डोके उत्तम सोन्याचे होते, त्याची छाती व हात चांदीचे होते, त्यांचा मधला भाग आणि मांडया पितळेच्या. 33आणि त्याचे पाय लोखंडाचे होते त्याची पावले काही भाग लोखंडाची आणि काही भाग मातीची होती.
34तुम्ही वर पाहत होता तेव्हा कोणा मनुष्याचा हात लागल्यावाचून एक दगड छेदला गेला आणि त्याने त्या पुतळ्याच्या लोखंडाच्या व मातीच्या पावलांवर आदळून त्यांचे तुकडे तुकडे केले. 35त्यानंतर लोखंड, माती, पितळ, चांदी आणि सोने यांचे एकाच वेळी तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यातील खेळ्यातल्या भुश्याप्रमाणे झाले. वारा त्यांना घेऊन गेला आणि त्यांचा मागमूस राहिला नाही. पण तो दगड जो पुतळयावर आदळला होता त्यांचा मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
36हे आपले स्वप्न आहे राजा, आता आम्ही त्याचा उलगडा सांगतो. 37राजा आपण, राजाधिराज आहात ज्यास स्वर्गाच्या देवाने राज्य, सामर्थ्य, बल आणि सन्मान दिला आहे. 38त्याने तुम्हास त्या जागा दिल्या जिथे माणसे राहतात. त्याने तुमच्या आधीन वनपशू आणि आकाशातील पक्षी केले आहेत आणि तुम्हास त्याचा शासक बनविले आहे, तुम्ही त्या पुतळ्याचे सुवर्ण मस्तक आहात.
39आपल्यानंतर आपणापेक्षा कनिष्ठ असे राज्य उदयास येईल, आणि पितळेचे असे तिसरे राज्य सर्व पृथ्वीवर सत्ता करतील.
40तेथे चौथे राज्य असेल जे लोखंडासारखे मजबूत लोखंड तुकडे करतो हे त्यांचे तुकडे करून त्यांचा भुगा करील.
41जसे आपण पाहिले की, पावले आणि बोटे काही भाग भाजलेल्या मातीचा आणि काही भाग लोखंडाचा होता, म्हणून हे राज्य विभागलेले राहील, काही भागात लोखंडाची मजबुती राहील तसेच जसे आपण लोखंड मातीत मिसळलेला पाहिले. 42जशी पायांची बोटे अंशत: लोखंडाची आणि अंशत: मातीची बनली होती तसे ते राज्य असेल अंशत: बळकट आणि अंशत: ठिसूळ असे होईल. 43जसे आपण पाहिले लोखंड मऊ माती सोबत मिसळले होते, तसे लोक मिसळलेले राहतील, जसे लोखंड व माती एक होत नाही तसे हे लोकही एकत्र राहणार नाही.
44त्या राजाच्या दिवसात स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील, त्याचा कधीही नाश होणार नाही, त्यास कोणी जिंकणार नाही ते तर सर्व राज्याचे तुकडे करून त्या सर्वांचा नाश करील व ते सर्व काळ टिकेल. 45आपण जसे पाहिले कोणी मनुष्याचा हात न लागता एक दगड पर्वतांवरून तुटून पडला त्याने लोखंड, पितळे, माती, चांदी आणि सोने यांचे तुकडे केले, त्या महान परमेश्वराने राजा पुढे होणाऱ्या घटना कळविल्या आहेत. हे स्वप्न सत्य असून त्याचा हा विश्वसनीय उलगडा आहे.”
46राजा नबुखद्नेस्सराने पालथे पडून दानीएलास साष्टांग दंडवत घातले आणि आज्ञा केली की त्यास अर्पण करून धूप दाखवा. 47राजा दानीएलास म्हणाला, “खरोखर तुझा देव सर्व देवांचा देव आहे, राजांचा राजा आहे, तो जो रहस्यांचा उलगडा करतो, म्हणून तुला हे रहस्या प्रगट करता आले आहे.”
48नंतर राजाने दानीएलास मोठा सन्मान आणि अद्भुत भेटवस्तू दिल्या. त्यास अवघ्या बाबेलातील परगण्याची सत्ता दिली आणि दानीएल बाबेलाच्या सर्व ज्ञानी लोकांचा मुख्य प्रशासक झाला. 49दानीएलाने राजास केलेल्या विनंतीवरुन, राजाने शद्रुख, मेशख आणि अबेदनगो ह्यास बाबेलाच्या प्रांताचे प्रशासक नेमले पण दानीएल राजदरबारीच राहिला.
सध्या निवडलेले:
दानि. 2: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.