YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 2:1-13

2 तीमथ्य 2:1-13 MARVBSI

माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेत बलवान होत जा. ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमक्ष माझ्या-पासून ऐकल्या, त्या इतरांना शिकवण्यास योग्य अशा विश्वासू माणसांना सोपवून दे. ख्रिस्त येशूचा चांगला शिपाई ह्या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. शिपाईगिरी करणारा माणूस संसाराच्या कार्यात गुंतत नाही; ह्यासाठी की, ज्याने त्याला सैन्यात दाखल करून घेतले त्याला त्याने संतुष्ट करावे. जर कोणी मल्लयुद्ध करतो, तर ते नियमांप्रमाणे केल्यावाचून त्याला मुकुट घालत नाहीत. श्रम करणार्‍या शेतकर्‍याने पहिल्याने पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे; कारण प्रभू तुला सर्व गोष्टी समजावून देईल. माझ्या सुवार्तेप्रमाणे मेलेल्यांतून उठवलेला, दाविदाच्या संतानांतील येशू ख्रिस्त, ह्याची आठवण ठेव. ह्या सुवार्तेमुळे मी दुष्कर्म करणार्‍यासारखा बेड्यांचेदेखील दुःख सोसत आहे; तरी देवाच्या वचनाला बेडी पडलेली नाही. ह्यामुळे निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण युगानुयुगाच्या गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरता सर्वकाही धीराने सोसतो. हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सोसतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू, तर तोही आपल्याला नाकारील; आपण अविश्वासी झालो, तरी तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वत:विरुद्ध वागता येत नाही.