2 तीमथ्य 2:1-13
2 तीमथ्य 2:1-13 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
माझ्या मुला तू ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान हो. माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांस सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे. जर कोणी मल्ल युद्ध करतो, तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्यास मुकुट मिळत नाही. कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे, कारण प्रभू तुला या सर्व गोष्टींची समज देईल. माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर. कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही. ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे की, जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही.
2 तीमथ्य 2:1-13 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
माझ्या मुला, ख्रिस्त येशूंच्या ठायी जी कृपा आहे, तिच्यात सबळ हो. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांच्या समोर माझ्याकडून ऐकल्या, त्या विश्वासू माणसांच्या स्वाधीन कर. जे इतरांनाही शिकविण्यास समर्थ आहे. येशू ख्रिस्ताचा एक चांगला सैनिक या नात्याने माझ्यासोबत तू आपल्या दुःखाचा वाटा उचल, कोणताही सैनिक स्वतःला संसाराच्या व्यवहारात गुंतवून घेत नाही. यासाठी की ज्याने त्याला सैन्यात घेतले त्याला संतुष्ट करावे. एखाद्याने मल्लयुद्धात भाग घेतला परंतु नियमानुसार कामगिरी न केल्यास त्याला विजय पदक मिळणार नाही. परिश्रम करणार्या शेतकर्याने पिकाचा पहिला वाटा घेणे योग्य आहे. जे मी तुला सांगत आहे त्यावर मनन कर आणि हे समजण्यास प्रभू तुला साहाय्य करो. येशू ख्रिस्त, जे दावीदाचे वंशज, मृतांतून उठविले गेले याची आठवण ठेव, हीच माझी शुभवार्ता. या ईश्वरीय शुभवार्तेकरिता मी एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे साखळीने बांधलेला असून मला दुःख भोगावे लागत आहे, तरी परमेश्वराचे वचन साखळीने जखडलेले नाही. परमेश्वराच्या निवडलेल्या लोकांना माझ्या दुःखसहनाकडून ख्रिस्त येशूंमध्ये तारण आणि सार्वकालिक गौरव मिळणार असेल, तर मी ती दुःखे आनंदाने सोशीन. ही बाब विश्वासयोग्य आहे की त्यांच्याबरोबर आपण मेलो तर त्यांच्याबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने दुःख सहन करतो तर त्यांच्याबरोबर राज्यही करू, जर आपण त्यांना नाकारतो तर तेही आपल्याला नाकारतील. जर आपण अविश्वासी झालो, तरी ते विश्वासू राहतात, कारण त्यांना स्वतःला नाकारता येत नाही.
2 तीमथ्य 2:1-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्या-पासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करतो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालत नाहीत. श्रम करणार्या शेतकर्याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे; कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणार्यासारखा बेड्यांचेदेखील दुःख सोसत आहे; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू, तर तोही आपल्याला नाकारील; आपण अविश्वासी झालो, तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वत:विरुद्ध वागता येत नाही.
2 तीमथ्य 2:1-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
माझ्या मुला, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळालेल्या कृपेत बलवान होत जा. पुष्कळ साथीदारांच्या समक्ष घोषित केलेली जी माझी शिकवण तू ऐकलीस, ती घेऊन अशा विश्वसनीय माणसांकडे सोपव की, ते ती दुसऱ्यांनासुद्धा शिकवतील. ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो. जो युद्धात मग्न असतो तो स्वत: संसाराच्या कार्यात गुंतत नाही, ह्यासाठी की, सैन्याधिकाऱ्याला त्याला संतुष्ट करावयाचे असते. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा नियमाप्रमाणे धावला नाही, तर त्याला पारितोषिक मिळत नाही. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने प्रथम पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो. माझ्या शुभवर्तमानानुसार दावीदच्या संतानांतील मृतांतून उठविलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण ठेव. ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही. निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो. हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सहन करतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. आपण अविश्वासी झालो, तरीही तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.