YouVersion लोगो
सर्च आयकॉन

2 तीमथ्य 2:1-13

2 तीमथ्य 2:1-13 MACLBSI

माझ्या मुला, ख्रिस्त येशूमध्ये आपल्याला मिळालेल्या कृपेत बलवान होत जा. पुष्कळ साथीदारांच्या समक्ष घोषित केलेली जी माझी शिकवण तू ऐकलीस, ती घेऊन अशा विश्वसनीय माणसांकडे सोपव की, ते ती दुसऱ्यांनासुद्धा शिकवतील. ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक ह्या नात्याने माझ्या दुःखात सहभागी हो. जो युद्धात मग्न असतो तो स्वत: संसाराच्या कार्यात गुंतत नाही, ह्यासाठी की, सैन्याधिकाऱ्याला त्याला संतुष्ट करावयाचे असते. धावण्याच्या शर्यतीत भाग घेणारा नियमाप्रमाणे धावला नाही, तर त्याला पारितोषिक मिळत नाही. श्रम करणाऱ्या शेतकऱ्याने प्रथम पिकाचा वाटा घेणे योग्य आहे. जे मी बोलतो ते समजून घे आणि प्रभू तुला सर्व गोष्टींची समज देवो. माझ्या शुभवर्तमानानुसार दावीदच्या संतानांतील मृतांतून उठविलेल्या येशू ख्रिस्ताची आठवण ठेव. ह्या शुभवर्तमानासाठी मी दुःख सोसत आहे व गुन्हेगारासारखा तुरुंगवासही भोगत आहे. परंतु देवाचा शब्द मात्र बंधनांत अडकलेला नाही. निवडलेल्या लोकांनाही ख्रिस्त येशूमधील तारण शाश्वत गौरवासह प्राप्त व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता सर्व काही धीराने सहन करतो. हे वचन विश्वसनीय आहे की, जर आपण त्याच्याबरोबर मेलो तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू. जर आपण धीराने सहन करतो, तर त्याच्याबरोबर राज्यही करू; आपण त्याला नाकारू तर तोही आपल्याला नाकारील. आपण अविश्वासी झालो, तरीही तो विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही.