YouVersion लोगो
सर्च आयकॉन

२ शमुवेल 7:18-29

२ शमुवेल 7:18-29 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)

मग दावीद राजा आत जाऊन परमेश्वरासमोर बसून म्हणाला, “हे प्रभू देवा, मी कोण व माझे घराणे ते काय की तू मला येथवर आणावेस?” हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस. दावीद तुझ्यापुढे आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू आपल्या सेवकाला ओळखतोस. तू आपल्या वचनास्तव व आपल्या मनास आले म्हणून हे थोर कृत्य करून ते आपल्या सेवकाच्या निदर्शनास आणून दिले आहेस. ह्यास्तव हे प्रभू परमेश्वरा, तू थोर आहेस; जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही; तुझ्याशिवाय अन्य देव नाही. तुझ्या इस्राएल प्रजेसमान भूतलावर दुसरे कोणते तरी राष्ट्र आहे काय? आपली प्रजा करून घेण्यासाठी इस्राएलास सोडवण्यास तू गेलास, आपले नाव केलेस, त्यांच्यासाठी महत्कृत्ये केलीस, आपल्या लोकांना मिसर देशातून इतर राष्ट्रांच्या व देवांच्या हातांतून सोडवून घेतले आणि त्यांच्यादेखत आपल्या देशासाठी भयानक कृत्ये केलीस; असे करायला कोणत्या राष्ट्राचा देव गेला होता? इस्राएल लोकांनी तुझी निरंतरची प्रजा व्हावे म्हणून तू त्यांची स्थापना केलीस; हे परमेश्वरा, तू त्यांचा देव झालास. तर आता, हे प्रभू परमेश्वरा, आपला सेवक व त्याचे घराणे ह्यांविषयी जे वचन तू दिलेस ते कायमचे सिद्धीस ने आणि आपल्या म्हणण्याप्रमाणे कर. सेनाधीश परमेश्वर इस्राएलावर सत्ताधीश आहे असे म्हणून लोकांनी तुझ्या नामाचा निरंतर महिमा वाढवावा आणि तुझा सेवक दावीद ह्यांचे घराणे तुझ्यासमोर स्थापित व्हावे. कारण, हे सेनाधीश परमेश्वरा, हे इस्राएलाच्या देवा, तू माझे कान उघडून सांगितलेस की, मी तुझे घराणे स्थापीन; म्हणून ही विनंती तुला करायचे धैर्य तुझ्या सेवकाला झाले. आता हे प्रभू परमेश्वरा, तूच देव आहेस व तुझी वचने सत्य आहेत; आणि तू आपल्या सेवकाला अशा प्रकारे बरे करण्याचे वचन दिले आहेस; तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला अशी बरकत दे की ते तुझ्या दृष्टीसमोर निरंतर कायम राहील; कारण, हे प्रभू परमेश्वरा, तूच हे म्हटले आहेस; तुझ्या सेवकाच्या घराण्याचे तुझ्या आशीर्वादाने सदा अभीष्ट होवो.”

सामायिक करा
२ शमुवेल 7 वाचा

२ शमुवेल 7:18-29 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)

यानंतर दावीद आत जाऊन परमेश्वरासमोर बसला आणि म्हणाला, “हे प्रभू, परमेश्वरा, मला एवढी किंमत तू का देतोस? माझे घराणे तुला महत्वाचे का वाटते? तू मला एवढे मोठे का केलेस? हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या दृष्टीने ही केवळ लहान गोष्ट आहे; तू आपल्या सेवकाच्या घराण्यासंबंधाने पुढील बर्‍याच काळाचे सांगून ठेवले आहेस; प्रभू परमेश्वरा, हे सर्व तू मानवी व्यवहारासारखे केले आहेस. मी आणखी काय बोलणार? प्रभू परमेश्वरा, तू तुझ्या सेवकाला जाणतोसच. तू करणार म्हणालास, आणि तुला तसे करायची इच्छा आहे; तेव्हा या अदभुत गोष्टी खरोखरच घडतील. मला, तुझ्या सेवकाला, तू त्याची पूर्णकल्पनाही द्यायचे ठरवलेस. ह्यास्तव हे माझ्या प्रभू, परमेश्वरा, तू खरोखरच महान आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे, त्यावरून पाहता तुझ्यासमान कोणी नाही. तुझ्याखेरीज अन्य कोणी देव नाही. पृथ्वीच्या पाठीवर इस्राएलसारखे राष्ट्र नाही. इस्राएलाची प्रजा ही खास प्रजा आहे. ती गुलाम होती, तिला तू मिसरमधून सोडवलेस आणि मुक्त केलेस. तिला आपली प्रजा बनवलेस. इस्राएलांसाठी तू महान आणि अद्भूत चमत्कार केलेस. तू निरंतर इस्राएलाला स्वतःच्या कवेत घेतलेस. हे परमेश्वरा तू त्यांचा देव झालास. आता तर परमेश्वर देवा, तू या तुझ्या सेवकासाठी काही गोष्टी सिध्दीस नेणार आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे कृपा करून तसेच होऊ दे. माझा वंश सतत राज्य करू दे. मग तुझ्या नावाचा महिमा वाढेल. लोक म्हणतील, सर्वशक्तिमान परमेश्वर देवाची इस्राएलवर सत्ता आहे. तुझी सेवा करायला तुझा सेवक दावीद याच्या घराण्याला बळ मिळू दे. सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलाच्या देवा, तूच हे मला दाखवले आहेस तू म्हणालास, मी तुझ्यासाठी घर बांधीन, म्हणून मी तुझा सेवक तुझ्यापुढे ही प्रार्थना करण्याचे साहस करत आहे. प्रभू परमेश्वरा, तूच आमचा देव आहेस. तुझ्या सांगण्यावर माझा पूर्ण भरंवसा आहे. या सर्व चांगल्या गोष्टी माझ्याबाबतीत, तुझ्या या सेवकाच्या बाबतीत घडणार आहेत असे तू म्हणालास. आता माझ्या घराण्याला आशीर्वाद दे. माझा वंश सातत्याने चालू दे. हे प्रभू परमेश्वरा, तूच तसे म्हणाला आहेस आमच्यावर तुझ्या आशीर्वादाचे छत्र कायमचे राहील असा तुझा आशीर्वाद आहे.”

सामायिक करा
२ शमुवेल 7 वाचा

२ शमुवेल 7:18-29 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)

नंतर दावीद राजा आत जाऊन याहवेहसमोर बसला आणि म्हणाले: “हे सार्वभौम याहवेह, मी कोण आहे आणि माझे कुटुंब काय आहे की तुम्ही मला येथवर आणावे? आणि हे सार्वभौम याहवेह, जणू हे आपल्या दृष्टीने पुरेसे नव्हते म्हणून आपण आपल्या सेवकाच्या घराण्याच्या भविष्याबद्दलही अभिवचन दिले आहे आणि हे याहवेह परमेश्वरा हा करार केवळ एका मनुष्यासाठी आहे! “दावीद तुमच्यापुढे आणखी काय बोलू शकतो? कारण हे सार्वभौम याहवेह, आपल्या सेवकाला तुम्ही ओळखता. आपल्या वचनासाठी आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही हे महान कार्य केले आहे व आपल्या सेवकाला ते कळविले आहे. “हे सार्वभौम याहवेह, तुम्ही किती थोर आहात! तुमच्यासारखा कोणीही नाही, जे आम्ही आमच्या कानांनी ऐकले आहे त्यानुसार, तुमच्याशिवाय दुसरे कोणी परमेश्वर नाही. आपल्या इस्राएली लोकांसारखे कोण आहेत—पृथ्वीवरील असे एक राष्ट्र ज्यांनी आपले लोक व्हावे म्हणून परमेश्वर त्यांना खंडून घेण्यास व आपले नाव प्रसिद्ध करण्यासाठी गेले; आणि ज्या तुमच्या लोकांना तुम्ही इजिप्त देशातून, म्हणजे राष्ट्रे व त्यांची दैवते यांच्यामधून सोडविले व त्यांच्यादेखत आपल्या लोकांसाठी महान व अद्भुत कार्य केले? तुम्ही आपल्या इस्राएली लोकांना स्वतःचे खास लोक म्हणून सर्वकाळासाठी स्थापित केले आहे आणि हे याहवेह, तुम्ही त्यांचे परमेश्वर झाला आहात. “तर आता, हे याहवेह परमेश्वरा, आपला सेवक व त्याच्या घराण्याविषयी जे अभिवचन तुम्ही दिले आहे, ते आपण सर्वकाळपर्यंत पूर्ण करावे, आपण म्हटल्याप्रमाणे आपण करावे, यासाठी की तुमचे नाव सर्वकाळ महान होईल. तेव्हा लोक म्हणतील, ‘सर्वसमर्थ याहवेह हे इस्राएलचे परमेश्वर आहेत!’ आणि आपला सेवक दावीद याचे घराणे तुमच्या दृष्टीत स्थापित व्हावे. “सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, तुम्ही आपल्या सेवकाला हे प्रकट केले आहे की, ‘मी तुझे घर बांधीन.’ त्यामुळे आपल्या सेवकाला तुमच्याकडे ही प्रार्थना करण्याचे धैर्य आले आहे. सार्वभौम याहवेह, तुम्ही परमेश्वर आहात! तुमचा करार विश्वासयोग्य आहे आणि तुम्ही आपल्या सेवकासाठी उत्तम गोष्टींचे अभिवचन दिले आहे. तर आता प्रसन्न होऊन आपल्या सेवकाच्या घराण्याला आशीर्वाद द्या, म्हणजे त्यांनी तुमच्या दृष्टीपुढे सदैव राहावे; कारण, सार्वभौम याहवेह, तुम्ही हे बोलला आहात आणि आपल्या आशीर्वादाने तुमच्या सेवकाचे घराणे सदैव आशीर्वादित व्हावे.”

सामायिक करा
२ शमुवेल 7 वाचा